Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
चारित्रं खलु धम्मो

इ. स. पूर्वी सुमारे दोनशे वर्षे आचार्य कुंदकुंदस्वामी होऊन गेले. कुठल्याही पूजाविधीपूर्वी मंगलाचरण म्हटले जाते, त्यात सर्वप्रथम महावीरांना वंदन असते. नंतर त्यांचा दिव्यध्वनी- त्यांची तत्त्वं जनसमूहाला सांगणाऱ्या गौतम गणधरांना व नंतर कुंदकुंद आचार्याना वंदन असते. त्यांनी चौऱ्याऐंशी ग्रंथ लिहिले. त्यातले नऊ ग्रंथ आज उपलब्ध आहेत. योग, ध्यान, स्वाध्याय, चारित्र्य, खरी श्रद्धा ज्या द्रव्यांनी पृथ्वी बनली, त्यांची वैज्ञानिक माहिती अशा अनेक विषयांवर त्यांनी लिहिलं. धर्म म्हणजे काय सांगताना ते म्हणतात,
चारित्रं खलु धम्मो धम्मो जो सो समोत्ति गिद्दि रठो।
मोहव-खोह विहिणो परिणामो अप्पणो हि समो।।
प्रवचनसार ग्रंथातील एका एका श्लोकावर निरूपण करताना आचार्यानी एक कथा सांगितली-
एका राजाला धर्मग्रंथांचं शिक्षण देण्यासाठी एक मोठे पंडित रोज राजवाडय़ात येत असत. २५-३० वर्षे हा क्रम चालला एकदा राजा म्हणाला, पंडितजी, इतकी वर्षे सरली, पण मला खरं धर्मज्ञान झालंच नाही आणि तुम्हीही तेच तेच शिकवत राहिलात. तुम्हालाही खरं ज्ञान झालं असं वाटत नाही. धर्म म्हणजे काय हे मला समजलंच नाही, याचं कारण काय? पंडितजींना उत्तर देता आलं नाही. असेच काही दिवस गेले. एके दिवशी त्या नगरीत एक मोठे साधू आले. त्यांना वंदन करून पंडितजींनी राजाचं म्हणणं त्यांना सांगितलं. साधुमहाराज म्हणाले, ‘मला राजाकडे घेऊन चला. मी उत्तर देईन तुमच्या प्रश्नाचं.’ पंडितजी व साधू दरबारात आले. साधू म्हणाले, ‘फक्त अर्धा तास मला तुमचा राज्यकारभार चालवण्याची परवानगी द्या.’ राज्य कारभाराची सूत्रं हातात येताच साधूंनी राजाला व पंडितजींना वेगवेगळं एकमेकांजवळ घट्ट बांधून ठेवायची आज्ञा दिली आणि नंतर ते दोघांना म्हणाले, ‘चला, आता तुम्ही एकमेकांना बंधनमुक्त करा.’ तसं करणं शक्य नव्हतं, कारण दोघेही बांधले गेले होते. साधू म्हणाले, ‘शास्त्र ऐकून किंवा वाचून, शिकवून कोणी ज्ञानी होत नाही. तुम्ही दोघंही प्रपंचात, क्रोधमान, माया, लोभात, विकारवासनेत अजून गुंतलेले, बांधले गेलेले आहात. ज्या दिवशी तुम्ही त्यातून सुटाल, त्या दिवशी ज्ञानी व्हाल. ‘चारित्रं खलु धम्मो’ हे लक्षात घ्या.
लीला शहा

कु तू ह ल
कृष्णविवर- ३
कृष्णविवरांना स्वत:चे गुणधर्म असतात का?

भौतिकशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर कृष्णविवर ही विश्वामधील सर्वात साधी वस्तू असते. कोणत्याही वस्तूचे संपूर्ण स्वरूप समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्या वस्तूचा आकार, वस्तुमान, घनता, सममिती, अक्ष, तापमानाचा होणारा परिणाम, प्रकाशाचा होणारा परिणाम असे अनेक गुणधर्म माहीत असावे लागतात. मात्र कृष्णविवराच्या बाबतीत त्याचे संपूर्ण वस्तुमान हे एका बिंदूमध्ये एकवटलेले असते व त्याच्याबद्दलची सर्व माहिती ही कृष्णविवराचे वस्तुमान, विद्युतभार व कोनीय संवेग या फक्त तीन गुणधर्माच्या साहाय्याने मांडता येते. कोनीय संवेगाकडून कृष्णविवराच्या स्वत:भोवती फिरण्याच्या गतीची माहिती मिळते. बहुतांशी कृष्णविवरे ही विद्युतभाररहित असतात.
कृष्णविवरांचे त्यांच्या गुणधर्मानुसार वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. यातला सरळ साधा प्रकार म्हणजे श्वार्ट्झशिल्ड कृष्णविवरे (शून्य विद्युतभार आणि स्वत:भोवतीच्या गतीचा अभाव), यानंतर राइजनर- नॉर्डस्ट्रॉम कृष्णविवरे (स्वत:भोवतीच्या गतीचा अभाव), कर कृष्णविवरे (शून्य विद्युतभार) आणि कर-न्यूमान कृष्णविवरे (हे दोन्ही गुणधर्म शून्य नसलेली म्हणजेच सर्वसाधारण कृष्णविवरे) हे कृष्णविवरांचे अन्य प्रकार आहेत. प्रत्येक कृष्णविवराभोवती आपण एका अशा गोलाची कल्पना करू शकतो की जिथे वस्तूला कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणापासून निसटण्यासाठी तिचा आवश्यक वेग हा प्रकाशाच्या वेगाइतका प्रचंड असावा लागतो. या गोलाला कृष्णविवराचे घटनाक्षितिज असे म्हणतात. कोणतीही वस्तू एकदा घटनाक्षितिजाच्या आत गेली की ती परत कृष्णविवराच्या बाहेर येऊ शकत नाही. या घटनाक्षितिजाच्या बाहेर असलेल्या याहून मोठय़ा अशा अजून एका गोलाची कल्पना करू शकतो, की जर एखादा पदार्थ वा प्रकाशकिरण या गोलाच्या आत आला तर कदाचित तो कृष्णविवरामध्ये पडणार नाही, मात्र तो सतत कृष्णविवराभोवतीच फिरत राहील. याला कृष्णविवराचा प्रकाशगोल असे म्हणतात.
अनिकेत सुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
कैसर विल्यम दुसरा

जर्मनीला युरोपच्या नव्हे तर जगाच्या राजकारणात मानाचे स्थान मिळावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या जर्मनीच्या कैसर विल्यम दुसरा याचा जन्म २७ जानेवारी १८५९ रोजी पॉटस्डॅम येथे झाला. १८८८च्या सुमारास जर्मनीच्या गादीवर आरूढ होताच इंग्लंड आपला कट्टर शत्रू आहे हे जाहीररीत्या सांगितले. आंतरराष्ट्रीय राजकारणात नवख्या असणाऱ्या कैसरने आशिया, आफ्रिका खंडात काही वसाहती मिळवल्या. नौदलात वाढ केली, व्यापार वाढवला, उद्योगधंद्यांना प्रेरणा दिली. वसाहतवादाचा पुरस्कार केल्याने जर्मनीत तो लोकप्रिय ठरला. त्याने तुर्कस्थानच्या मदतीने आखलेल्या महत्त्वाकांक्षी बर्लिन-बगदाद रेल्वे प्रकल्प म्हणजे आशियातील आपल्या साम्राज्याला धोका असे फ्रान्स आणि विशेषत: इंग्लंडला वाटल्याने ते त्याचे वैरी बनले. रशियाला तर त्याने अगोदरच दुखावले होते. अशा स्फोटक वातावरणात १९१४च्या सुमारास ऑस्ट्रियाच्या राजपुत्राचा खून झाला. यावेळी कैसरसारख्या नेत्यांनी सामोपचाराचे धोरण धरले असते तर महायुद्ध टळले असते. पण आपली पोळी भाजून घेण्याच्या नादात त्यानेही महायुद्धाला खतपाणी घातले आणि तुर्कस्थानाबरोबर आघाडी करून इंग्लंड, फ्रान्स, रशियाला शह देण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्या महायुद्धात पराभव समोर दिसताच जर्मनीला वाऱ्यावर सोडून स्वत: हॉलंडला पळाला. तो जर सापडले असते तर इंग्लंडने त्याला फासावर लटकवले असते. आपले उर्वरित आयुष्य त्याने हॉलंडमध्ये आपल्या संपत्तीची देखभाल करण्यात घालवले. ४ जून १९४१ रोजी त्याचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
वृक्षाची छाया व वाटसरू

