Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

राज्य

नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता कागदावरच
पीयूष पाटील
नागपूर, ३ जून

नागपुरातून प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने परदेशात जाणाऱ्या बहुतांश विमान कंपन्यांनी विमानसेवा बंद केल्याने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या दोन कंपन्यांच्या विमानसेवा सुरू असल्या तरी त्यालाही प्रवाशांचा विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचा गेल्या पाच वर्षांत झपाटय़ाने विकास झाला. त्यामुळे महानगरांबरोबरच देशातील इतर लहान शहरांतील विमानतळांचा विकास करण्यात आला.

मराठा समन्वय समितीचा वापर स्वार्थासाठी केल्यानेच मेटेंची हकालपट्टी -र्कोंढरे
सांगली, ३ जून / प्रतिनिधी

आमदार विनायक मेटे यांनी स्वतच्या राजकीय स्वार्थासाठीच मराठा समन्वय समितीचा वापर केल्याने त्यांची या समितीतून हकालपट्टी केल्याचे सांगत पुनर्रचित मराठा समन्वय समितीच्या स्थापनेसाठी दोन दिवसात मुंबई येथे बैठक होणार असल्याची माहिती, मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. मेटे हे एका विशिष्ट नेत्याच्या सूचनेनुसार काम करीत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाची चळवळ धोक्यात येऊ शकते, अशी टीकाही त्यांनी केली.

बीएसएनएलच्या आयत्या बिळात टाटा आणि रिलायन्स मोबाइल्सचे ‘नागोबा’
जयंत धुळप
अलिबाग, ३ जून

मोबाइल, इंटरनेट, ब्रॉडबॅन्ड आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संपर्कसेवा सरकारी क्षेत्रातील बीएसएनएलपेक्षा स्वस्त दरात ग्राहकांना देशभर उपलब्ध करून देत असल्याचा दावा करणाऱ्या रिलायन्स मोबाइल आणि टाटा इंडिकॉम या कंपन्या बीएसएनएलच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून उद्योग करीत असल्याचे उघड झाले आहे. अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना आणि बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन यांनी मंगळवारी ‘रेवदंडा- साळाव- काशीद- नांदगाव- मुरुड’ या मार्गावर संयुक्तरीत्या केलेल्या वस्तुनिष्ठ पंचनाम्यामुळे बीएसएनएलच्या आयत्या बिळात टाटा आणि रिलायन्स मोबाइल्सचे नागोबा शिरल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरंदरेंवर टीका करण्यापेक्षा शिवरायांचा आदर्श घ्या!
सुमतीदेवी धनवटेंचा टोला
नागपूर, ३ जून / प्रतिनिधी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याचा अट्टाहास करणे कृतघ्नपणाचे आहे, अशा कठोर शब्दांत टीका करून ज्येष्ठ साहित्यिक सुमतीदेवी धनवटे यांनी, पुढाऱ्यांनी जातीपातीचे राजकारण करण्यापेक्षा शिवरायांचा आदर्श घ्यावा, असा टोला लगावला आहे. मुंबईत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारने शिवस्मारक समितीची घोषणा करताना या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांच्या नावाची घोषणा केली होती.

नाशिक जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर
औद्योगिक न्यायालयाचा निर्णय
नाशिक, ३ जून / प्रतिनिधी
वेतनवाढीच्या प्रश्नावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला असून पुढील ४८ तासात सर्वानी कामावर हजर व्हावे, असे निर्देश दिले आहेत. या पाश्र्वभूमिवर जिल्हा बँक कर्मचारी संघटनेने उद्या, गुरूवारी सकाळी बँकेच्या मुख्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा मेळावा बोलाविला असून याप्रसंगी कामावर हजर होण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.

एम. फिल. धारक संघर्ष कृती समितीचा आंदोलन छेडण्याचा इशारा
नाशिक, ३ जून / प्रतिनिधी

व्याख्याता पदासाठी एम. फिल. पात्रता रद्द ठरविण्याची शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने केली असून या शिफारशीचा महाराष्ट्र राज्य एम. फिल. धारक संघर्ष कृती समितीने निषेध केला आहे. या निर्णयाविरुद्ध एम. फिल. धारकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कृती समितीचे समन्वयक प्रा. व्यंकट माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अमोल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एम. फिल धारकांची येथे बैठक झाली. शैक्षणिक संस्थांना उत्तम प्रतीचे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, असे म्हणणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाला पात्र उमेदवार मिळत नसल्याच्या सबबीखाली तासिका तत्वावर काम करणाऱ्या हंगामी शिक्षकांकडून काय गुणवत्ता मिळते, १९९३ पर्यंत एम. फिल. झालेल्या उमेदवारास कोणत्या गुणवत्तेच्या आधारे व्याख्याता पदावर पात्र समजण्यात आले, कोणतीही व्यावसायिक पात्रता नसताना किंवा संशोधनाचा अनुभव नसणाऱ्या उमेदवारात विद्यापीठ अनुदान आयोगाला कोणती गुणवत्ता दिसते, असे प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आले. आयोगाच्या अन्यायकारक निर्णयामुळे देशातील हजारो व्याख्यात्यांवर बेकारीची कु ऱ्हाड कोसळणार असल्याचे मत व्यक्त करून एम. फिल. धारकांकडून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीवर असंतोष व्यक्त करण्यात आला.