Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

बारी वाडय़ाच्या आठवणी आणि हेलावणारी मने
विनायक करमरकर,पुणे, ३ जून

शुक्रवार पेठेतील ‘बारी वाडा’ ही वास्तू आणखी काही दिवसांनंतर इतिहासजमा होईल.. तिथे छानशा इमारती उभ्या राहतील.. या वाडय़ाच्या नुसत्या आठवणीनेही अनेकांची मने आज हेलावतात.. आणि भविष्यातही पुण्यात जेव्हा जेव्हा ‘वाडा संस्कृती’वर चर्चा होईल, तेव्हाही बारी वाडय़ाची आठवण निघतच राहील.. ‘१३४६ भाऊमहाराज बोळ, शुक्रवार पेठ’ हा वाडय़ाचा अधिकृत पत्ता. पण गेली अनेक वर्षे या वाडय़ाची खरी ओळख ‘बारी वाडा’ अशीच. भाऊमहाराज पंडित यांचा हा मूळ वाडा. पुढे तो जगन्नाथमहाराज पंडित यांच्याकडे आला.

शाळेतच पुस्तके मिळणार असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट
शालेय खरेदी, पुणे, ३ जून/प्रतिनिधी

शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके मोफत मिळणार असल्यामुळे नेहमी पुस्तक खरेदीसाठी गजबजणाऱ्या अप्पा बळवंत चौकातील शालेय वस्तू बाजार पेठेत यंदा मात्र शुकशुकाट आहे. अप्पा बळवंत चौकातील प्रगती बुक सेंटरचे मालक व शालेय वस्तूंचे विक्रेते दिनेश शहा तसेच महाराष्ट्र स्टेशनर्सचे मालक विजय आडवाणी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. शहा म्हणाले, की मराठी माध्यमातील सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. इयत्ता चौथी व आठवीची सर्व पुस्तके बदललेली असून इयत्ता तिसरीचे भूगोल विषयाचे पुस्तक बदललेले आहे. ही सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत.

दिवाळे !
मुकुंद संगोराम

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे आता आर्थिक दिवाळे वाजले आहे. जगाला ज्ञान शिकवणाऱ्या या पालिकांकडे आता मागील वर्षी झालेल्या कामांचे पैसे देण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे त्यांना आता कर्जबाजारी व्हावे लागणार आहे. शहराची बेसुमार वाढ, त्यामुळे नागरी सुविधांवर पडणारा ताण आणि त्यात राजकीय हितसंबंधांची भर यामुळे भरजरी वस्त्रे नेसणाऱ्या या पालिकांवर आता चिरगुट नेसून लाज राखण्याची वेळ आली आहे. जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माण योजनेमुळे पुणे शहराला केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या किमान हजार कोटी रुपयांचे काय दिवे लागले आहेत, ते आपण सारे पाहतच आहोत.

नगरसेवकांना गोत्यात आणणारे प्रस्तावच लांबणीवर
पिंपरीत सत्ताधाऱ्यांची विषय तहकूब ठेवण्याची पुन्हा खेळी

पिंपरी, ३ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार नगरसेवकांचे गैरहजेरी प्रकरण, जवळपास २५ नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे तसेच एका नगरसेवकाचे ‘लाच’प्रकरण या नगरसेवकांना गोत्यात आणणाऱ्या बहुचर्चित सर्व प्रकरणांचे प्रस्ताव कोणताही निर्णय न घेता लांबणीवर टाकण्याची खेळी सत्ताधाऱ्यांनी आज पुन्हा एकदा केली. महापौर अपर्णा डोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या सभेच्या विषयपत्रिकेवर नगरसेवकांना अडचणीत आणणारे प्रस्ताव होते. नगरसेवक अण्णा बनसोडे, चंद्रकांता सोनकांबळे, राजेंद्र काटे, सारिका लांडगे हे पालिकेच्या सभांना सलगपणे गैरहजर राहिले आहेत.

बोपोडीतील वाहतूक आजपासून पूर्ववत
पुणे, ३ जून /प्रतिनिधी

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणाकरिता तीन महिन्यांपूर्वी बोपोडी वाहतूक थांबा चौक-खडकी बाजारमार्गे वळविण्यात आलेली वाहतूक आज (गुरुवार)पासून पूर्ववत बोपोडी-पुणे-मुंबई मार्गे सुरू करण्यात आली आहे. खडकी रेल्वे स्टेशन ते अंडी उबवणी केंद्र या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामाकरिता मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक तीन महिन्यांपूर्वी (मार्च) बोपोडी वाहतूक थांबा चौक खडकी बाजारमार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. संबंधित ठेकेदारास व पुणे महानगरपालिकेस एक महिन्याची मुदत वाहतूक विभागाने देण्यात आली होती. मात्र संथ गतीने व कमी मनुष्यबळ आणि कमी यंत्रसामग्रीअभावी रस्त्याच्या कामास विलंब होत गेला. त्यामुळे खडकी बाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतुकीचा मोठय़ा प्रमाणात ताण पडू लागला होता, तसेच या भागात सतत छोटे-मोठे अपघाताचे प्रकार घडू लागले होते. संथ गतीने सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाप्रकरणी प्रभारी आयुक्त मच्छिंद्रनाथ देवणीकर यांनी या कामाची पाहणी करून दिनांक ३१ मेपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लावण्याचे आदेश बजावले होते. रस्त्याच्या कडेला असलेली उघडी चेंबर्स, नाले, खड्डे हे धोकादायक स्वरूपाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

