Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

व्यक्तिवेध

टाटा मोटर्स या टाटा समूहातील वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रकाश तेलंग यांची झालेली निवड यथोचितच म्हटली पाहिजे. यापूर्वी ते कंपनीत कार्यकारी संचालक (व्यापारी वाहने) होते. टाटा समूहातील निवृत्ती योजनेनुसार, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक रवी कांत हे वयाच्या ६५ वर्षांनंतर कंपनीतील सक्रिय पदावरून निवृत्त झाले. रवी कांत हे यापुढे टाटा मोटर्सच्या बिगर-कार्यकारी उपाध्यक्षपदावर राहतील. त्यामुळे रवी कांत यांच्या रिकाम्या झालेल्या पदावर प्रकाश तेलंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंग यांनी आपल्या करिअरचा बहुतांश भाग टाटा समूहात घालविला आहे. अनेक जबाबदारीची पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांना टाटा समूह काही नवीन नाही. ते टाटा समूहातच वाढले असल्याने त्यांना पुढील काळात कंपनीची वृध्दी

 

करताना याचा मोठा फायदा होणार आहे. तेलंग यांच्या वाहन उद्योगातील गेल्या तीन दशकांच्या अनुभवाचा टाटा मोटर्सला सध्याच्या कठीण काळात निश्चितच उपयोग होणार आहे. प्रकाश तेलंग यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केल्यावर अहमदाबादच्या आय.आय.एम.मधून व्यवस्थापनातली पदवी घेतली. शिक्षण पूर्ण केल्यावर १९६७ साली ते लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरीस लागले. १९७० साली त्यांनी सुमारे तीन वर्षांनी ही कंपनी सोडली त्यावेळी असिस्टंट इंजिनिअर या पदावर ते होते. टाटा समूहात नोकरीला लागणे हे त्या काळात प्रतिष्ठेचे होते. त्यांनी टाटा प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते याच कंपनीत विविध पदांवर आहेत. त्याशिवाय टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते आहेत. यात टाटा कमिन्स लि., ऑटोमोबाइल्स कॉर्पोरेशन ऑफ गोवा लि., टेलिकॉम कन्स्ट्रक्शन्स इक्विपमेंट्स कं. लि., टाटा मोटर्स मार्कोपोलो लि., टाटा मोटर्स थायलंड प्रा. लि. या कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते आहेत. तर टी.ए.एल. मॅन्युफॅक्चरिंग अँड सोल्युशन्स लि. या कंपनीच्या अध्यक्षपदी ते आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना पुणे मॅनेजमेंट असोसिएशनने ‘बेस्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त हा खास पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. टाटा मोटर्समधील गेल्या ३० हून अधिक वर्षांतल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. या कंपनीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. पुणे, धारवाड, रुद्रपूर येथील प्रकल्पाच्या वाढीत त्यांचा मोलाचा वाटा होता. टाटांचा मिनी ट्रक ‘एस’ यशस्वी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा ट्रक अतिशय अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्याच काळात त्यांच्याकडे टाटा मोटर्सच्या लहान व मध्यम आकारातील व्यापारी वाहने विकसित करणे, विक्री व त्याचे विपणन याची जबाबदारी होती. ‘एस’ च्या निमित्ताने त्यांनी ही जबाबदारी यसस्वीरीत्या पार पाडली. अलीकडेच टाटा मोटर्सने बाजारात आणलेल्या ‘वर्ल्ड ट्रक’ची कल्पना त्यांचीच आहे. टाटांनी गेल्या काही वर्षांपूर्वी घेतलेल्या देऊ या कंपनीचे यशस्वी विलीनीकरण करण्यात, तसेच टाटा-देऊ हे संयुक्त व्हेंचर यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. टाटांनी देऊचा हा प्रकल्प ताब्यात घेतल्याने त्यांना भारतीय बाजारपेठेतही आपली स्थिती मजबूत करता येईल. टाटांनी धारवाड येथे बस व मोठी प्रवासी वाहने तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे ठरविले त्यावेळी या प्रकल्पाची सर्व जबाबदारी तेलंग यांच्यावरच होती. आता कंपनीचा नफा ५० टक्क्यांनी घसरला असताना त्यांच्यावर व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. यातही ते यशस्वी होतील, याबाबत काहीच शंका नाही.