Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

प्रादेशिक

पोलिसांसाठी बुलेटप्रुफ जाकीट खरेदीत भ्रष्टाचार - रामदास कदम
मुंबई, ३ जून / खास प्रतिनिधी

मुंबई पोलिसांसाठी ७० ते ८० हजार रुपये किमतीची अशी प्रत्येकी १७ किलोची जाकिटे खरेदी करण्यात आली. मात्र १० किलो वजनाची जाकिटे ३३ हजार रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मुंबई पोलिसांच्या जाकीट खरेदीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज विधानसभेत केला. मुंबई पोलिसांकडे असलेल्या जाकिटांपेक्षा कमी वजनाचे जाकीटच त्यांनी सभागृहात फडकावले. आंध्र प्रदेश सरकारने सुरक्षेसाठी उपयुक्त नसल्याने नाकारलेले स्कॅटर वाहन मुंबई पोलिसांनी सात कोटी रुपयांना खरेदी केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

२६/११ च्या हल्ल्यासाठी कोटय़वधी रुपयांची समुद्रमार्गे तस्करी!
मुंबई, ३ जून / प्रतिनिधी

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीसाठी कोटय़वधी रुपये दुबईहून समुद्रमार्गे पाठविण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. कोटय़वधी रुपये कोणी दिले यांची नावेही मिळाली असून या माहितीची खातरजमा केली जात असल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यासाठी दाऊदच्या मुंबईस्थित हस्तकानेही आर्थिक मदत केल्याची चर्चा आहे. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात हा दुवा तपासण्यात आलेला नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

पालिकेतील सफाई कामगारांना मिळणार किमान वेतन!
मुंबई, ३ जून / प्रतिनिधी

महानगरपालिकेतील सफाई कामगारांना आता केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे म्हणजे दिवसाला १८० रुपये असे किमान वेतन देण्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले आहे. कचरा वाहतूक श्रमिक संघाने आज कामगारमंत्री नवाब मलिक यांची या प्रकरणी भेट घेतली होती. या निर्णयाचा महापालिकेतील सुमारे साडेसहा हजार कंत्राटी सफाई कामगारांना फायदा होणार आहे. कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या एका शिष्टमंडळाने मलिक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

ठाकरेंचे श्रद्धास्थान असलेल्या भय्यू महाराज, नम्र मुनी यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका
मुंबई, ३ जून/प्रतिनिधी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ज्यांच्या पायाशी लीन होतात अशा नम्र मुनींवर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या भय्यू महाराजांवर शिवसेनेच्या मुखपत्रात टीका झाल्याने शिवसेनेचा भगवा फडकविण्याकरिता आपले अध्यात्मिक सामथ्र्य वापरणारे हे संतमहंत नाराज झाले आहेत.

‘कुबेर’वर सापडलेल्या वस्तू साक्षीदाराने ओळखल्या
त्यातील बहुतांशी पाकिस्तानात तयार केल्याचा दावा
मुंबई, ३ जून / प्रतिनिधी
भारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करण्यासाठी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ज्या ‘कुबेर’ नौकेचा वापर केला त्यावर सापडलेल्या ब्लँकेट्स, जॅकेट्सह शंभराहून अधिक वस्तूंची पंच साक्षीदाराने आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर ओळख पटवली. या ब्लँकेट्स आणि जॅकेट्वर सापडलेले घामाचे नमुने हे कसाब आणि ठार झालेल्या नऊ दहशतवाद्यांच्या घामांच्या नमुन्यांशी जुळत असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाल्याचेही अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी या वेळी न्यायालयाला सांगितले.

शालेय शिक्षणमंत्र्यांची ‘वादग्रस्त परंपरा’ अखंडच!
संतोष प्रधान
मुंबई, ३ जून

राज्यातील लोकशाही आघाडी सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री आणि नवा वाद असे समीकरणच तयार झाले आहे. गेल्या दहा वर्षांंमध्ये हे खाते भूषविलेल्या सर्वच मंत्र्यांचे काही ना काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निर्णय सध्या असाच वादग्रस्त ठरतो आहे. इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयास विरोध होत आहे. विशेषत: सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच त्याला विरोध दर्शविला आहे.

