Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

खान्देश मिलच्या ठिकाणी आय. टी. पार्क न उभारण्याची मागणी
वार्ताहर / जळगाव

येथील खान्देश मिलच्या वादग्रस्त जागेवर महापालिकेने आय. टी. पार्कला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. रेल्वे स्थानकलगतच्या स. नं. २१२४ ते २१३१ व २१८२ या सर्व शासकीय जागा असून २१२४ वगळता सर्व जागा शासनाने खान्देश मिलला ९९ वर्षांच्या कराराने दिल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सर्व जागा सरकार जमा करण्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. या जागांवर जिल्हा प्रशासनाची कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. असे असताना पालिकेत प्रशासनाने या जागेबाबत कोणतीही माहिती न घेता तसेच जिल्हा प्रशासनास याबाबत विचारणा न करता आय. टी. पार्कला नियमबाह्य़ परवानग्या देऊन टाकल्याने गंभीर व फौजदारी गुन्ह्य़ास पात्र असे कृत्य केल्याचे साबळे यांचे म्हणणे आहे.

मनमाड-पुणे एक्स्प्रेसला लासलगाव थांबा देण्याची मागणी
वार्ताहर / लासलगाव

मनमाड-पुणे एक्स्प्रेसला लासलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी जिल्ह्य़ातील नवनिर्वाचित खासदारांनी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. लासलगाव कांद्याची मोठी बाजारपेठ असल्याने व देवळाली कॅम्प येथे लष्करी छावणी असल्याने एस्प्रेसला थांबा देण्याची मागणी प्रवाशी संघटनेने केली होती. त्यानुसार रेल्वेने देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला. परंतु लासलगाव रेल्वे स्थानकासाठी थांबा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. एक्स्प्रेसला लासलगावचा थांबा मिळाल्यास परिसरातील ४० गावातील नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. खा. समीर भुजबळ व खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी या गाडीला थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

आपत्ती आराखडे तयार करणे प्रत्येक तालुक्यांसाठी बंधनकारक
वार्ताहर / जळगाव

पावसाळा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाबाबत उपाय योजना करण्यात येत असून त्या अंतर्गत येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत जिल्ह्य़ाच्या प्रत्येक तालुक्यात आपत्ती आराखडे तयार करणे बंधनकारक असल्याची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात जळगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेस औरंगाबादच्या मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीचे लक्ष्मीकांत खळीकर व सुधीर पाठक उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे मार्गदर्शन व आपत्तीच्या काळातील उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन करण्यात येते. तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत शाळा सुरक्षा आराखडा तयार करणे, पुरापासून संरक्षण करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना, भूकंप रोधक बांधकाम तंत्राचा अवलंब करणे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. याच वेळी प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.

दागिने लुटीचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना अटक
मनमाड / वार्ताहर

येथील नेहरूनगर रस्त्यावरील सुधीर वसंत वडनेरे यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानातून दागिन्यांची लूट करण्याचा दोन महिलांचा प्रयत्न आज दुपारी निष्फळ ठरला. पोलिसांनी या संदर्भात तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. सराफी दुकानात दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून वडनेरे यांना औरंगाबादच्या वाळुंज परिसरातील मनीषा युवराज राठोड (३५), छकुली लखन राठोड (२५) व पूजा आकाश राठोड (४०) यांनी वेगवेगळे दागिने काढण्यास सांगितले. त्यातील दोघी शोकेसमधील दागिन्यांचा ट्रे चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दुकानदार वडनेरे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधला. शहर पोलीस पथकाने या तीन महिलांना ताब्यात घेतले आहे.

महापालिका शिक्षण मंडळ सभापतीपदी सलीम अप्सरा
मालेगाव / वार्ताहर

वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबत गेलेली महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक अखेर एकदाची पार पडली. तिसरा महाजचे सलीम अप्सरा यांची सभापतीपदी तर काँग्रेसचे निसार शेख यांची उपसभापतीपदी अविरोध वर्णी लागली.
न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिल भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंडळ सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी अप्सरा यांचा एकमेव अर्ज आला होता. सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापतीपदाची निवडणूक झाली. या पदासाठी काँग्रेसचे शेख निसार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुकीस कविता परदेशी व शेख परवीन या दोन शासन नियुक्त सदस्यांसह एकूण ११ सदस्य उपस्थित होते. जनता दलाचे दोन्ही सदस्य गैरहजर राहिले. शिक्षण मंडळात काँग्रेस व तिसरा महाजचे प्रत्येकी चार सदस्य असून या निवडणुकीत त्यांची युती झाली. निवड जाहीर होताच काँग्रेस व तिसरा महाजच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

शारीरिक व्यंग तपासणी शिबीर
मालेगाव / वार्ताहर

पोलीस दल, पोलीस मित्र समिती, स्माईल ट्रेन व औरंगाबाद येथील डॉ. दहिफळे मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव येथे आयोजित शारीरिक व्यंगावर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी २२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ७० जणांची औरंगाबाद येथे मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन झाले. आ. दादा भुसे, मौलाना मुफ्ती इस्माईल, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. विजय दहिफळे आणि डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी शिबीरात नाव नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांची तपासणी केली. शस्त्रक्रियेसाठी लागणारा सर्व खर्च संयोजकांतर्फे करण्यात येणार आहे.
व्यंग असलेल्या लोकांसाठी अशा प्रकारचे शिबीर आयोजित करण्यात पोलीस दलाने पुढाकार घेणे हे जनतेप्रती असलेल्या त्यांच्या सामाजिक जाणीवेचे द्योतक असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी मांडले. प्रकल्प प्रमुख हरिष मारू यांनी सूत्रसंचालन केले.