दोन प्रवासी रणरणत्या उन्हात वाट तुडवत होते. अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या. घसा तहानेने कोरडा पडला होता. उष्म्याने हातापायांतले त्राण गळाले होते. कुठे सावली दिसते का ते त्यांचे डोळे शोधत होते. कुठे तहान भागवायला पाणी मिळते का, यासाठी त्यांची नजर भिरभिरत होती. दोघांची नजर एका वृक्षाकडे गेली. त्या तापत्या जमिनीवर, खडकाळ माळरानावरही तो वृक्ष उभा होता. दोघेही सुखावले. बरे झाले, आता निदान घटकाभर थंडगार सावलीला विसावा घेता येईल, असा विचार करत दोघांची पावले वृक्षाच्या दिशेने अगदी भराभरा पडू लागली. कधी एकदा त्याच्या थंडगार छायेत या उन्हाच्या फुफाटय़ातून पोहोचतोय असे झाले. त्यांच्या अंगात चालण्याचे बळ आले. त्या वृक्षाला पाहून त्यांचे मरगळलेले मन पुन्हा उत्साहाने भरून गेले. दोघे प्रवासी हाश्हुश्श करत कपाळाचा घाम पुसत, कोरडय़ा ओठांवरून जिभ फिरवत एकदाचे वृक्षापाशी पोहोचले. दाट हिरव्यागार पानांनी त्याच्या फांद्या भरून गेल्या होत्या. त्या भव्य वृक्षाची दाट थंडगार सावली पडली होती. त्याच्या वर आलेल्या मुळाची उशी करून दोघांनी हातपाय ताणून दिले. विसावा मिळताच त्यांची थकलेली शरीरे सुखावली. पडल्या पडल्या एकाची दृष्टी वर गेली. तो म्हणाला, ‘‘एवढय़ा भल्या थोरल्या वृक्षाला एक फूल नाही की फळ नाही.’’ दुसरा म्हणाला, ‘‘होय रे! एवढा भरमसाट वाढलाय, पण फुकटच गेलाय. उपयोग काय असल्या झाडाचा. फळे असती तर निदान खाऊन तहान आणि भूक तरी भागवली असती. अगदी निकामी झाड आहे.’’ उन्हाचे चटके सोसून हैराण झालेल्या या दोन वाटसरूंना उजाड, वैराण माळावर आपल्या सावलीत चांगला विसावा मिळाला. थंडावा मिळाला. पाय पसरून ते इथे सुखाने झोपले आणि उलट आपलीच निंदा करताहेत हे ऐकून वृक्ष फार संतापला. आपण ज्यांना मदत केली ते आपलीच हेटाळणी करताना पाहून त्याला फार दु:ख झाले. त्याने रागावून आपली एक फांदी काड्कन तोडून दाण्दिशी खाली आपटली. दोघे मित्र म्हणाले, हय़ॅ, कसला हा वृक्ष. आतून पार पोखरलाय वाटतं वाळवीनं. एके दिवशी सगळाच उखडून पडेल झालं. आयुष्यात आपल्या वाईट काळात, संकटात किंवा आपण दु:खी असताना आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्ती भेटतात. त्यांच्याबद्दल मनात नेहमीच कृतज्ञताभाव ठेवावा. आपल्याला मदत करणाऱ्यांना नावे ठेवण्याचा, त्रास देण्याचा किंवा त्यांच्याशी वाईट वागण्याचा कृतघ्नपणा आपल्याकडून कधीही घडणार नाही, नकळतसुद्धा घडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांच्या उपकारांची नेहमी आठवण ठेवावी आणि संधी मिळेल तेव्हा त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा. (इसापनीतीमधील कथेचा आधार)
आजचा संकल्प- मी नेहमी कृतज्ञ राहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com