Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

देवत्वाकडून चित्रपटाकडे!
तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भावी उत्तराधिकारी म्हणून जो मुलगा निवडला होता त्याला ते वातावरण काही रुचले नाही. सर्व तिबेटी जनता २४ वर्षांचा ओसेल हिता तोरेस या तरुणाकडे देव म्हणून पाहत होती, पण ओसेलला या देवत्वाचा अक्षरश: वैताग आला. त्याला तिबेटी जनतेचा देव होण्यापेक्षा केस वाढवून बॅगी ट्राऊझर्स घालून वावरण्यातच अधिक रस होता. झालेही तसेच, लामांच्या वातावरणातून बाहेर पडलेला ओसेल आता माद्रिदमध्ये चित्रपट जगताचा अभ्यास करीत आहे.

आरोग्यसेवेची ऐशीतैशी..
कोटय़वधी रूपयांचा निधी आणि हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज तैनातीला असली तर एखाद्या विभागाचे काम कसे चालावे ? त्यातही अशा विभागाचे सेवा हे प्रमुख ब्रीद असेल तर त्याकडून आपण कोणती अपेक्षा कराल ? कदाचित आपल्या मनात एक गोंडस चित्र आकाराला येण्यास सुरुवातही झाली असेल. पण सावधान ! महाराष्ट्रात प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोग्यसेवेने मात्र याबाबतीत साफ निराशा केली आहे. जिल्हा रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रूग्णालये इथंपासून आरोग्य उपकेंद्रापर्यंत आरोग्यसेवेचे भलेमोठे जाळे उभारण्यात आले असले तरी मोठय़ा अपेक्षेने उभारलेली ही यंत्रणा सध्या सर्वसामान्यांची मृत्युघोषित केंद्रे बनली असून सर्वसामान्य नागरिकांनी आजारी पडू नये आणि आजारपण नशिबी आले तर मरणाला सरळ सामोरे जावे असाच जणू संदेश या यंत्रणेने दिला आहे.

हायटेक अत्रे कट्टा!
युवावस्था आणि कट्टा यांचं एक अनोखं नातं असतं. पण कालांतराने वय आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या की, कट्टय़ाचा संग सुटतो, खरं तर असा जिव्हाळ्याचा कट्टा प्रत्येकाला कायम हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येकाच्या कुठे तो नशीबात असतो? गोरेगावकर मंडळी याबाबतीत भाग्यवान. त्यांना स्वत:चा हक्काचा अत्रे कट्टा आहे. गेले ६०१ आठवडे दर रविवारी संध्याकाळी तो नेमाने बहरतो. तिथे जमणारे कट्टेकरी काव्य-शास्त्र-विनोदात मनसोक्त दोन-तीन तास घालवतात. स्वत:ला जे काही मांडावंसं वाटतं ते मोकळेपणे मांडतात. दर रविवारी एक पाहुणाही कट्टय़ावर येतो. आणि त्याच्या विषयावर कट्टेकरींचं प्रबोधन करतो. मंथन घडवून आणतो. गेल्या १० वर्षांत या कट्टय़ावर अनेक दिग्गज येऊन गेले. प्रभाकर पणशीकर, अरविंद इनामदार, सुलभा देशपांडे, सुदेश भोसले, प्रकाश मोहाडीकर, प्रवीण दवणे, सुहास जोशी, अरुण नलावडे, अशोक पाटोळे, सुरेश खरे, लालजी देसाई, पं. डी. के. दातार, प्रतिमा कुलकर्णी अशा अनेक दिग्गजांच्या गप्पांनी अत्रे कट्टय़ावरची संध्याकाळ समृद्ध केली आहे. गजाजन गानू यांना हा उपक्रम रुजवला. स्वत:च्या निवृत्तीनंतर गोरेगावमध्ये संस्कृतीसंपन्न उपक्रम राबवावा, या मिषाने गानू यांनी १९९८ मध्ये अत्रे कट्टा सुरू केला. आणि गेली १० वर्षे त्यांनी हे व्रत सांभाळले आहे. ते आणि त्यांचे सहयोगी यांनी नेटाने हा उपक्रम अव्याहत सुरू ठेवला आहे. परवाच्या रविवारी गोरेगाव पूर्वेच्या जयप्रकाश नगरमधील या अत्रे कट्टय़ाचा ६०२ वा उपक्रम होतोय. यावेळी विश्राम बेडेकर लिखित ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाचं संक्षिप्त सादरीकरण होणार आहे. ज्येष्ठ निर्माते व दिग्दर्शक जयंत सावरकर यावेळी पाहुणे म्हणून येणार आहेत. महानगरपालिकेचे सभागृह नेते सुनील प्रभु हेही एक नियमित कट्टेकरी. प्रभु आणि स्थानिक आमदार सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमाच्या शीर्षकातच कट्टय़ाच्या अव्याहततेची ग्वाही आहे. ‘गोरेगावचा अत्रे कट्टा ६०० प्लस’ असं या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. गेल्या १० वर्षांत अत्रे कट्टा कालानुरुप विकसित होत गेला. विषय, स्वरुप सतत बदलत गेलं. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वाना कट्टा आपलासा वाटावा, यासाठी विविध स्पर्धा, चर्चात्मक कार्यक्रम, संवाद, मुलाखती, सादरीकरण असे अनेक प्रयोग कट्टय़ावर घडत गेले. आता तर या कट्टय़ाने इंटरनेटच्या कट्टय़ाशी संग साधला आहे. गोरेगावकर डॉट कॉम या संकेतस्थळावर अत्रे कट्टय़ाचं स्वत:चं स्थान निर्माण झालंय. याच वेबसाईटचे कर्ते संजय गीते आणि प्राची मालवणकर यांनी अत्रे कट्टय़ावर माहितीपट बनवलाय. त्यामुळे अत्रे कट्टा आता डिजिटल रुपात सीडीच्या तबकडीवर जाऊन बसतोय. एखाद्या ठिकाणचा सांस्कृतिक निर्देशांक काढायचा, तर तिथे होणाऱ्या उपक्रमांचा आढावा घ्यावा लागतो. गोरेगाव हे सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत उपनगर मानले जाते. तशी प्रतिमा तयार होण्यात अत्रेकट्टय़ाचं योगदान फार मोठं आहे.
शुभदा चौकर