Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

जून महिना सुरू होताच सर्वाना पावसाचे वेध लागले आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असून या पाश्र्वभूमीवर बुधवारी आकाशात ढग जमा होताच ‘भोलानाथ’ ला ‘पाऊस पडेल काय’ असा प्रश्न विचारण्याचा मोह मोठय़ांनाही आवरला नाही.

टोळक्यांच्या उपद्रवाला आता तरी आळा बसणार ?
पोलिसाच्या हत्येनंतर एकमुखी सवाल

प्रतिनिधी / नाशिक

शहरात गस्तीवर असणारे पिस्तुलधारी पोलीस कर्मचारीही आता सुरक्षित राहिले नसल्याची बाब पोलीस नाईक कृष्णकांत बिडवे यांच्या निर्घृण हत्येमुळे अधोरेखीत झाली आहे. या पाश्र्वभूमीवर, रात्रीच्यावेळी उपद्रवी तरुणांच्या टोळक्यांनी फुलणारे चौक, कट्टे, चायनीज खाद्य पदार्थाच्या गाडय़ा, उशिरापर्यंत उघडी राहणारी हॉटेल्स व बिअरबार या गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांकडे किमान आता तरी पोलीस यंत्रणा सजगतेने लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जाणारा कॉलेजरोड असो की कामगारांची बहुसंख्य वस्ती असणारा सिडको, सातपूरचा भाग अथवा नाशिकरोड असो, सर्वच भागात टोळक्यांच्या हाणामाऱ्या, महिलांची छेडछाड व दडपशाही प्रवृत्ती फोफावत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

साधक!
कापूस म्हटले की प्रथम नजरेसमोर येतो तो बोळा. खरे तर धागा, वाती, वस्त्र ही सारी कापसाचीच रुपे. पण, प्रक्रियेनंतर ती वेगळ्याच म्हणजे प्रॉडक्टच्या स्वरुपात आपल्यासमोर येतात. त्याउलट कल्हई असो, चेहऱ्याचा मेकअप् असो की शस्त्रक्रिया अथवा शुश्रूषा असो.. कापसाचा थेट संदर्भ बोळ्याशीच जोडला जात असल्याने आपल्या लेखी कापूस म्हणजे एक क:पदार्थ. साहजिकच त्यापासून शिल्पाकृती बनतील आणि त्याची नोंद करतेवेळी साक्षात गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या व्यवस्थापनालाही एक नवी ‘कॅटेगरी ओपन’ करावी लागेल, याची कुणी कल्पना सुद्धा केली नसणार.

ठेवीदार बचाव समितीचे रविवारी नाशकात राज्यस्तरीय अधिवेशन
प्रतिनिधी / नाशिक

डबघाईस आलेल्या व अवसायनात निघणाऱ्या सहकारी बँका व पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या हितरक्षणार्थ येत्या रविवारी नाशिकमध्ये ठेवीदार बचाव समितीतर्फे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अधिवेशनाचे उद्घाटक असून बँक बचाव समितीचे डॉ. डी. एल. कराड अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. येथील खुटवडनगर परिसरात असलेल्या सिटू कामगार भवनमध्ये रविवारी सकाळी १० वाजता अधिवेशनाला सुरूवात होईल.

वेतनवाढीसाठी अभियंत्यांची निदर्शने
प्रतिनिधी / नाशिक

राज्यातील जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील अभियंत्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतन मिळावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सिंचन, बांधकाम भवन व मेरी कार्यालयात जोरदार निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात सामुदायीक रजेवर जाण्याचा इशारा अभियंत्यांनी यावेळी दिला. राज्य शासनाने केंद्राप्रमाणे वेतन व भत्ते देण्याचा धोरणात्मक निर्णय १९७८ मध्ये घेतला आहे.

‘अभिव्यक्ती’ तर्फे ‘पेट्रोलमुक्त आठवडा’ अभियान
प्रतिनिधी / नाशिक

गरज म्हणून वा चैन म्हणून वापरत असलेल्या वाहनांमुळे प्रदूषण वाढीस हातभार लागत असून त्यामुळे माणसाचा निसर्गाशी असणारा मुक्त संवादही कुठेतरी हरवत चालला आहे. यावरील उपायांचा एक भाग म्हणून येथील अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटतर्फे ५ ते ११ जून या कालावधीत ‘पेट्रोल मुक्त आठवडा’ चे आयोजन करण्यात आले आहे. या आठवडय़ात ज्यासाठी पेट्रोल, डिझेल वापरले जाते, अशी सर्व वाहने बंद ठेवून निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न अभिव्यक्तीतर्फे करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेने सायकलीने प्रवास, पायी चालणे, डोंगरमाथ्यावर, रानमाळात, शेतात फेरफटका असे पर्यायही शोधले आहेत.