डॉक्टरांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक
पुणे, ३ जून / प्रतिनिधी

कँटोन्मेंट हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोनजणांना अटक केली. काल रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. नीलम साजन मकवाना (वय २५) आणि सुधीर दीपक चव्हाण (वय १९, दोघे रा. महात्मा गांधी रस्ता, लष्कर) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघाजणांची नावे आहेत. रुग्णालयातील कर्मचारी सुनील चंद्रकांत साळुंके (वय २३, रा. हिंगणेकर चाळ, हिंगणे खुर्द) यांनी याबाबत लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुशीने चावल्यानंतर मकवाना व चव्हाण हे दोघे काल रात्री कँटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले. मात्र, रुग्णालयात ‘कॅज्युल्टी वॉर्ड’मध्ये एका महिला रुग्णाचे निदान डॉक्टर करीत असल्याने मकवाना व चव्हाण या दोघांवर तत्काळ औषधोपचार झाले नाहीत. या कारणावरून चिडून मकवाना व चव्हाण यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. रिसेप्शनिस्ट म्हणून रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या साळुंके यांच्याकडील नोंदवही फाडून त्यांना मारहाण करण्यास तसेच डॉक्टरांना शिवीगाळ करण्यास मकवाना व चव्हाण यांनी सुरूवात केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर लष्कर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राजेशिर्के याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

मोबाईल चोरी करणाऱ्यास अटक, कोठडी
पुणे, ३ जून / प्रतिनिधी

बसथांब्यावर थांबलेल्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईलसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या प्रदीप ऊर्फ सरदार मदनसिंग पंजाबी (वय २०, रा. मूळ लुधियाना, सध्या पुणे) याला पोलिसांनी अटक केली असून त्याची सहा जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
ही घटना तीस मार्च रोजी सिटी पोस्ट ऑफीससमोरील बसथांब्यावर घडली. या प्रकरणी रमेश यशवंत गोसावी (वय २९, रा. पाटस, दौंड) यांनी ही फिर्याद दिली. गोसावी हे त्यांचा मित्र विजय श्यामराव शितोळे यांच्यासह बसची वाट पाहत थांबले होते. बसला उशीर झाल्याने तेथील खुर्चीवर बसता बसता त्यांना झोप लागली. आरोपीच्या साथीदाराने गोसावी यांच्या मित्राच्या खिशातील मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी झोपेतून जागे झालेल्या गोसावी यांच्या खिशातील आठ हजार रुपये आणि मित्राकडील मोबाईल आरोपीचा साथीदार कुवरसिंग कुतलू मोतीराम (वय २२, रा. कात्रज) हा घेऊन जात होता. त्याला जागेवरच पकडले, तर पंजाबी हा पळून गेला. फरासखाना पोलिसांनी अटक करून न्यायालयात त्याला हजर केले. पंजाबीकडून माल हस्तगत करण्यासाठी सहायक सरकारी वकील अॅड. राजश्री कदम यांनी पोलीस कोठडीची मागणी केली

आंबेगावातील ५६ रस्ते व सात मोऱ्यांसाठी पावणेतीन कोटींचा निधी मंजूर
मंचर, ३ जून/वार्ताहर

आंबेगाव तालुक्यात रस्ते आणि पूल देखभाल दुरुस्ती कार्यक्रम सन २००८-२००९ स्थानिक स्तर अंतर्गत ५६ रस्ते आणि ७ मोऱ्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने पाऊणे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. संबंधित मंजूर झालेल्या कामांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुणे जिल्हा परिषद बांधकाम खात्यामार्फत रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरवात होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात रस्ते आणि मोऱ्यांच्या होणाऱ्या कामांविषयी अधिक माहिती देताना आंबेगाव पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बाळासाहेब पोखरकर म्हणाले, की राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळेच तालुक्यात देखभाल, दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सदर मंजूर झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून डिसेंबर २००९ अखेर संपूर्ण कामे पूर्ण होतील.

त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावरील सात बांधकामे पालिकेने पाडली
पिंपरी, ३ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत त्रिवेणीनगर ते तळवडे रस्त्यावरील सात बांधकामे पाडण्यात आली. यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आयुक्त आशिष शर्मा यांच्या आदेशानुसार तळवडे रस्त्यावरील गणेशनगर भागातील २४ मीटर विकास आराखडय़ाने बाधित होणाऱ्या सात बांधकामांवर रस्तारुंदीकरणाची कारवाई करण्यात आली. या मोहिमेसाठी दोन जेसीबी, एक डंपर, एक पोकलॅन यांचा वापर करण्यात आला. फौजदार सुनील पाटील यांच्यासह २० कर्मचारी, १५ मजूर या मोहिमेत सहभागी झाले होते. शहर अभियंता एकनाथ उगिले, कार्यकारी अभियंता बळवंत बनकर, मकरंद निकम, दीपक सुपेकर, दिलीप कुदळे, केशव फुटाणे, सुधाकर कुदळे, शिवाजी चौरे यांनी या मोहिमेत भाग घेतला.