Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

वाघिणीच्या तीन बछडय़ांची मोकळ्या जागेत मनसोक्त दंगामस्ती
महाराजबागेने अनुभवला एक अनोखा स्वातंत्र्य सोहोळा!!!

नागपूर, ३ जून/प्रतिनिधी

वन..टू..थ्री.. अॅन्ड गेट सेट गो.. असे म्हणताच चेरी, ली आणि जान जे धावत सुटले, ते थांबता थांबेना. तब्बल साडेचार महिन्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे त्यांना काय करू आणि काय नको असे झाले होते. आईविना वाढलेल्या चेरी, ली आणि जान यांचा हा स्वातंत्र्य सोहळा जितका वेळ डोळय़ात साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तितका कमीच होता. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाअंतर्गत येणाऱ्या महाराजबागेत २३ जानेवारीला वाघिणीचे अवघ्या एक ते दीड महिन्याचे हे तीन बछडे दाखल झाले तेव्हा काहीसे बावरलेले होते. इवलेसे हातपाय आखडून साऱ्यांना किलकिल्या डोळ्यांनी बघत होते.

सेंट्रल बँकेला ‘नागपुरी’ झटका; ७६ लाखांनी फसवले
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

ग्राहकाने दिले बनावट धनादेश ,पोलीस ठाण्यात तक्रार धनादेश बँकेच्या खात्यात जमा करताना ‘क्लिअरिंग’साठी बँकेमार्फत न पाठवता संबंधित ग्राहकावर विश्वास ठेवून धनादेश त्याच्या स्वाधीन करणे सेंट्रल बँकेच्या घाटलाडकी शाखेला बरेच महागात पडले. बनावट धनादेशाद्वारे नागपूरच्या रमेश राठी याने बँकेतून तब्बल ७६ लाख ४७ हजार ९५० रुपये काढल्याचे बँकेच्या लक्षात आले. या प्रकरणाची तक्रार सेंट्रल बँकेचे विभागीय व्यवस्थापक राजेश मेश्राम यांनी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात केली आहे.

आज बारावीचा निकाल इंटरनेट-मोबाईलवरही माहिती
नागपूर, ३ जून/ प्रतिनिधी

बारावीचा निकाल उद्या, गुरुवारी जाहीर होणार असून, इंटरनेट आणि मोबाईलवरूनही त्याची माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्णोपकर्णी निकाल कळून नैराश्याने आततायीपणाची कृती करण्याचे प्रकार टाळण्यासाठी मूळ गुणपत्रिका पाहून या पर्यायी व्यवस्थेकडून कळणाऱ्या निकालाची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

विद्यार्थी आणायचे कुठून..? आता महाविद्यालयांनाही घोर
ज्योती तिरपुडे, नागपूर, ३ जून

लाखो विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे गेले असले तरी निकाल घोषित झाल्यावर त्यातील निम्मे तरी विद्यार्थी पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान विषयांना प्रवेश घेतील काय, असा घोर महाविद्यालयांना लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल उद्या, गुरुवारी जाहीर होत असल्याने आता विद्यार्थी व पालकांबरोबरच महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि शिक्षकांचेही लक्ष या निकालाकडे लागले आहे. दरवर्षी गवतासारखे उगवणारे महाविद्यालयांचे पीक पाहता महाविद्यालयांसाठी विद्यार्थी आणायचे कुठून, असा मोठा प्रश्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांना छळतो आहे.

मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न
आईसह दोघांना पाच वर्षांचा कारावास

नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

चौदा वर्षांच्या मुलाला विषारी द्रव्य पाजल्यानंतर गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या मातेसह दोघांना सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. ललिता रमनराव गोनुगुंटा (रा. तिरुमलगिरी, सिकंदराबाद) व अनिलसिंह रामदयालसिंह बैस (रा. होशंगाबाद, मध्यप्रदेश) ही आरोपींची नावे आहेत. सेंट्रल अॅव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमध्ये ७ मे २००७ला रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

