Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

महिलांना महिलांनीच घातला कोटय़वधींचा गंडा
ठाणे/प्रतिनिधी :
बेरोजगार महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली संस्था स्थापन करून महिलांनीच सुमारे सात हजार गुंतवणूकदार महिलांना करोडो रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. मात्र यापैकी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शिखा दिवाकर शर्मा, ज्योती राजाराम त्रिभुवन, ज्योती चंद्रकांत ठाकूर यांनी बेरोजगार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जुलै २००८ मध्ये सहयोगी महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली.

अकरावी प्रवेशासाठी शिवसेनेतर्फे मोफत सल्ला केंद्रे
ठाणे/प्रतिनिधी

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्णाात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याने ठाणे शिवसेना शाखेतर्फे २० ठिकाणी ऑनलाइन प्रवेश केंद्रे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे या किचकट प्रक्रियेचा सराव करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी प्रवेश केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावीचे प्रवेश ऑनलाइन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नालेसफाईवरून विरोधकांचा हल्लाबोल
बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची आयुक्तांची घोषणा

ठाणे/प्रतिनिधी :
पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील नालेसफाईच्या उडालेल्या बोजवाऱ्यावरून विरोधी पक्षांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर येत्या चार दिवसांत संपूर्ण नालेसफाई पूर्ण केली जाईल; त्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी केली. शहरातील नालेसफाईचे काम ८० टक्के झाल्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी त्याचा पुरता बोजवारा उडाल्याचे आज स्पष्ट झाले होते. ‘ठाणे वृत्तान्त’मधील वृत्ताची दखल घेत विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचे बाभाडे काढले.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी कल्याण-डोंबिवली सज्ज
कल्याण/प्रतिनिधी -
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी कल्याण-डोंबिवली ही शहरे सज्ज झाली आहेत. कल्याणमध्ये शिवसेना शहर शाखेने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी मदत केंद्रे सुरू केली आहेत. डोंबिवलीत के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय हे या प्रक्रियेचे केंद्र आहे. कल्याण-डोंबिवली ते टिटवाळापर्यंतच्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेप्रमाणे प्रवेश मिळणार आहे. यामुळे विद्यार्थी-पालकांना कोठेही प्रवेशासाठी रांगा लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

भिवंडीत हातगाडय़ांच्या वाढत्या अतिक्रमणाने नागरिक हैराण
भिवंडी/वार्ताहर

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडी शहरात महापालिका निर्मितीच्या आठ वर्षांंनंतरही नागरी समस्या कायम असल्याने येथील प्रशासन, लोकप्रतिनिधींची उदासीनता उघड होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर प्रमुख बाजारपेठेत अनधिकृत हातगाडी चालकांनी शिरकाव केल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांची डोकेदुखी ठरली आहे. शहराच्या नीटनेटकेपणास अडथळा ठरलेल्या हातगाडय़ांच्या करवसुलीचा २००९-१० चा ठेका शरद रोकडे या माजी नगरसेवकास ६३ लाख रुपयांस दिला आहे.

अतिधोकादायक इमारतीवर पालिकेची कारवाई
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील टाकोळी मोहल्ला, मस्जीदशेजारील म्हात्रे बिल्डिंग ही अतिधोकादायक इमारत पालिकेने जमीनदोस्त केली. या कारवाईत तळ अधिक दोन मजली इमारतीचा जिना तोडून रहदारी बंद करण्यात आली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीचे कठडे, भिंती तोडून इमारतीचा धोका काढण्यात आला व पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना इमारतीच्या तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आले. तसेच पाकीजा मटण शॉपजवळ, टाकोळी मोहल्ला येथील जुलेखा दाऊद गोरमे यांच्या मालकीच्या धोकादायक इमारतीचा जिना तोडून वहिवाट बंद करण्यात आली. तळ अधिक तीन मजली इमारतीच्या टेरेसवरील दोन रूमचे बांधकाम, इमारतीच्या गॅलरीचे कठडे व रूममधील स्लॅब तोडण्यात आले. इमारतीतील कुटुंबाचे सामान बाहेर काढण्यात आले.

