Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नाशिक जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर
औद्योगिक न्यायालयाचा निर्णय
नाशिक, ३ जून / प्रतिनिधी

 

वेतनवाढीच्या प्रश्नावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला असून पुढील ४८ तासात सर्वानी कामावर हजर व्हावे, असे निर्देश दिले आहेत. या पाश्र्वभूमिवर जिल्हा बँक कर्मचारी संघटनेने उद्या, गुरूवारी सकाळी बँकेच्या मुख्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा मेळावा बोलाविला असून याप्रसंगी कामावर हजर होण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय, औद्योगिक न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपिल केले जाणार आहे. वेतनवाढीचा करार करण्यास बँक व्यवस्थापनाने दिरंगाई केल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या संपामुळे खरीप कर्जवाटप, कृषी अनुदान वाटप यांच्यासह माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे पगार, वीज बिल संकलनाचे काम पूर्णत ठप्प झाले आहे. कोटय़वधींची उलाढाल थंडावल्याने या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी कामगार उपायुक्तांनी मध्यस्ती करण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. या घडामोडीनंतर बँक व्यवस्थापनाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. व्यवस्थापन व कर्मचारी संघटनेची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरविल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा डॉ. सुचेता बच्छाव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. पुढील ४८ तासात कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले असल्याचे त्यांनी सांगितले. संपामुळे तीन दिवसाच्या काळात शेतकरी सभासद व ग्राहकांची गैरसोय झाली असून बँकेचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आता तातडीने कामावर हजर व्हावे, असे आवाहन बच्छाव यांनी केले. बेकायदेशीरपणे संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. दरम्यान, कर्मचारी संघटना या निकालाविरोधात अपिलात जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विजय मोगल यांनी सांगितले.