विरार येथे परप्रांतीयांकरिता घरे बांधू देणार नाही -उद्धव ठाकरे
मुंबई, ३ जून/प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई शहराच्या मुळावर आले आहे. एमएमआरडीए विरार येथे परप्रांतीयांकरिता बांधत असलेली ४३ हजार घरे शिवसेना कदापि होऊ देणार नाही. या घरांची एक वीट रचू देणार नाही, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिला. ठाकरे म्हणाले की, एमएमआरडीए वसईजवळ सुमारे ४३ हजार घरे भाडेतत्त्वावर बांधत असून भाडेकरूंसाठी १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी (डोमिसाईल) असल्याची अट शिथिल केली आहे. ही अट काढल्यामुळे महाराष्ट्रात ८०० ते १५०० रुपये महिना भाडय़ाची ही घरे घेण्याकरिता परप्रांतातून लोंढेच्या लोंढे येऊन आदळतील. अशा प्रकारच्या योजना निर्माण करून मुंबई व आसपासच्या परिसरात मराठी माणसांना अल्पमतात आणायचे व मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान यात आहे. शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही. मुंबईतील सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या त्याचवेळी काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या डोक्यात हा कारस्थानी किडा वळवळू लागला. पण हा महाराष्ट्रद्वेषाचा किडा शिवसेना ठेचून काढील आणि मराठी माणसाचे अस्तित्व आणि अस्मितेसाठी निकराचा लढा देईल. मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला आहेच आता वसई, विरार, ठाणे येथूनही त्याला खतम करण्याचे कारस्थान काँग्रेसने शिजवले आहे.

अण्णा हजारे यांचे जाबजबाब घेऊन गुन्हे नोंदवू- नितीन राऊत
मुंबई, ३ जून/प्रतिनिधी

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येच्या कटासंबंधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) कडून माहिती घेण्यात येईल व अण्णा हजारे यांचे जाबजबाब घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात येतील, असे आश्वासन गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी आज विधान परिषदेत दिले.अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली पवनराजे निंबाळकर यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी दिल्याची माहिती उघड झाली आहे. विधान परिषदेचे सदस्य कपिल पाटील यांनी आज पुन्हा ही बाब सभागृहात उपस्थित करून हजारे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप केला. हजारे यांनी पोलीस संरक्षण नाकारले असल्याकडे नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी निवेदन करण्याचे आदेश सभापतींनी दिले. नितीन राऊत म्हणाले की, पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणातील आरोपींच्या चौकशीत हजारे यांना मारण्याची बाब प्रकाशात आली. पारसमल जैन यांनी ही बाब फेटाळली असल्याचे कळते. हजारे यांच्यासंबंधातील तपास प्रगतीपथावर आहे. अण्णा हजारे यांना चार पोलिसांचे संरक्षण पुरविण्यात आले आहे. हजारे यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली, असा सवाल कपिल पाटील यांनी केला तर मुख्य आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे का, अशी विचारणा अनिल परब यांनी केली. हजारे यांनी सुपारी कुणी दिली त्याचे नाव नमूद करण्याची मागणी अरविंद सावंत यांनी केली.

राज्याच्या सागरकिनारी १२ सागरी पोलीस ठाणी
मुंबई, ३ जून / प्रतिनिधी

राज्याच्या समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या सागरी किनारी १२ सागरी पोलीस ठाणी उभारण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे. राज्याच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी तटरक्षक दलासह भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आली आहे. सागरी भागातील हद्दीत गस्त आणि सुरक्षा याबाबतची जबाबदारी तटरक्षक दलाकडे देण्यात आली असल्याचेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे. बृहन्मुंबईतील बंदर परिमंडळामध्ये येणाऱ्या सागरी हद्दीमध्ये एकूण नऊ बंदरे असून प्रत्येक बंदरावर अहोरात्र पहारे तैनात करण्यात आलेले आहेत. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर चार पोलीस नौका व एक संयुक्त नौका गस्तीसाठी तैनात करण्यात आली आहे. दोन नौका बीएआरसी व ट्रॉम्बे परिसरात अत्याधुनिक सामग्रीसह सज्ज आहेत. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी गृह सचिव, केंद्र सरकार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीला न्यायालयीन चौकशी आयोगाचा दर्जा देण्यात आलेला नसला तरी समितीची कार्यकक्षा ठरविण्यात आली आहे, असेही जयंत पाटील यांनी अनंतराव थोपटे, सचिन अहिर आदी सदस्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.