विदर्भ नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. अदलखिया तर सचिवपदी डॉ. बजाज
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटना, विदर्भ शाखेच्या अध्यक्षपदी वर्धेचे डॉ. विनोद अदलखिया यांची तर सचिवपदी नागपूरचे डॉ. अनिल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ शाखेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे. उपाध्यक्ष- डॉ. डी. बत्रा, कोषाध्यक्ष डॉ. निता राठी, सहसचिव डॉ. प्रदीप सुने. अन्य सदस्यांमध्ये डॉ. आर. जोशी, डॉ. ए. भुयार, डॉ. एस. जयपुरी, डॉ. ए. सोनकिया, डॉ. प्रशांत अग्निहोत्री यांचा समावेश आहे. नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ ७ जूनला रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहमदाबादचे डॉ. पी.एन. नागपाल आणि कोचिनच्या डॉ. मिनू मॅथन उपस्थित राहणार आहेत. पदग्रहण समारंभानंतर निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विदर्भातील जास्तीत जास्त नेत्रतज्ज्ञांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव डॉ. अनिल बजाज यांनी केले आहे.

तिघा चोरटय़ांना मुद्देमालासह अटक
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

पिवळी नदी येथील पाली इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान फोडून ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचा ऐवज जप्त केला. मुस्तकीम करीम खान (१९), नदीम मेहमूद खान (१९) आणि सचिन शांताराम उरकुडे (२०) सर्व रा. यशोधरानगर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी २५ मेच्या मध्यरात्रीनंतर पाली इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे टिनाचे शेड वाकवून आतमध्ये प्रवेश केला व दुकानात ठेवलेले १० नग मोबाईल, डी.व्ही.डी. प्लेअर, डीश टीव्ही बॉक्स, एक नग डी.टी.एच., दोन मिक्सर, ९ नग कुलर मोटर असा एकूण ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने दुकान मालक मुकेश शिवमोहन पाष्टी यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणात १ जूनला वरील आरोपींना अटक केली व त्यांच्या ताब्यातून चोरीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त बोबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धोत्रे यांच्या सूचनेनुसार हे.कॉ. रफीक खान, पो.कॉ. धर्मेद्र वाहने, उमेश खोब्रागडे, जयंत शंभरकर यांनी केली.

‘मिनी महापौरांना’ही वाहनाची सुविधा
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या वॉर्ड समितीच्या सभापतींना महापालिकेने वाहन उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर वर्षांकाठी १७ लाखांचा बोझा पडणार आहे.
प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचा एक भाग म्हणून प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी वॉर्ड समिती स्थापन करण्यात आली असून त्याच्या सभापतींची निवड अलीकडेच करण्यात आली आहे. दहाही सभापतींना कार देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी या सवार्ंना कार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक झोनमध्ये पूर्वीच कक्ष उपलब्ध करून दिले आहेत. सभापतींना झोनचा अर्थसंकल्प तयार करावा लागणार आहे. पाच कोटी रुपयांपर्यंत खर्चाचे अधिकार समितीला आहे. कामांची देखभाल व दुरुस्ती नीट होते की नाही यावर अध्यक्षांचे नियंत्रण राहील. लहान-मोठय़ा कामांसाठी नागरिकांना महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता मिनी महापालिकेच्या स्वरूपात वॉर्ड समित्या स्थापन झाल्याने नागरिकांची अनेक कामे समित्यांच्या माध्यमातून होतील. घरांचे नकाशे, तीन ते चार मजली इमारतींचे नकाशे मंजुरी, गटारींची समस्या, उद्याने, मैदाने आदी सर्व कामांवर अध्यक्षांचे नियंत्रण राहणार आहे.

दूरध्वनीवरून चुकीची माहिती दिल्याने प्रवाशांच्या गाडय़ा चुकल्या
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

प्रवाशांना माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या १३३ आणि ३९ या दूरध्वनी क्रमांकावर चुकीची माहिती देण्यात आल्याने, मंगळवारी अनेक प्रवाशांची गैरसोय झाली, काही प्रवाशांची गाडी चुकल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. कडबी चौक येथील रहिवासी व स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी एल.पी. मिश्रा (६२) यांना २६६९ गंगाकावेरी एक्सप्रेसने छापरा येथे जायचे होते. त्यांनी घरूनच दूरध्वनीवरून गाडीची स्थिती जाणून घेतली, गाडी एक तास उशिरा येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याने ते त्यानुसार रेल्वे स्थानकावर पोहचले मात्र गाडी निघून गेली होती. असाच अनुभव सत्यनारायणराव यांनाही आला ते विजयवाडा-वाराणसी या गाडीने प्रवास करणार होते. त्यांचीही गाडी चुकली. सरासरी १५ ते २० प्रवाशांना रेल्वेच्या गलथानपणाचा फटका बसला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी स्थानकावरच संताप व्यक्त केला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर त्यांनी त्याची दखल घेतली नाही. वातावरण आणखी तापत असल्याचे निदर्शनास आल्यावर नागपूर विभागाचे वाणिज्य प्रबंधक कोरी स्थानकावर आले व त्यांनी प्रवाशांना दुसऱ्या दिवशीच्या आरक्षणाची व्यवस्था करून दिली.