भत्ते देताना दडपशाही; शिक्षकांची तक्रार
डोंबिवली/प्रतिनिधी -
पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर शाळेत इयत्ता चौथी पुनर्रचित अभ्यासक्रमावर नुकतेच शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. या निवासी शिबिरात शेवटच्या दिवशी शिक्षकांना भत्ते देताना दडपशाहीने सह्य़ा घेण्यात येऊन, भत्त्यांचे आकडे पेन्सिलने (खाडाखोड करण्यासाठी) लिहिले असल्याच्या तक्रारी प्रशिक्षण शिबिरातील शिक्षकांनी केल्या आहेत. एका शिक्षकाने या प्रकरणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तात्काळ शिक्षणाधिकाऱ्यांनी मोबाईल करून शांत केले, असेही तक्रारीत म्हटले आहे. शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी हे सगळे मिळून गेली अनेक वर्षे अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिरासाठी येणाऱ्या निधीत गैरव्यवहार करत आहेत. या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. २५ ते ३० मे या कालावधीत पाटकर शाळेत निवासी शिबीर होते. या शिबिरात ५०० शिक्षक सहभागी झाले होते. या शिबिरातील भोजनाची व्यवस्था निकृष्ट दर्जाची होती. काही शिक्षकांनी याबाबत तक्रार करण्याची तयारी केल्यानंतर जेवण चांगले देण्याचे आश्वासन देण्यात आले. शिक्षकांची निवासाची व्यवस्थाही योग्य नव्हती, अशीही तक्रार शिक्षकांनी केली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

साप्ताहिक कल्याण नागरिक हीरक महोत्सव
ठाणे / प्रतिनिधी

साप्ताहिक कल्याण नागरिक यंदा साठाव्या वर्षांत पदार्पण करीत असून, यानिमित्ताने रविवार, ७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात एक समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, लोकमतचे संपादक दिनकर रायकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून दै. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर, आमदार संजय केळकर, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन उपस्थित राहणार असल्याची माहिती हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष नारायण मराठे यांनी दिली.

प्रेम आणि वात्सल्याच्या बहारदार कविता
बदलापूर/वार्ताहर :
‘तापलेल्या दुधावर जशी साय येते, तसे तुझे नाते माझ्या आधाराला होते..’, ‘ही वाट तुडवते तुझ्या घराचे दार..’ अशा एकापेक्षा एक प्रेम कविता व आईच्या कविता सादर करून कवी प्रशांत मोरे यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कवी किरण येले यांच्या ‘चिल्लर’ या कवितेनेही उपस्थितांची दाद मिळवली. अंबरनाथचे उत्कृष्ट नगरसेवक म्हणून गौरविलेले सुनील चौधरी यांची लंडन येथे होणाऱ्या रोटरी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाल्याबाबत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, अंबरनाथ शाखा आणि शिवधाम कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवधाम सभागृहात काव्यसंध्येचे नुकतेच आयोजन केले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे शाखा अध्यक्ष उमेश नाडकर यांनी प्रास्ताविक करून नगरसेवक सुनील चौधरी यांना शुभेच्छा दिल्या. नगरसेवक मनोज वैद्य, विनायक जाधव, सुभाष ठिपसे, मनोज राणे आदी यावेळी उपस्थित होते.

रोल बॉल स्केटिंग स्पर्धेत मुलींचे यश
कल्याण/प्रतिनिधी -
पुणे येथील राजू धबडे यांनी महाराष्ट्रात २००३ मध्ये रोल बॉल गेम सुरू केला. या खेळाने अल्पावधीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. या खेळात वय वर्ष अकरा, चौदा आणि सतरा खालील मुले, मुली खेळू शकतात. औरंगाबाद येथे महाराष्ट्र स्टेट रोल बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या चौदाव्या राज्य रोल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या सबर्बन गर्ल्स टीमने तिसरे स्थान पटकावले आहे. या टीमचे नेतृत्व किनाल बिदने केले. तिच्या सोबतीला विधी देढीया, शारदी शेट्टी, पंक्ती पसाद, ध्रुती बिद, अंतरा दादरकर, सदिच्छा जगदाळे आणि तमन्ना रोहरा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत नागपूर, पुणे, नाशिक, धुळे परिसरातील संघ सहभागी झाले होते. या संघाने सेमी फायनलला जळगाव संघाचा पराभव केला. या स्पर्धेसाठी कोच धर्मेद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले चार महिन्यापासून सराव करत होता.

