Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

उद्धव ठाकरे यांची वक्तव्ये कारण की राजकारण
प्रतिनिधी

पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये यासाठी सर्वानी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे आणि कार्य करावे, असा सल्ला देऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी, पावसाळ्यात मुंबई जलमय झालीच तर त्याला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एमएमआरडीए जबाबदार असेल, असा टोला हाणला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात ठाकरे यांनी कोणत्या कारणांमुळे मुंबई जलमय होऊ शकेल याची माहिती नमूद केली आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही जबाबदारी झटकणारे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आले २६ चालले तीनच
सुनील डिंगणकर

मल्टिप्लेक्सचालक आणि हिंदी चित्रपट निर्माते-वितरक यांच्यातील वादामुळे सध्या हिंदी चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. परिणामी मराठी चित्रपटांना काहीसे मोकळे रान मिळाले होते. या वर्षी मे महिन्यातच नऊ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. जूनअखेपर्यंत प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांचा आकडा ३० वर पोहोचणार आहे. गतवर्षांच्या तुलनेत चित्रपटांच्या संख्येत वाढ झाली असली तरी तिकिटबारीवर ठसा उमटविण्यात मात्र केवळ तीनच चित्रपट यशस्वी ठरले आहेत.

रॅट रेसमध्ये पळणार नाही- रिद्धी
प्रतिनिधी

‘रॅट रेसमध्ये पळण्यापेक्षा स्वत:च्या अपेक्षांची पूर्तता करणे आणि त्याकरिता प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे,’ असे उद्गार २००८-२००९ या वर्षांतील सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या रिद्धी बोरसेने अलीकडेच येथे काढले. अंधेरी येथील राजहंस विद्यालयाची ती विद्यार्थिनी असून ९७.८ टक्के गुण मिळवून ती महाराष्ट्र व मुंबईतून मुलींमध्ये सर्वप्रथम आली आहे. सीबीएसईमध्ये मुलींमध्य प्रथम आलेल्या रिद्धीला बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे आहे.

ऋतू बंपी राईडचा!
पावसाळा हा सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू. मुंबईकरांना मात्र पावसाळा सुरू झाला की, अगदी काच लागतो. पाऊस म्हणजे तुंबणारे पाणी..पाऊस म्हणजे रस्त्यांवरील खड्डे..पाऊस म्हणजे वाहतूक कोंडी..अशी मुंबईकरांची ठाम समजूत झाली आहे आणि ती रास्तही आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार-पाच दिवस असे असतात की, त्या दिवशी मुंबईतील जनजीवन पूर्णत: विस्कळीत होऊन जाते. रुळांवर पाणी तुंबल्याने लोकल बंद पडतात. रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. एकप्रकारे मुंबई ठप्प होऊन जाते.

इंटरनेटच्या महाजालात आता महाराष्ट्र साहित्य परिषद!
प्रतिनिधी

मराठी भाषा आणि साहित्य प्रसारासाठी गेली १०० हून अधिक वर्षे काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेनेही आता इंटरनेटच्या महाजालात प्रवेश केला आहे. ‘मसाप’ने नुकतेच आपले स्वत:चे \www.masapaonline.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे मसापचे विविध उपक्रम, कार्यक्रम आणि त्यांचे काम एका क्लिकवर उपलब्ध झाले आहेत. मसापची स्थापना २७ मे १९०६ रोजी पुण्यात चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. मराठी भाषा व साहित्य यांची जपणूक, विकास आणि प्रसारासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली.

साहित्य महामंडळाच्या विरोधातील प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांची बैठक बारगळली
प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महामंडळाच्या विरोधात दंड थोपटून उभ्या राहिलेल्या काही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी एप्रिल महिन्यात बैठक घेण्याचे ठरवले होते. मात्र एक महिना उलटून गेला तरी अद्याप अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. तर महामंडळावर प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांना प्रतिनिधीत्व देता येणार नाही, घटनेत तशी तरतूद नाही, असे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले.

राज्यातील शाळांच्या बाकांवर जातीचे दाखले!
दिलीप शिंदे

सरकारी लालफितीच्या कारभाराचे चटके सर्वसामान्यांना नेहमीचे असले, तरी त्याची दाहकता विद्यार्थ्यांपर्यत पोहचत नाही. मात्र महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी त्याची जाणीव होते आणि जातीचा दाखला मिळविण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांवर रडकुंडीला येण्याची पाळी येते. म्हणूनच २००९-१० या शालेय वर्षांपासून ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर राज्यभरातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाकांवरच जातीचे दाखले उपलब्ध व्हावेत, असे आदेश आदिवासी विकास विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मिकी आणि डोनाल्डच्या नव्या गोष्टी पुस्तकस्वरुपात
प्रतिनिधी

सर्व वयोगटातील लहान मुलांना वेड लावणारी मिकी माऊस आणि डोनाल्ड डक ही पात्रे आता दर महिन्याला पुस्तकरुपाने भेटायला येणार आहेत. दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात मिकी माऊस व डोनाल्ड डकच्या नव्या गोष्टींचा समावेश असणार आहेत. विशेष म्हणजे ही पुस्तके इंग्रजीसह हिंदीतही उपलब्ध होणार आहेत. मिकी माऊस व डोनाल्ड डकच्या या गोष्टी भारतात पहिल्यांदाच उपलब्ध होणार असून वॉल्ट डिस्ने कंपनीच्या डिस्ने पब्लिशिंग वर्ल्ड वाईड या विभागातर्फे अलीकडेच ही घोषणा करण्यात आली. या संदर्भात वॉल्ट डिस्ने कंपनीच्या डिस्ने पब्लिशिंग वर्ल्ड वाईड या विभागाने भारतातील ज्युनिअर डायमंड या प्रकाशन संस्थेबरोबर करार केला आहे. मिकी माऊस आणि डोनाल्डच्या गोष्टी लहानांबरोबरच मोठय़ांमध्येही लोकप्रिय असून भारतात मिकी माऊस व डोनाल्ड डकची पुस्तके प्रकाशित करताना येथील सामाजिक जीवन व भारतातील एकंदर वातावरण या गोष्टी सुसंगत राहतील याची खबरदारी घेण्यात येईल, असे डिस्ने कंझ्युमर प्रॉडक्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या पुस्तकांची किंमत २५ रुपये इतकी ठेवण्यात आली असून मिकी आणि डोनाल्डच्या नव्या गोष्टी दर महिन्याला पुस्तक स्वरुपात प्रकाशित होणार आहेत.

