Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

क्रीडा

फेडररची उपान्त्य फेरीत धडक; सेरेना पराभूत
पॅरिस, ३ जून / वृत्तसंस्था
गेली चार वर्षे सातत्याने फ्रेंच ओपन विजेतेपदावर आपल्या नावाची मोहोर उमटविणारा राफेल नदाल पराभूत झाल्यामुळे विजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या रॉजर फेडरर स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने आज फ्रान्सच्या गेल मॉनफिल्सला ७-६, ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत करीत उपान्त्य फेरीत धडक मारली. गेली चार वर्षे सातत्याने फेडररने फ्रेंच ओपनच्या उपान्त्य फेरीत प्रवेश करीत आहे. पुरुषांच्या दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात अर्जेटिनाच्या डेल पोत्रोने स्पेनच्या टॉमी रॉबरेडोला ६-३, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. उपान्त्य फेरीत आता फेडररची गाठ पोत्रोशी पडणार आहे.

सॉडरलिन्गला सुरू ठेवायचा आहे नदालचा वारसा
पॅरिस, ३ जून/पीटीआय

राफेल नदालची सलग चार वर्षे विजेतेपदाची मालिका मी खंडित केली असली तरी माझ्यापुढे त्याचाच आदर्श असून सलग विजेतेपद मिळविण्याचा वारसा मला पुढे सुरू ठेवायचा आहे असे स्वीडनचा टेनिसपटू रॉबिन सॉडरलिन्ग याने येथे सांगितले. रॉबिन याने यंदाची फ्रेंच स्पर्धा गाजविली आहे. येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत त्याने उपान्त्य फेरीकडे वाटचाल करताना डेव्हिड फेरर, नदाल व त्याच्या पाठोपाठ निकोलाय डेव्हिडेन्को याच्यावर सनसनाटी विजय नोंदविला आहे. हे तीनही खेळाडू क्लेकोर्टवरील मातब्बर खेळाडू म्हणून परिचित आहेत. काल त्याने डेव्हिडेन्को याचा ६-१, ६-३, ६-१ असा सपशेल धुव्वा उडविला होता.

प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच- सायना
नवी दिल्ली, ३ जून/ पीटीआय

सुदिरमन चषकात नेत्रदीपक कामगिरी केल्या नंतर ९ ते १४ जून दरम्यान होणाऱ्या दक्षिण-पूर्व आशिया दौऱ्यासाठी भारताच्या सायना नेहवालचे पारडे जड दिसत आहे. या दौऱ्यात तिला तीन महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. पण तरी या दौऱ्यासाठी मी कोणतेही ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले नसून प्रत्येक सामना माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच मी मैदानात उतरेन, असे मत भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले आहे.

पॉन्टिंग-क्लार्कच्या शतकी भागीने ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय
लंडन, ३ जून/वृत्तसंस्था

मिशेल जॉन्सनची भेदक (२०/४) गोलंदाजी आणि कर्णधार पॉन्टिंग (५६) व मायकेल क्लार्क (नाबाद ४९) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने येथील सराव सामन्यात न्यूझीलंडवर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला. न्यूझीलंडला १४७ धावांतच गुंडाळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने केवळ तीन विकेट्स गमावून विजय साजरा केला.

इंग्लंडची स्कॉटलंडवर सहा विकेट्सनी मात
लंडन, ३ जून/वृत्तसंस्था

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडवर सहा विकेट्सनी विजय मिळविला. स्कॉटलंडला २० षटकांत ५ बाद १३६ धावांवर रोखणाऱ्या इंग्लंड संघाने विजयाचे हे लक्ष्य १९ षटकांत ४ विकेट्स गमावून पार केले. केविन पीटरसन याने नाबाद ५३ धावांची खेळी करून इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

विंडीजचा आर्यलडवर नऊ विकेट्सने विजय
लंडन, ३ जून/ पीटीआय

इंग्लंडकडून कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत सपशेल शरणागती पत्कारावा लागलेल्या वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात आर्यलडचा ९ विकेट्सने विजय साकारला. या विजयात चमकला तो विंडीजचा कर्णधार ख्रिस गेल. त्याने फटकाविलेल्या तडाखबंद नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विंडिजने चार षटके राखत विजय साकारला.

