Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

प्रोग्रेसिव्ह सोसायटी-लोकसत्तातर्फे रविवारी अहमदनगरला व्याख्यान
यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचाही सहभाग

पुणे, ३ जून / खास प्रतिनिधी

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि लोकसत्ता तर्फे ‘उच्चशिक्षण - दशा आणि दिशा’ या विषयावर आयोजित राज्यव्यापी व्याख्यानमालेंतर्गत येत्या रविवारी (दि. ७) अहमदनगरला व्याख्यान होत आहे. राज्याचे शालेयशिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील या प्रसंगी अध्यक्षस्थानी असून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अशोक कोळस्कर यांचे प्रमुख भाषण होईल. पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यंदा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे.

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा काँग्रेसचा ठराव
नगर, ३ जून/प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने आघाडी न करता स्वबळावर लढवाव्यात, अशा मागणीचा ठराव माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी आयोजित केलेल्या जिल्हा काँग्रेसच्या मेळाव्यात आज करण्यात आला. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी गोपाळराव झोडगे यांची नियुक्ती करण्याच्या मागणीचा ठरावही यावेळी करण्यात आला. या मेळाव्यास कृषिमंत्री बाळासाहेब थोरात समर्थक अनुपस्थित होते.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बदलाची जोरदार मागणी केली.

भाजप-सेनेतर्फे सोमवारी जिल्ह्य़ात ‘रास्ता रोको’
नगर, ३ जून/प्रतिनिधी

खते व बियाणे वितरणातील गैरव्यवहारासह विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ८) भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या वतीने जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांमध्ये ‘रास्ता रोको’चा इशारा देण्यात आला आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात त्यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी बाबूराव केंद्रे यांनाही निवेदन दिले.खते व बी-बियाणांच्या वितरणातील गैरव्यवहारांमुळेच जिल्ह्य़ात टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप ढाकणे यांनी केला.

बिलाअभावी कर्जतमधील तीनही टँकर उभे!
कर्जत, ३ जून/वार्ताहर

पाणी टँकर पुरविणारी सहकारी संस्था व जिल्हा प्रशासनातील वादामुळे तालुक्यातील तीनही टँकर काल (मंगळवार)पासून उभे आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.
ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असतानाही तालुक्यात एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. जिल्हाधिकारी अन्बलगन यांनी मागील आठवडय़ात येथे टंचाई बैठक घेतली.

मनोवृत्ती
अॅटिटय़ूड डिटरमाईन्स अॅल्टिटय़ूड. तुमची वृत्ती ठरवते तुमची उंची. तात्पर्य, तुम्ही जे काही असता किंवा आयुष्यात होता, त्याला तुमच्यातील उपजत किंवा परिश्रमपूर्वक जोपासलेली वृत्तीच प्रामुख्याने कारणीभूत ठरते. कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीचं उदाहरण घ्या. सहज मनात येतो वैश्विक पातळीवर कीर्तिमान आणि या समहा म्हणजे द वन अॅण्ड ओन्ली ठरलेला आपला सचिन तेंडुलकर किंवा आठवावेत निरंतर अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाला अपूर्व शब्दरूप देणारे लेखक विजय तेंडुलकर किंवा या घडीला स्मरावेत, निबीड सामाजिक विषमतेच्या खाईत जन्माला येऊनही आज अमेरिकेच्या सर्वश्रेष्ठपदी विराजमान झालेले प्रेसिडेंट बराक ओबामा.

निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे
विभागप्रमुख, अभियंते धारेवर!

नगर, ३ जून/प्रतिनिधी

विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज झालेल्या बैठकीत महापौर संग्राम जगताप, आयुक्त कल्याण केळकर, उपायुक्त अच्युत हांगे यांनी महापालिकेचे सर्व विभागप्रमुख, अभियंत्यांना धारेवर धरले. निकृष्ट झालेली कामे पुन्हा करायला लावा, अशा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची नावे काळ्या यादीत टाका; अन्यथा तुमच्यावरच कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच वरिष्ठांनी भरला. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचे बेकायदा बांधकाम पूर्वसूचना न देता पाडा, असा आदेशही देण्यात आला.

