Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

ठाणे-नेरुळ-उरण मार्गावर लोकलच खडखडणार
जयेश सामंत

नवी मुंबईत द्रोणागिरी-उलवे भागात उभ्या रहाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विशेष आर्थिक क्षेत्रासारख्या जागतिकप्रकल्पांच्या शिरपेचातील तुरा ठरेल, अशा बेताने नेरुळ-उरण या पट्टय़ात दिल्लीच्या धर्तीवर मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रकल्प सिडकोने अखेर गुंडाळला आहे. ठाणे-नेरुळ-उरण या उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचा बळी देत त्याऐवजी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा निर्णय मध्यंतरी सिडकोने घेतला होता. अखेर रेल्वे मंत्रालयाच्या दबावामुळे ठाणे-नेरुळ-उरण मार्गावर मेट्रोऐवजी लोकलचा खडखडाटच ऐकू येईल, असे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे. मागील एक तप रडतखडत सुरू असलेल्या नेरुळ-उरण या उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचा खर्च चौपटीने वाढल्याने त्या जागी मेट्रो रेल्वेसारखा ग्लोबल टच असलेला प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न मध्यंतरी सिडकोने सुरू केला होता.

कल्चरल सेंटरने दिला सावरकरांच्या प्रतिभेला उजाळा!
पनवेल/प्रतिनिधी

‘सकाळीच तू तोडीत असता जाईजुईच्या फुला, माडीवरूनी सुंदर कन्ये पाहियली मी तुला..’ अतिशय तरल आणि तारुण्यसुलभ अशी ही कविता सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे, असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. स्वातंत्र्यवीरांच्या अशाच अनेक फारशा प्रचलित नसणाऱ्या रचनांवर आधारित ‘सागरा प्राण तळमळला..’ हा सांगीतिक कार्यक्रम पनवेल कल्चरल सेंटरतर्फे नुकताच आयोजित करण्यात आला होता. सेंटरच्याच सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची संहिता आणि संकल्पना सुरेश राव यांची होती. या अनोख्या कार्यक्रमाला रसिकांची हाऊसफुल्ल उपस्थिती होती. संस्थेच्याच गायक-वादक आणि संगीतकारांच्या योगदानातून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली, हे याचे प्रमुख वैशिष्टय़. जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहा, शतजन्म शोधताना, अनादी मी.. अशा काही प्रसिद्ध रचनांचा अपवाद वगळता संस्थेत सक्रिय असणाऱ्या नंदकुमार गोगटे, सुरेश राव, जयंत टिळक, अनिरुद्ध भिडे यांचा संगीतसाज लाभलेल्या सावरकरांच्या गीतांना रसिकांनी मनापासून दाद दिली. हे सदया गणया तार, अशीच सर्व फुले खुडावी, आर्यबंधू हो उठा उठा, अमुचा स्वदेश हिंदुस्थान, तू धैर्याची असशी मूर्ती, मला देवाचे दर्शन घेऊ द्या आदी रचनांना कल्चरल सेंटरच्या या सदस्यांनी चढविलेला स्वरसाज कोठेही नवखा अथवा विसंगत वाटला नाही. नव्याने रचलेल्या या गीतांसाठीचा वाद्यमेळही तितकाच दर्जेदार होता. अनिरुद्ध भिडे, अमेय फडके, राजसी वैद्य, माधुरी वैद्य, संगीता गोगटे, अभिमन्यू राव, अपूर्वा गोखले, तेजल देवळेकर, समृद्धी महाजनी, सिंगासने, चंद्रकांत मने, जगन्नाथ जोशी या गायकांनी, तसेच राजू मनोहर, अतुल माळी, अंकित झेमसे, नंदकुमार गोगटे, समीर कर्वे, सुरेश राव या वादकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. ज्योत्स्ना देऊसकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन केले. कार्यक्रमात सादर होणाऱ्या गीतांची पुस्तिका सर्व प्रेक्षकांना कार्यक्रमापूर्वी देण्यात आल्याने रसिकांना सावरकरांच्या प्रतिभेचा चांगल्या प्रकारे रसास्वाद घेता आला.

भ्रष्टाचारप्रकरणी कंत्राटदाराचे बँक खाते सील
बेलापूर/वार्ताहर :
अतिक्रमण हटविण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यावर अतिक्रमण हटविणारा कंत्राटदार एच. बी. भिसे व त्याचा सहकारी अजय म्हात्रे यांचे बँक खाते सील करण्याचे आदेश पालिका आयुक्त विजय नाहटा यांनी दिले आहेत. अतिक्रमण खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी लिपिक राजेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन उपायुक्त व एक सहाय्यक आयुक्त हेही अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कामात पाऊण लाखाचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विभाग अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत हा घोटाळा उघड झाल्यानंतर उपायुक्त एन. टी. जाधव यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून भिसे व म्हात्रे हे दोघेही फरार आहेत. म्हात्रे कंत्राटातील रक्कम स्वत:च्या खात्यावर वळवून घोटाळ्याचे व्यवहार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लेखा परीक्षण अहवालात एक अतिक्रमण काढण्यासाठी ४० हजार रुपये खर्च झाल्याने याबाबत ताशेरे ओढण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन शिबीर
पनवेल/प्रतिनिधी :
यशवंत मेमोरियल ट्रस्टतर्फे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर ऑपॉच्र्युनिटीज इन कॉमर्स’ या विषयावर रविवारी ७ जूनला सकाळी १० वाजता हे शिबीर होणार आहे. महालक्ष्मी स्टेशनरी, वि. खं. विद्यालयाजवळ, अजिंक्य स्टेशनर्स, रतन टॉकिजसमोर आणि नारायण स्टेशनरी स्टोअर्स, मिडल क्लास सोसायटी येथे या शिबिराचे अर्ज उपलब्ध आहेत.