डॉ. श्रीकांत जिचकार यांचा स्मृतिदिन
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यात सातत्याने नवीन शिकण्याची जिद्द होती. आयुष्यभर ते विद्यार्थीच म्हणूनच जगले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मा.गो. वैद्य यांनी केले.
ज्ञानयोगी, माजी खासदार श्रीकांत जिचकार यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सिव्हिल लाईन्स येथील सांदीपानी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात मा.गो. वैद्य बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. जिचकार यांची अभ्यासूवृत्ती आणि काम करण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकला. प्रत्येक वेळी त्यांची भेट झाली असता ते नवीन विषयावर चर्चा करीत होते, असे वैद्य म्हणाले. यावेळी डॉ. गांधी यांनी जिचकार यांच्यावरील कविता सादर केली. जिचकार यांच्यासह कार अपघातात निधन झालेले श्रीराम धवड यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना, पत्नी राजश्री, मुलगी मैत्रेयी, मुलगा याज्ञवल्क्य यांच्यासह अ.भा. काँग्रेसचे सचिव अविनाश पांडे, रमेश गिरडे, राजू अकोलकर, बाळासाहेब सपकाळ, प्रमोद जैस्वाल, रमेश फुके, कमलेश समर्थ, नगरसेवक प्रकाश गजभिये, नगरसेविका प्रगती पाटील, सलिल देशमुख आदींनी श्रद्धांजली वाहिली. जिचकार यांच्या आजनगावातील त्यांच्या समाधीस्थळीही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राजश्री जिचकार यांच्या हस्ते गावातील मुलांना वह्य़ा, पुस्तके व दप्तराचे वाटप करण्यात आले.

‘११ वीच्या प्रवेश यादी पाठोपाठ आरक्षित प्रवर्गाची यादी जाहीर करा’
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

एकाचवेळी गुणवत्ता व आरक्षित जागांविषयी माहिती मिळून प्रवेशाचे महाविद्यालय ठरवण्याचा निर्णय घेणे सुलभ होण्याकरिता इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरिता गुणवत्ता यादी पाठोपाठ आरक्षित प्रवर्गाची यादी जाहीर करावी, अशी मागणी ओ.बी.सी. मुक्ती मोर्चाने केली आहे. ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे ११ वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसंबंधात काही सूचना करण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात यावी. प्रथम गुणवत्ता यादी व त्यानंतर आरक्षित प्रवर्गाची यादी जाहीर करण्यात यावी. आरक्षित गटातील विद्यार्थ्यांचा प्रवेश गुणवत्ता यादीत झाल्यास त्यांच्या शिक्षण शुल्काच्या सवलतीचे नुकसान होणार नाही. याची सूचना विद्यार्थ्यांना देण्यात यावी. प्रवेश प्रक्रियेत शाळा महाविद्यालयात सामाजिक गटाचे प्रतिनिधी घेण्यात यावे. तसेच अनुदानित-विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्रवेश शु:ल्क जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षण निरीक्षक एस.जी. मेंढे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात मुख्य संयोजक नितीन चौधरी, अॅड. अशोक यावले, कृष्णकांत मोहोड, प्रभाकर भडके, रवी लिखानकर, विजय ठवरे, मधुकर ढगे, नारायण चिंचोणे, सारंग फाये, जयंत अनंतवार आदी सहभागी झाले.