कोपरगावला दोन अपघातांत दोघांचा मृत्यू; चौघे जखमी
कोपरगाव, ३ जून/वार्ताहर

तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोनजणांचा मृत्यू झाला. एका रस्ते अपघातात दोन वाहनांच्या धडकेमुळे ४जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यास शिर्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील पूर्व भागात उक्कडगाव शिवारात सविता अरुण निकम (वय २५) या महिलेचा पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत सुरेगाव शिवारात मोटरसायकल (एमएच २० एक्यू ४७६५) घसरल्याने अजय सुरेश कोळेकर (वय १२) या मुलाचा मृत्यू झाला. नगर-मनमाड रस्त्यावर नवलेवस्तीजवळ मोटार (एमएचए ७८९५) व जीप (एमएच ४२ बी ४५७३)ची मध्यरात्री दोनच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारजण जखमी झाले. जखमींमध्ये किरण अशोक पगारे, शेख इसाक अन्सार, भरत दिनेश जाधव व कार्तिक मुरलीधर बोरावके यांचा समावेश आहे. कार्तिक गंभीर जखमी झाल्याने त्यास शिर्डी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी संदीप दशरथ वाघुले (रा. शेरी, ता. आष्टी. जि. बीड) या जीपचालकास अटक केली आहे. मोटरसायकल चोरीस
शहरातील मुळे रुग्णालयासमोर लावलेली मोटरसायकल (एमएच २० एल ५११) अज्ञात चोरटय़ाने चोरून नेली. दत्तात्रेय धोंडिराम आचारी (रा. संवत्सर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

अपघातानंतर पेटल्याने दोन्ही मालमोटारी खाक
मिरजगाव, ३ जून/वार्ताहर

मालवाहतूक करणाऱ्या दोन मालमोटारी समोरासमोर धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत जळून पूर्ण खाक झाल्या. आज पहाटे पाचच्या सुमारास नगर-सोलापूर रस्त्यावर येथून १२ किलोमीटर अंतरावरील थेरगाव फाटय़ावर हा अपघात घडला. अपघातानंतर सुमारे अडीच तास या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती. आगीनंतर दोन्ही वाहनांचे केवळ सांगाडेच शिल्लक राहिले. दोन्ही वाहने पोलिसांनी रहिवाशांच्या मदतीने जेसीबीच्या साह्य़ाने रस्त्याकडेला टाकून दिल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. अपघातातील दोन्ही वाहनांचे चालक व क्लीनर धडकेनंतर पळून गेले. त्यामुळे याबाबत पोलिसांत नोंद होऊ शकली नाही. नगरहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मालमोटारीत (एमएच १८ एम ६२४९) कांद्याच्या गोण्या होत्या, तर सोलापूरहून नगरकडे येणाऱ्या मालमोटारीत (टीएन ६७ डी १९५३) काडेपेटय़ांचे बॉक्स होते. धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांनी लगेच पेट घेतला. आगीची धग इतकी तीव्र होती की, काही वेळातच दोन्ही वाहने आगीने वेढली जाऊन जळून पूर्णत: नष्ट झाली. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी नगर-सोलापूर मार्गावरील वाहतूक सुमारे अडीच तास विस्कळित झाली होती. रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी जेसीबी यंत्राच्या साह्य़ाने वाहने दूर केल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. दोन्ही वाहने मालासह जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

राज्य बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात
राहुरी, ३ जून/वार्ताहर

पंचावन्नाव्या महाराष्ट्र कनिष्ठगट राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अिजक्यपद स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन झाले. राज्यातील २० जिल्हा संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नगर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन व महाराष्ट्र असोसिएशन यांच्या वतीने कै. दादासाहेब तनपुरे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन केले गेले. दि. ५ जूनपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. वाय. केंद्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल कासार होते. यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार अभिजीत भांडे, असोसिएशनचे राज्याध्यक्ष डी. एस. सुपे, सचिव सुरेश बोंगाडे, मच्छिंद्र कराळे, प्रा. शरद पाटील, मुख्याधिकारी रवींद्र जाधव, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे आदी उपस्थित होते. स्पर्धेत अमरावती, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, नाशिक, धुळे, वर्धा, नगर, पुणे आदी जिल्ह्य़ांतील १९ वर्षांखालील मुला-मुलींचे जिल्हा संघ सहभागी झाले आहेत. आज सायंकाळी नगर-गडचिरोली, अमरावती विरुद्ध कोल्हापूर संघांच्या लढतींपासून स्पर्धाना प्रारंभ झाला.