प्रारंभी भारताचा वरचष्मा; तरीही पाकिस्तान ६ बाद १५८
लॉर्ड्स, ३ जून/ क्री. प्र.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना हा क्रिकेटविश्वासाठी महत्वाचा असतो. मग तो सराव सामना असला तरी त्याला एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे वलय प्राप्त होते आणि असाच प्रत्यय आला तो या दोन्ही संघांमधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात. सामन्याचे पारडे दोन्हीही संघांच्या बाजूने झुकत होते. सामन्याच्या सुरुवातीला सलामीवीर शेहझाब हसनला एकही धावा करू न देता प्रवीण कुमारने त्रिफळाचीत केले आणि भारताला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कामरान अकमलने चार चौकांरासह फक्त ९ चेंडूत १९ धावा फटकाविल्या. त्याला यावेळी चांगली साथ लाभली ती अहमद शेहझादची, त्यानेही पाच चौकारांच्या साथीने २५ धावा फटकाविल्या. हे दोघेही खेळत असताना पाकिस्तान सहजपणे दीडशेचा टप्पा गाठेल असे वाटत असतानाच रैनाने अकमलला धावचीत करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. तर त्याच षटकात इशांतने शेहझादला बाद करीत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. ४ बाद ४५ अशी अवस्था असताना युनूस खान (३२) आणि शोएब मलिक (१४) यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही तंबूत परतल्यानंतर मिसबाह-उल-हक (३७) आणि यासिर अराफत (२५) यांनी अंतिम षटकांमध्ये धावसंख्या फुगविली व संघाला १५८ धावांचा टप्पा गाठून दिला.

सौरव गांगुली समालोचकाच्या भूमिकेत
नवी दिल्ली, ३ जून/ पीटीआय

‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ अशी बिरूदावली मिळविणारा सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली तरी तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी त्याला इएसपीएन-स्टार स्पोर्ट्स वाहिनीनने त्याला समालोचनासाठी करारबद्ध केले आहे. यावेळी गांगुलीला इयान चॅपेल, इयान बिशप, वसीम अक्रम, नासीर हुसेन, संजय मांजरेकर आणि हर्षां भोगले यांची साथ लाभेल. विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीपासून गांगुली या नव्या भूमिकेमध्ये दिसणार असून तो या नव्या भूमिकेबद्दल कमालीचा उत्सुक आहे. या नवीन भूमिकेबद्दल मी फार उत्साही आणि आनंदी आहे. यामुळे मी क्रिकेटबरोबर तर जोडला जाईनच, पण त्याबरोबर मला खेळाडूंशी संवाद साधता येईल, असे गांगुलीने यावेळी सांगितले.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केली अखेर हॉकी इंडियाची स्थापना
नवी दिल्ली, ३ जून / पीटीआय

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास मज्जाव केला जाईल, या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने दिलेल्या इशाऱ्यापुढे नमते घेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आज ‘हॉकी इंडिया’ची स्थापन केल्याचे औपचारिकपणे जाहीर केले. त्यामुळे आता पुरुष व महिला हॉकी संघ एकाच छत्राखाली खेळू शकणार आहेत.भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून ५ मे रोजी इशारा देणारे पत्र मिळाल्यानंतर २० मे रोजी ‘हॉकी इंडिया’ची स्थापना करण्यात आली. हॉकी महासंघाने भारतातील दोन हॉकी संघटनांच्या अस्तित्वाबद्दल चिंता प्रकट केली होती व पुरुष तसेच महिला संघटना एकाच छत्राखाली आणाव्यात यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती.

राष्ट्रीय रिगाटा स्पर्धा : आर्मी याटिंग संघाचे वर्चस्व
पुणे, ३ जून / प्रतिनिधी

आर्मी याटिंग संघाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय रिगाटा स्पर्धेच्या पात्रता फेरीत वर्चस्व गाजविले. त्यांच्या पी मथुराजन व विजेश भास्करन यांनी प्रथम स्थान मिळविले. खडकवासला येथे आज या स्पर्धेस प्रारंभ झाला. पात्रता फेरीत आर्मी याटिंग संघाच्या संदीप जैन व एस.आर राऊत या जोडीने दुसरे स्थान घेतले तर आयडब्ल्यूएसए संघाच्या गुलशन चुनेकर व जतीन गोयल यांनी तिसरे स्थान घेतले. सुवर्ण ताफ्याच्या गटासाठी ४९ स्पर्धक तर रौप्य ताफ्यासाठी ३१ स्पर्धक पात्र ठरले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल आर.के धवन यांच्या हस्ते झाले.