आरोग्य संस्कार परिवार
ठाणे/प्रतिनिधी :
रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण लक्षात घेता आहार-विचार-वर्तमान बदल करणे गरजेचे आहे व त्यासाठीचा दृढनिश्चय टिकवून ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या परिवाराची गरज आहे. यासाठीच कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात ‘आरोग्य संस्कार परिवार’ सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ येत्या ७ जून रोजी सायं. ५.३० वाजता डोंबिवली येथील सुयोग मंगल कार्यालय येथे होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांची मुलाखत ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर घेणार आहेत. तसेच यावेळी सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे ‘जीवन एक रसिली मेहफिल’ हे आरोग्यविषयक व्याख्यानही होणार आहे. या परिवारामध्ये सहभागासाठी संस्कार सभासदत्व व आरोग्य सभासदत्व हे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असून, सभासदांना वर्षांतून तीन वेळा मोफत आरोग्य तपासणीचा फायदाही देण्यात येणार आहे. रुग्णांना उपचारानंतरही वैचारिक-मानसिक आधार मिळावा यासाठीच आरोग्य संस्कार परिवाराची स्थापना करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- भास्कर तरे-९८३३३६५७९८.

ठाण्यात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा सुरू
ठाणे/प्रतिनिधी

रघुनाथनगर येथील प्रबोधनकार ठाकरे स्पोर्टस् क्लबमध्ये ३६ व्या ज्युनिअर अॅक्वाटिक जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महेश वाघ, अनिल भाटिया, सेव्ही नायर आदी उपस्थित होते. अॅक्वाटिक रिक्रिएशन क्लब ऑफ नायर स्वीमिंग पूलमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. १०० मीटर फ्री स्टाईल, २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, ४०० मीटर वैयक्तिक गट, तसेच २०० मीटर बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय प्रकारासाठी मुले व मुलींचे प्रत्येकी दोन गट तयार करण्यात आले आहेत. याआधी आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

फर्निचर व्यापाऱ्यास साडेचार लाखांस लुटले
भिवंडी/वार्ताहर :
भिवंडी-ठाणे रोडवर अपघात झाल्याचा बनाव करीत गाडीतून जाणाऱ्या फर्निचर व्यापाऱ्याला डोळ्यात मिरची पावडर टाकून चार लाख ९० हजाराची लूट केल्याची घटना कशेळी पुलाजवळ घडली. रसिकलाल बदमसिंग छाडुवा (रा. विलेपार्ले, मुंबई) असे या फर्निचर व्यापाऱ्याचे नाव असून, रात्री चामुंडा कंपाऊंडमधील गोडाऊनमधून निघाले असता, दोन मोटारसायकलमधून आलेल्या चौघा अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडविली. पुढे अपघात झाल्याचा बनाव करीत त्यांनी रसिकलाल यांची गाडी अडवली. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चौघा अज्ञात चोरटय़ांनी रसिकलाल व त्यांच्या व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कारच्या पाठीमागच्या सीटवर असणारी चार लाख ९० हजार रुपयांची बॅग घेऊन पोबारा केला.

पाश्र्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टमध्ये राजन राजे यांची युनियन!
ठाणे/प्रतिनिधी

पाश्र्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या अधिपत्याखालील येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र, तंत्रनिकेतनमधील बिगर शैक्षणिक कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन कार्यालयीन कामकाजाच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी कामगार नेते यांची युनियन स्थापन झाली आहे. युनियनच्या फलकाचे अनावरण राजन राजे यांनी नकतेच केले. याप्रसंगी युनियनचे उपाध्यक्ष विष्णू तानकी, सचिव रवींद्र सोनवणे, कार्यकारी सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व्ही. सी. पाटील व मनोज ठाकूर उपस्थित होते. राजे यांनी यावेळी कर्मचारी वर्गावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही व त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन लढा देण्यास तयार राहावे असे सांगितले. आजपर्यंत कर्मचारी वर्ग व्यवस्थापनाच्या दबाव तंत्राखाली काम करीत होता, पण यापुढे हे चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन लवकरच व्यवस्थापनाला देण्यात येईल.