विविध मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा
कर्जत, ३ जून/वार्ताहर

येथील वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटना व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने उद्या (गुरुवारी) विविध मागण्यांसाठी संघटनेचे अध्यक्ष शाकीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये संजय गांधी निराधार योजनेची बैठक वर्ष झाले, तरी अद्यापि घेतली नाही. ती सरकारी नियमानुसार घेण्यात यावी. इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेच्या दारिद्र्य रेषेखालील ६५ वर्षांच्या व्यक्तींची तहसीलदार अडवणूक करतात. डॉक्टरांचा दाखला ते नाकारत असून, जे शाळेतच गेले नाहीत त्यांनी कोणत्या शाळेतून दाखला आणावा, हा प्रश्न आहे. तसे दाखले नसल्याने कर्ज प्रकरणे अकरा महिन्यांपासून पडून आहेत. विधवा व परितक्ता महिलांसाठी स्वस्त धान्य दुकानातून कमी दराने धान्य मिळावे, याबाबतचे अर्ज येथील पुरवठा विभागात पडून आहेत. त्याची चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाची वेतनश्रेणीसाठी निदर्शने
नगर, ३ जून/प्रतिनिधी

केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या अभियंत्यांनाही वेतनश्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघातर्फे आज सिंचन भवनासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्राप्रमाणे राज्य सरकारी अभियंता कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मात्र, हकीम समितीने या धोरणाला काळे फासले. या समितीचा अहवाल फेटाळावा, अशी मागणी या वेळी संघटनेने केली. जेवणाच्या सुटीदरम्यान झालेल्या या निदर्शनात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, नगररचना, जीवन प्राधिकरण, महापालिका, म्हाडा या विभागांतील अभियंते सहभागी झाले होते. अधीक्षक अभियंता चंद्रमोहन हंगेकर, कनिष्ठ अभियंता संघटनेचे जे. जी. देशमुख यांची या वेळी भाषणे झाली. कार्यकारी अभियंता डी. व्ही. ठिगळे, व्ही. डी. होशिंग, व्ही. बी. कुलकर्णी, जी. बी. नान्नोर, जी. डी. पोखरकर या वेळी उपस्थित होते. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर २० जून रोजी सर्व अभियंते सामुदायिक रजेवर जातील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

ग्रामस्थ दिन योजनेच्या अभ्यासासाठी ‘यशदा’ची भेट
संगमनेर, ३ जून/वार्ताहर

नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजय चहांदे यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या ग्रामस्थ दिन योजनेचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या ‘यशदा’ संस्थेच्या अभ्यासगटाने आज सावरगाव तळ येथे भेट दिली. विभागीय आयुक्त डॉ. चहांदे यांनी साकारलेल्या ग्रामस्थ दिन योजनेची अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. आज तालुक्यातील १५ गावांमध्ये ग्रामस्थ दिन पार पडला. ग्रामस्थ दिनाचे स्वरूप, उद्दिष्ट, ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण, महसूल विभागाची कामे, ग्रामस्थांचा सहभाग याविषयी अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या यशदा संस्थेच्या अभ्यासगटाने सावरगाव तळ येथे भेट दिली. या वेळी विभागीय आयुक्त कार्यालयाचे समन्वयक कैलास मोरे, तहसीलदार भगीरथ दौडे, तालुका कृषी अधिकारी राजाराम गायकवाड आदींसह अधिकारी उपस्थित होते. या वेळी अभ्यासगटाने सविस्तर माहिती घेतली. त्यांनी ग्रामस्थ दिनाविषयी काढलेल्या निष्कर्षांतून हे काम उत्कृष्ट असल्याची पावती तहसीलदार दौडे यांनी दिली.