अनधिकृत मोबाइल टॉवरबाबत धोरण आखणार
प्रतिनिधी

नवी मुंबई परिसरातील मोबाइल कंपन्यांच्या टॉवरसंदर्भात राज्य सरकार लवकरच एक धोरणात्मक निर्णय घेणार असून त्यासाठी आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान खात्याशी सल्लामसलत करून मोबाइल कंपन्यांना टॉवरसाठी परवानगी देण्याबाबतचे धोरण आखण्यात येणार आहे. नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनीच ही माहिती आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. महानगरपालिका हद्दीतील ३२२ अनधिकृत टॉवरपैकी २८ मोबाइल टॉवर निष्कासित करण्यात आले असले तरी ९३ मोबाइल टॉवरबाबत सर्वोच्च न्यायालयाने ९ जानेवारी २००९ रोजी जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. उर्वरित २०२ मोबाइल टॉवरपैकी १३ टॉवर नियमित करण्यात आले असून अन्य १३ टॉवरबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तर राहिलेले १३५ मोबाइल टॉवर निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे, असे सरकारने स्पष्ट केले.

गिरिमित्र संमेलनानिमित्त विविध स्पर्धा
प्रतिनिधी

गिर्यारोहक मंडळींतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही १२ जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे गिरिमित्र संमेलनानिमित्त गिर्यारोहणातून सामाजिक बांधीलकी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शालेय, महाविद्यालय व खुल्या गटात होणाऱ्या निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून सुमारे ५०० ते ७५० शब्दांत स्पर्धकांनी आपले निबंध २३ जूनपर्यंत आयोजकांकडे पाठवायचे आहेत. त्याचप्रमाणे छायाचित्र स्पर्धा व दृकश्राव्य सादरीकरण स्पर्धा घेण्यात येणार आहेत. निसर्ग चित्र, गिर्यारोहण असे दोन विषय त्यासाठी ठेवण्यात आले आहेत. छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत १ जुलै अशी आहे. तर दृकश्राव्य सादरीकरणासाठी एकाच विभागात निसर्ग, वन्यजीव, प्राणी, पक्षी आदी विषय ठेवण्यात आले आहेत.२० मिनिटाचे माहितीपट, सादरीकरण, फिल्म यामध्ये स्पर्धकांना पाठविता येतील. यातील गुणानुक्रमे पहिल्या तीन फिल्म संमेलनात पाठविण्यात येतील. तर नवीन उपक्रमांसाठी खास वेळ देण्यात येईल. यामध्ये सादरीकरणाची मर्यादा १० मिनिटे आहे. उपक्रमाचे नाविन्य त्यामध्ये अपेक्षित आहे. सादरीकरणांसाठी अंतिम मुदत २३ जून आहे. त्याचप्रमाणे इंडियन माउंटनिअरिंग फेडरेशनचे अध्यक्ष मेजर एच.पी.एस. अहुलुवालिया यांच्या मुलाखतीचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
गिर्यारोहण व कायदेशीर बाबी यावर परिसंवादाचे आयोजनही यावेळी करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दू.क्र.९९६७५९३३२४ येथे संपर्क साधावा. संमेलनाचे यंदाचे आठवे वर्षे आहे.

‘आयसीए’चा ‘अण्णामलाई युनिव्हर्सिटी’शी करार
इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर अकाउंट्सने (आयसीए) दक्षिण भारतातील अण्णामलाई विद्यापीठाशी करार केला आहे. या करारांतर्गत विद्यार्थ्यांला अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग व आरओसी या विषयातील प्रात्यक्षिक ज्ञान आधुनिक सॉफ्टवेअर्स व अद्ययावत कॉम्प्युटर अॅप्लिकेशनन्ससहीत प्राप्त करण्याची अनोखी संधी मिळते. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीच प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) दिले जाते व त्यातून ‘कमवा व शिका’ ही संधीही दिली जाते. या खास वैशिष्टय़ामुळेच हा अभ्यासक्रम इतरांच्या तुलनेत आगळा असा ठरला आहे. अशा पद्धतीने तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांकडे ‘अण्णामलाई युनिव्हर्सिटी’ची बी. कॉम (फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट) ही पदवी आणि दोन वर्षांचा कामाचा अनुभव असतो. अशा स्वरुपाचा हा भारतातील पहिलाच अभ्यासक्रम आहे. ‘आयसीए’च्या देशभरात ३०० शाखा असून १०० कोटी रुपये उलाढाल आहे. येत्या वर्षभरात आणखी १५० केंद्रे उघडण्याची योजना असून त्यातही दक्षिण भारतावर (तामिळनाडू, कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेश या राज्यांवर) अधिक भर दिला जाणार आहे. मार्च २०१० पर्यंत प्रत्येक जिल्ह्य़ाच्या मुख्य ठिकाणी केंद्र उघडण्याची ‘आयसीए’ची योजना आहे.