Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता कागदावरच
पीयूष पाटील
नागपूर, ३ जून

 

नागपुरातून प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने परदेशात जाणाऱ्या बहुतांश विमान कंपन्यांनी विमानसेवा बंद केल्याने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या दोन कंपन्यांच्या विमानसेवा सुरू असल्या तरी त्यालाही प्रवाशांचा विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचा गेल्या पाच वर्षांत झपाटय़ाने विकास झाला. त्यामुळे महानगरांबरोबरच देशातील इतर लहान शहरांतील विमानतळांचा विकास करण्यात आला. अनेक विमानतळांहून विमानसेवा सुरू झाल्या तर, अनेक प्रमुख राष्ट्रीय विमानतळांहून आंतरराष्ट्रीय विमानसेवांना सुरुवात झाली. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महत्व लक्षात घेता या ठिकाणांहूनही विविध प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली. तसेच नागपुरात होऊ घातलेल्या मिहान आणि कार्गो प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता गेल्या तीन ते चार वर्षांपासून आखाती देशांमधील विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आल्या. सुरुवातीचे काही दिवस या विमानसेवांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर मात्र, आता प्रवाशांअभावी इंडियन आणि कतार एअरवेजने विमानसेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे चार ते पाच आंतरराष्ट्रीय विमानसेवा असलेल्या नागपूर विमानतळावरून आता फक्त दुबई आणि शारजासाठीच विमानसेवा सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानसेवांनाही प्रवाशांचा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने एअर अरेबिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसला आंतरराष्ट्रीय विमानसेवा परवडत नसल्याची माहिती आहे.
पंचतारांकित दर्जा असलेल्या जगातील नामवंत कंपन्यांपैकी एक असलेल्या कतार एअरवेजने नागपुरात दोन वषांपूर्वी दोहा-नागपूर-दोहा अशी विमानसेवा सुरू केली होती. ही सेवा युरोपात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयोगाची होती. कारण, हेच विमान दोहा येथून पुढे लंडनला जात असे. मात्र, ही विमानसेवा सुरू झाल्यापासून याला प्रवाशांचा सदैव अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यातही सुरुवातीला आठवडय़ातून तीन आणि त्यानंतर दोन दिवस ही विमानसेवा नागपुरातून उपलब्ध होती. मात्र, प्रवाशांची रोडावणारी संख्या लक्षात घेता कंपनीने येत्या १५ मे पासून अनिश्चित काळासाठी ही विमानसेवा बंद केली आहे. कंपनीने यासाठी जागतिक मंदी, हे कारण पुढे केले असले, तरी कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी नागपुरातून विमानसेवा सुरू करण्यास कधीच विशेष उत्सुक नव्हती. मात्र, केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहावरून ही सेवा सुरू केली. कारण, कंपनीला भारतात इतर शहरात सेवा सुरू करण्यापूर्वी नागपुरातून सेवा सुरू करावी, असा आग्रह करण्यात आला होता. कतार एअरवेजबरोबरच इंडियनने सुरू केलेली नागपूर-बँकॉक ही विमानसेवाही बंद पडली आहे. सध्या नागपुरातून एअर अरेबियाची नागपूर-शारजा आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची मुंबई-नागपूर-अहमदाबाद-दुबई अशी विमानसेवा सुरू आहे. मात्र, दोन्ही विमानसेवांना अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसने तर प्रवासी मिळत नसल्याने अहमदाबाद शहरालाही या सेवेत जोडले आहे. याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्याचे टाळले.
गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून उदयास आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्याने विमानतळाच्या एकूणच दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, याचा फटका विमानतळालगतच होऊ घातलेल्या मिहान प्रकल्पावरही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.