वाहतूक समस्या समन्वयाने सोडविण्याची गरज - डॉ. शोभा बच्छाव
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील वाहतुकीची कोंडी संबधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सोडविण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी केली आहे. शहरातील वाहतूक पार्किंगच्या समस्येविषयी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, प्रवाशांना सौहार्दपूर्वक वागणूक द्यावी, असे बच्छाव यांनी सांगितले. शहरात ज्या ठिकाणी वाहतूक सिग्नल उभारणीसाठी निधीची गरज असल्यास आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शहरात रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची पोलीस यंत्रणा व महापालिकेने काळजी घ्यावी, असे निर्देशही बच्छाव यांनी दिले. बैठकीस नाशिक महापालिकेचे आयुक्त विलास ठाकूर, पोलीस आयुक्त विष्णु देव मिश्रा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे, डॉ. दिनेश बच्छाव आदी उपस्थित होते.

सहावा वेतन लागू करण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मंडळाच्या नाशिक विभागीय कर्मचारी संघटनेने केली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही एक निमशासकीय स्वायत्त संस्था आहे. या मंडळाव्दारे कामगार व कामगार कुटुंबियांकरीता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, महिला व स्वयंरोजगार विषयक कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अशा अनेक प्रकारच्या कामगार कल्याण योजना सातत्याने २५० कामगार कल्याण केंद्रातून राबविल्या जातात. या मंडळातील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग अद्याप लागू न झाल्यामुळे मंडळातील कर्मचारी वर्ग आर्थिक अडचणीत आलेला आहे. २००० मध्ये महाराष्ट्र शासनाने विधानसभेत महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये दर तीन वर्षांनी ३० टक्के दरवाढ करण्याचे मंजूर केलेले असतानाही महाराष्ट्र शासनाने २००६ व २००९ ची कामगार कल्याण निधीची ३० टक्के दरवाढ केलेली नसल्यामुळे मंडळातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून मंडळाची दर तीन वर्षांनी द्यावयाची देय निधीवाढ २००३ ची २००६ व २००९ ची निधीवाढ लवकरात लवकर मंजूर करून मंडळ कामगारांच्या हिताच्या कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास सहकार्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आर. डी. नांद्रे यांनी केली आहे.

जादा व्याज आकारणीविरूद्ध किसान सभेचा उपोषणाचा इशारा
नाशिक / प्रतिनिधी

येवला तालुक्यातील पाटोदा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतर्फे थकीत कर्जदार खंडु घोरपडे यांच्याकडून जादा व्याज आकारणी करण्यात आली असून या प्रकरणाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. कर्जमाफीबाबत शासनाच्या निर्णयानुसार, निधीच्या समायोजनापर्यंतचे व्याज वित्तीय संस्थेस आकारता येणार नाही, शिवाय दंडव्याज रक्कम किंवा इतर रकमेची आकारणीही करता येणार नाही. मात्र पाटोदा येथील संस्थेत घोरपडे यांच्याकडून ६ ते १०.५७ टक्के या दोन प्रकारात व्याजदर आकारणी करण्यात आली. सचिवाकडे यासंदर्भात कोणत्या नियमाने जादा व्याज आकारणी केली, अशी विचारणा केली असता वरिष्ठांच्या सांगण्यावरून व्याज आकारणी केल्याचे त्याने सांगितले. याबाबत तालुका उपनिबंधकाकडे तक्रार केली असता त्याची दखल घेतली गेली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सचिवाविरोधात कारवाई करण्याची मागणी किसान सभेचे तालुकाध्यक्ष खंडु घोरपडे व जिल्हा कार्याध्यक्ष राजू देसले यांनी केली आहे.

आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश
नाशिक / प्रतिनिधी

देशभरातील १५ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) सह ५ आयआयएसइआर, १ आयआयएसटी व आयटी-बीएचयूच्या २ स्वायत्त संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या आयआयटी-जेईई २००९ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्याच्या आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्रात मार्गदर्शन घेतलेल्या नाशिकच्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी देशभरातून ३ लाख ८० हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून निवड होऊन त्यांना ऑल इंडिया रँक देण्यात आली. त्यात नाशिकच्या राहुल पवार, प्रसाद अस्वले, सुयोग डागा व ध्रुव देशपांडे यांनी यश मिळवले. आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राच्या एकूण ९१ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत ऑल इंडिया रँकींग व एक्सटेन्डड मेरीट लिस्टमध्ये स्थान मिळाले असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांनी दिली. गेल्या ५० वर्षांतील आयआयटी प्रवेश परीक्षेच्या इतिहासात या वर्षी पुण्यातून २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गिरीश रामकृष्णन् हा संस्थेचा विद्यार्थी ऑल इंडिया रँकिंगमध्ये १६१ वा आला असून संस्थेच्या २ वर्षांच्या ग्रँड मास्टर्स कार्यक्रमातून त्याची रँकर्स बॅचमध्ये निवड करण्यात आली. अधिक माहितीसाठी मो.क्र. ९३७१०२२८०७, ९७६६६४८००४ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.