Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

अनिल अंबानींना जिल्हा ग्राहक मंचासमोर हजर राहण्याचा आदेश
वर्धा, ३ जून / प्रतिनिधी

जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ‘रिलायन्स कम्युनिकेशन’चे अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी यांना मंचासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. येथील मनोज सोनछात्रा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रकरणी ग्राहक मंचाने हा आदेश जारी केला. ‘रिलायन्स’च्या भ्रमणध्वनी सेवेबाबतच्या त्रुटीवर मंचाकडे प्रकरण उपस्थित झाले होते. ‘रिलायन्स’च्या महाराष्ट्र सर्कलमधील ‘पोस्टपेड’ व ‘हैलो’ योजनेतील जे ग्राहक वेळेवर बिलांचा भरणा करतील, अशांपैकी तीन हजार ग्राहकांसाठी ‘ड्रॉ’ काढला जाईल.

विकासाला चालना देणारा लोकप्रतिनिधी
मोहन अटाळकर

चकचकीत रस्ते आणि दोन उड्डाणपूल हे अमरावती शहराच्या विकासाच्या दिशेचे निदर्शक ठरले आहेत. विभागीय मुख्यालयाचा दर्जा असूनही नागरी विकासात मागे पडलेल्या अमरावती शहराने गेल्या ५-७ वर्षांत कूस बदलली. डांबरी रस्त्यांचे जाळे, औद्योगिकरणाच्या दृष्टीने पडलेले पाऊल, वैद्यकीय उपचारासाठी आधुनिक सोयी, पिण्याच्या पाण्याची मुबलकता, झोपडपट्टय़ांमधील सुधारणा, या बाबतीत या शहराने झपाटय़ाने प्रगती केली. अमरावती जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनेक विकास कामांमुळे त्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची कासावारांची तयारी
यवतमाळ, ३ जून / वार्ताहर

‘यवतमाळ-वाशीम’ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी माजी आमदार वामनराव कासावार यांनी दाखवली आहे. मात्र, सध्याच घाई करण्याची गरज नाही, असा सल्ला कासावार समर्थकांनी त्यांना दिला आहे. कासावार यांची एकटय़ाचीच जबाबदारी नाही. ती सामूहिक आहे म्हणून कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी राजीनामे द्यावे आणि नव्याने कार्यकारिणी तयार करावी, असाही विचार काही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

बालवयातील संस्काराची उत्तम नागरिक घडविण्यास मदत
कारंजा (घाडगे), ३ जून / वार्ताहर

बालवयातील संस्काराची उत्तम नागरिक घडविण्यास मदत होते, असे प्रतिपादन बालयोगी आशीष महाराज यांनी केले. २४ मे ते ३० मे दरम्यान येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या प्रांगणात आयोजित बालसंस्कार शिबिराच्या समारोपात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अजाबराव भोकरे होते. माजी मुख्याध्यापक प्रभाकरराव इंगळकर, सरपंच शिरीष भांगे, पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग महिल्ले, कैलास अग्रवाल, राजेश पालीवाल व भारती पालीवाल, विलास वानखडे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच बांधकाम पूर्ण
अंजनगावसुर्जी, ३ जून / वार्ताहर

स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणतेही काम करताना कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, असा शासकीय आदेश असतानासुद्धा येथील नगर पालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच बांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामाची माहिती न दिल्याची तक्रार नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. पालिकेचे बांधकाम सभापती मुकुंद अस्वार यांच्या वॉर्ड क्र.२२ आणि काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत कोल्हे यांच्या वॉर्ड क्र.२ मधील सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या रस्ते व नाली बांधकामाची रीतसर निविदा सूचना पलिकेने २३ मे २००९ च्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार निविदा पुरवणे १ जूनपर्यंत व निविदा स्वीकारणे व उघडणे २ जूनला असा उल्लेख असता, प्रशांत कोल्हे यांच्या वॉर्ड क्र.२ मधील गजानन महाराज मंदिराजवळील ५० हजार रुपयांचे नाली बांधकाम आजच पूर्णावस्थेत झाल्याचे दिसत आहे. या प्रभागाचे नगरसेवक प्रशांत कोल्हे यांनी १ जूनला मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी तक्रारीत नालीची आखणी करताना विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण न करता बांधकाम करण्यामागील पालिका प्रशासनाचा हेतू काय असावा, असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.

