Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

लाखो रुपयांचा धान्य घोटाळा करणाऱ्या आरोपीला चार महिन्यानंतर अटक
जिंतूर, ३ जून/वार्ताहर

 

सहा हजार क्विंटल धान्य गायब करून ५२ लाख रुपयांचा धान्य घोटाळा करणारा आणि चार महिन्यांपासून फरार असलेल्या अ. मजीद अ. नबी या आरोपीला अटक करण्यास जिंतूर पोलिसांना यश आले. त्या आरोपीला जिंतूर न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जिंतूर तहसीलच्या धान्य गोदामावर एक वर्ष गोदामपाल म्हणून कार्यरत असलेल्या अ. मजीद अ. नबी याने गोदामामधील सहा हजार क्विंटल धान्य गायब करून ५२ लाख रुपयांचा अपहार केला. तेव्हा तत्कालीन प्रभारी तहसीलदार सतीश सोनी यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून ३० जानेवारीला अ. मजीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून मजीद फरार झालेला होता. गेल्या चार महिन्यांच्या काळात परभणी जिल्हा सत्रन्यायालय व यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र त्याला जामीन मिळाला नाही.
१ जूनला रात्री मजीद हा जिंतूर येथील आपल्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक खुशाल शिंदे यांनी आपले सहकारी साहेबराव चवरे, विठ्ठल राठोड, अर्जुन रणखांब, लक्ष्मण कांबळे यांच्या सहकाऱ्याने मजीद याच्या घरावर छापा मारून त्यास अटक केली.
या धान्य घोटाळ्यात आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.