शासकीय योजना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवा -देशमुख
संपूर्ण स्वच्छता अभियान कार्यशाळा
नागपूर, ३ जून/ प्रतिनिधी

गावांच्या विकासाकरिता विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात येत असलेल्या तालुकास्तरावरील कार्यशाळांच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री अनिल देशमुख यांनी केले. संपुर्ण स्वच्छता अभियानातंर्गतच वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केलेल्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश मानकर, सभापती शालीनीताई सलाम, उपसभापती चंद्रशेखर चिखले, मुख्य कार्यपालन अधिकारी आनंद भरकाडे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश कुळकर्णी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा विषय मंत्रिमंडळात उपस्थित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. संपुर्ण स्वच्छता अभियानाला राजस्व विभागाची जोड दिल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभारही मानले. आतापर्यंत तेरा तालुक्यात तेरा कार्यशाळा घेण्यात आल्या. यास जवळपास पंधरा हजार लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता निखिल रौदळकर, मनीष हटवार, अंजली डांगे, अरुण चांदेकर, राजेंद्र काळे यांनी सहकार्य केले.

चार प्रतिभावंत तरुणींचे नागपूर,
३ जून / प्रतिनिधी

‘अलग अँगल’ तर्फे तृप्ती राठी, स्नेहल ओक लिमये, दर्शना लक्झीमन आणि श्वेता भट्टड या चार तरुणींचे ‘अलाईव्ह’ चित्रप्रदर्शन येत्या रविवारपासून उत्तर अंबाझरी मार्गावरील रवींद्रनाथ टागोर आर्ट गॅलरीत सुरू होत आहे. ज्येष्ठ मेंदूरोगतज्ज्ञ व सिम्सचे संचालक डॉ. जी.एम. टावरी यांच्या हस्ते रविवारी दुपारी ४ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी, ९ जूनला होणार आहे. प्रदर्शनात अॅब्स्ट्रॅक्ट पेटिंग्ज, लिथो प्रिंट्स, क्रिएटिव्ह प्रिंटिंग, शिल्पकला आणि इन्स्टॉलेशन आर्ट पद्धतीचा आनंद रसिकांना घेता येईल. ललित विकमसी यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. तृप्तीच्या चित्रांवर तिच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांचा प्रभाव आहे. स्नेहल ओक -लिमये वन्यजीव आणि पर्यावरणप्रेमी असल्याने तिने मानवी आकृत्यांना प्राण्यांचे आकार देऊन त्या माध्यमातून प्राण्यांचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तिची चित्रे ऱ्हास पावत चाललेल्या पर्यावरणाला आणि प्राण्यांना वाचवण्याची हाक देतात. दर्शनाची चित्रमालिका विचारचक्रावर आधारलेली आहे. अंतर्मनातील विचारांचे तरंग तिने चित्रांमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तर मेणाचा वापर करून हुबेहूब खाद्यपदार्थ तयार करणारी नागपूरची कलाकार श्वेता भट्टड हिच्या शिल्पकलेचा आनंदही रसिकांना घेता येईल. ‘अलाईव्ह’ चित्रप्रदर्शन रविवारपासून

अपुऱ्या अनुभवामुळे दोन उमेदवार अपात्र
कुलसचिव पदासाठी ९ उमेदवार रिंगणात
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

अपुऱ्या अनुभवापोटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदाच्या शर्यतीतील दोन उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहेत. कुलसचिव पदासाठी येत्या १४ जुलैला मुलाखत आयोजित करण्यात आली असून त्यात ९ उमेदवार मुलाखतीला सामोरे जाणार आहेत. प्रपाठक/ अधिव्याख्यात पदासाठी हवा असलेला ८ वर्षांचा अनुभव कमी पडत असल्याने एल.आय.टी. मधील दिलीप कावडकर आणि विज्ञान संस्थेतील रसायनशास्त्राचे डी.बी. पाटील या दोघांना अपात्र ठरवण्यात आले. कुलसचिव पदाच्या शर्यतीत गणित विभागातील के.सी. देशमुख, विद्या विभागातील उप कुलसचिव विलास रामटेके, विकास विभागाचे उप कुलसचिव पूरण मेश्राम, परीक्षा नियंत्रक देवेंद्रनाथ मिश्रा, लोकप्रशासनच्या विभाग प्रमुख प्रा. नीलिमा देशमुख, पुणे विद्यापीठातील आर.व्ही. वैद्य, ब्रम्हपुरीचे एन.एस. काकोडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य के.एम. भांडारकर आणि चंद्रपूरचे जी.आर. डायगव्हाणे यांचा समावेश आहे.