Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पुरंदरेंवर टीका करण्यापेक्षा शिवरायांचा आदर्श घ्या!
सुमतीदेवी धनवटेंचा टोला
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याचा अट्टाहास करणे कृतघ्नपणाचे आहे, अशा कठोर शब्दांत टीका करून ज्येष्ठ साहित्यिक सुमतीदेवी धनवटे यांनी, पुढाऱ्यांनी जातीपातीचे राजकारण करण्यापेक्षा शिवरायांचा आदर्श घ्यावा, असा टोला लगावला आहे. मुंबईत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारने शिवस्मारक समितीची घोषणा करताना या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांच्या नावाची घोषणा केली होती. त्याचे पडसाद नागपुरात नुकत्याच झालेल्या मराठा सेवा संघाच्या साहित्य संमेलनात उमटले. यावेळी बाबासाहेबांना मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्या आणि त्यांना समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. याच संमेलनात समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुमतीदेवींचा सत्कारही करण्यात आला होता, हे विशेष. बाबासाहेबांच्यासंदर्भात सेवा संघाने घेतलेल्या भूमिकेला राज्यातील अनेक व्यक्ती संघटनांकडून सध्या तीव्र विरोध होत आहे. सुमतीदेवींनीही अस्वस्थ होऊन शिवशाहिरांबद्दल संमेलनात व्यक्त झालेली मते आणि ठरावाला विरोध व्यक्त केला असून पत्रक काढून शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचे कान उपटले आहेत.
बाबासाहेब हे प्रामाणिक शिवभक्त व देशभक्त आहेत. इतिहासाचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून ऐतिहासिक सत्यच त्यांनी समाजाला सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या व्याख्यानांद्वारे, शिवचरित्राद्वारे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या व आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाच्या ‘जाणता राजा’ या महानाटय़ातून शिवरायांचे कर्तृत्व, पराक्रम व प्रशासनाचा आदर्श जगापुढे ठेवला व त्याचा सर्वत्र प्रसार केला. बाबासाहेबांनी शिवचरित्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचे महान कार्य केले असून संपूर्ण समाजाबद्दल त्यांना विशेष आदर आहे आणि तो त्यांच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत असतो. शिवचरित्राच्या प्रचारासाठी व शिवकार्यासाठी बाबासाहेबांनी अवघे जीवन वाहिले आहे. त्यांच्या उतार वयात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याऐवजी केवळ ते ब्राह्मण होते म्हणून त्यांच्यावर टीका करणे, ओढूनताणून आरोप करणे व त्यांना मारहाणीच्या धमक्या देणे हे कृतघ्नपणाचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत सेवा संघाच्या भूमिकेला विरोध नोंदवताना, सुमतीदेवींनी त्यांच्या आगामी ‘दवावरील पाऊलखुणा’ या आत्मचरित्रात बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आल्याचेही सुमतीदेवी धनवटे यांनी पत्रकात नमूद केले आहे. बाबासाहेबांचा आणि माझा चांगला परिचय असून मी त्यांचे कार्य सुरुवातीपासून बघते आहे. बाबासाहेब माझ्या घरीही आले आहेत. मुंबईला ‘जाणता राजा’च्या प्रयोगाला माझ्या हस्ते पूजा करून प्रारंभ करण्यात आला होता, अशी आठवण सुमतीदेवींनी सांगितली. समाजातील पुढाऱ्यांनी जातीपातीचे राजकारण करत बसण्यापेक्षा भारताच्या प्रत्येक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतिमंदिर उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा व त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून आचरण करावे. शिवरायांनी संपूर्ण समाजाला एकत्र करून स्वराज्य स्थापन केले. तोच आदर्श घेऊन त्यांच्यासारखे देशभक्तीचे राजकारण राजकारण्यांनी करावे, असा कडू डोजही सुमतीदेवींनी विरोधकांना दिला आहे.