Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मराठा समन्वय समितीचा वापर स्वार्थासाठी केल्यानेच मेटेंची हकालपट्टी -र्कोंढरे
सांगली, ३ जून / प्रतिनिधी

 

आमदार विनायक मेटे यांनी स्वतच्या राजकीय स्वार्थासाठीच मराठा समन्वय समितीचा वापर केल्याने त्यांची या समितीतून हकालपट्टी केल्याचे सांगत पुनर्रचित मराठा समन्वय समितीच्या स्थापनेसाठी दोन दिवसात मुंबई येथे बैठक होणार असल्याची माहिती, मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. मेटे हे एका विशिष्ट नेत्याच्या सूचनेनुसार काम करीत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाची चळवळ धोक्यात येऊ शकते, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठा समन्वय समितीच्या पुणे येथील बैठकीत सर्व १२ संघटनांनी मेटे यांच्या हकालपट्टीला मान्यता दिली आहे. वास्तविक, मेटे हेच या समितीत फूट पाडत होते. एकीकडे समितीत काम करायचे व दुसरीकडे सवतासुभा मांडून स्वत अध्यक्ष म्हणून मिरवायचे, अशी दुटप्पी भूमिका त्यांनी घेतली होती. या समितीने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळण्याचा आग्रह धरला आहे. परंतु मेटे यांनी मुंबईतील सभेत राजकीय आरक्षणाची मागणी केली. आरक्षण चळवळीत सहभागी होताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही झाले. त्यामुळे ही चळवळ राजकारणात गुरफटू नये, यासाठीच त्यांच्यावर कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.
विनायक मेटे यांनी समन्वय समितीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला. ते विशिष्ट नेत्याच्या सूचनेनुसारच काम करतात, अशी टीकाही केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता कोंढरे यांनी केली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी आरक्षणाबाबत अनेकदा चर्चा झाल्या. या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल नसल्याचे मत या समितीचे आहे. त्यामुळे मेटे यांनी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाची घोषणा न झाल्यास राज्यातील ५० ते ६० विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून देणार असल्याचा इशाराही कोंढरे यांनी दिला.