केबल ऑपरेटरांकडून होणाऱ्या चोरीसंदर्भात कडक कायदा करणार
मुंबई, ३ जून / प्रतिनिधी

केबल ऑपरेटरकडून होणारी सॅटेलाइट सिग्नलची चोरी आणि करचुकवेगिरीच्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी लवकरच कडक कायदा करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला स्पष्ट केले. त्याचप्रमाणे महसूल आणि अन्य संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तालुका आणि जिल्हा पातळ्यांवर तपासणी मोहीम हाती घेण्यात येईल, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. मुंबईतील केबल ऑपरेटर सॅटेलाइट सिग्नलची चोरी करून कोटय़वधींचा गैरव्यवहार करीत असल्याबद्दलचा मूळ प्रश्न हरिश्चंद्र पाटील, सरदार तारासिंग आदी सदस्यांनी विचारला होता. कल्याण येथील स्टार डेन या कंपनीच्या संमतीशिवाय त्यांच्या कंपनीच्या प्रक्षेपणाच्या सिग्नलवरून प्रक्षेपण चोरून बिर्ला कॉलेज परिसरातील टीव्ही, केबल ग्राहकांना अनधिकृतपणे प्रसारित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे नसीम खान म्हणाले. या चोरीप्रकरणी ऑक्टोबर २००८ ते जानेवारी २००९ या कालावधीत दररोज सुमारे ६० हजार रुपयांचा असा सुमारे ६.९० कोटी रुपयांचा महसूल बुडविण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

देवीदास गायकवाड हत्येप्रकरणी चौघांना अटक
कल्याण, ३ जून/वार्ताहर

कल्याण पूर्व भागातील युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास गायकवाड यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी योगेश धामापूरकर, शेखर धामापूरकर, अमित सोनावणे, मनोज कळशीकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. कल्याण पूर्व भागातील युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास गायकवाड हे साईबाबा केबल या नावाने केबलचा व्यवसाय करत होते. नवपंचक सोसायटीची केबल जोडणी न्यायालयाच्या आदेशने गायकवाड यांनी तोडली. या वादातून काल त्यांच्यावर हल्ला झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका नगरसेवकाचा या खुनामागे सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करून याबाबत सबळ पुरावे मिळताच नगरसेवकाला अटक करण्यात येईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या बोलीवर सांगितले.

विद्यार्थी सुरक्षा अपघात विमा योजना सर्व शाळांना लागू करणार
मुंबई, ३ जून/प्रतिनिधी
राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा अपघात विमा योजना आता अनुदानित व विना अनुदानित सर्वच शाळांना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.या योजनेची व्यापक माहिती शिक्षक व पालकांना नसल्याने अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहिलेत का, असा प्रश्न प्रकाश शेंडगे व पांडुरंग फुंडकर यांनी विचारला होता. त्यावर विखे म्हणाले की, या योजनेसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र हे खरे आहे की, खेडय़ातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचावयाची आहे. त्यामुळेच ही योजना सर्वदूर नेण्यासाठी आता विनाअनुदानित शाळांसाठीही लागू करण्यात येईल. शिवसेनेचे दिपक सावंत म्हणाले की, या योजनेअंतर्गत चष्मा, दप्तर यांचे नुकसानही भरून दिले जाते. मात्र योजनेबाबत फारशी माहितीच लोकांपर्यंत नाही. तर शेंडगे म्हणाले की, ही योजना चांगली असली तरीही त्यासाठी अपघातानंतर सात दिवसांमध्ये शिक्षण खात्याकडे अर्ज करावा लागतो व ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. यावर विखे म्हणाले की, याबाबत विधि व न्याय खात्याशी चर्चा करून ही प्रक्रिया सोपी करण्याबाबत ठोस पावले उचलली जातील.

बाबासाहेब पुरंदरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा
मुंबई, ३ जून/प्रतिनिधी

मुंबईतील समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या समितीच्या अध्यक्षपदावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नियुक्त करण्यावरून सुरू झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पुरंदरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळला नसला तरी पुरंदरे यांना शिवसेना खंबीरपणे पाठिंबा देईल, असे आश्वासन शिवसेनाप्रमुखांनी दिल्याचे समजते. याबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या भेटीत खमंग, खुसखुशीत असे काही नाही. वासुदेव नावाच्या एका चित्रकारांनी शिवसेनाप्रमुखांचे चित्र काढले आहे. माझे चित्र काढण्याचे त्यांनी मान्य केले होते. ते काढून घेण्याकरिता मी तेथे गेलो होतो. त्यावेळी बाळासाहेबांबरोबर चित्रकला, चित्रकार व जुनी चित्रे या विषयावर सविस्तर चर्चा झाली.