मुस्लिम समाजातर्फे प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार
गोंदिया, ३ जून / वार्ताहर

जमाते अखलाक कमिटीच्यावतीने इंदिरा गांधी स्टेडियममधील कार्यक्रमात केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतल्याबद्दल त्यांचा जमाते अखलाक कमिटीचे संयोजक इरफान सिद्दीकी व अध्यक्ष मुजीब बेग यांनी स्मृतिचिन्ह देऊन पटेलांचा सत्कार केला. याप्रसंगी प्यारेभाई, सैय्यद इकबाल, अब्दुल लतिफ, नईमखान, सिराज सोलंकी, नियाज सिद्दीकी, गुलरेज हाशमी, हारून खान, जाकीर हुसैन, इमरान खान, साबिर पठान, सलीम खान, असलमभाई, शहबाजभाई, जब्बारभाई, कासिमभाई, नगरसेवक मुजीब पठाण, मुकीत खान, आसिफभाई, कुतुबुद्दीन सोलंकी, लतीकभाई, मुश्ताकभाई, अकरमभाई आदी
उपस्थित होते.

दिगंबर बगाडे यांना निरोप
बुलढाणा, ३ जून/ प्रतिनिधी

बुलढाणा जिल्हा माहिती कार्यालयाच्या खामगाव उप माहिती कार्यालयातील लिपिक दिगंबर रामकृष्ण बगाडे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल आज जिल्हा माहिती कार्यालयात एका छोटेखानी समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांच्या हस्ते बगाडे यांचा शाल, श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. बगाडे यांनी यावेळी सेवाकाळात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमास माहिती सहाय्यक सुधाकर शहाणे, जयसिंग सोळंके, प्रकाश माळोदे, देवीदास देशमुख, रमेश सपाटे, विलास जाधव, राम पाटील आदी उपस्थित होते.

कुलमखेड येथील जलस्वराज्य प्रकल्पाची कामे निकृष्ट
बुलढाणा, ३ जून/ प्रतिनिधी

तालुक्यातील कुलमखेड येथील जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत झालेली कामे हे निकृष्ट दर्जाचे तसेच कामावर अध्यक्ष व सचिव ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या संगनमताने बेहिशोबी खर्च दाखवण्यात आला आहे. शासनाच्या वतीने प्रत्येक गावात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता जलस्वराज्य प्रकल्प राबवण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत स्थानिक पातळीवर समिती नेमण्यात येते. कुलमखेड येथेही अध्यक्ष मीरा लक्ष्मण कानडजे आहेत. जलस्वराज्य अंतर्गत या समितीच्या देखरेखीखाली नवीन विहीर खोदणे, जुन्या विहिरीचे खोलीकरण, स्वीच रुम, वितरण व्यवस्था, पाण्याची टाकी असे विविध कामे करून या कामाचा जास्त खर्च दाखवण्यात आला व काही कामे ही केवळ कागदोपत्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. याची तक्रार ग्रामस्थांनी जलस्वराज्य प्रकल्प बुलढाणा जिल्हा परिषदेत केली असता गटप्रमुख जिल्हा सुलभीकरण चमूने चौकशी केली.

नियोजनाअभावी पेयजल समस्या
शेंदुरजनाघाट, ३ जून / वार्ताहर

पालिकेला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत कमी पडणार हे लक्षात येऊनही योग्य नियोजना अभावी पेयजल समस्या गंभीर झाल्याचे दिसून येते. जामतळावरील दोन विहिरीतील २ ते अडीच तास पाणी दिवसाकाठी मिळत असून त्याला जोड म्हणून नागठाणा धरणाचे पाणी होते परंतु, नागठाणा येथील पाणी पूर्णपणे संपले. अप्पर वर्धाचे पाणी वरुड येथून ११ कि.मी.ची जलवाहिनी टाकून शेंदुरजनाघाटला आणण्याच्या योजनेचे ९७ लक्ष गेल्या दीड महिन्यापासून येऊन त्याची नियोजना अभावी अंमलबजावणी झाली नाही. नियोजन योग्य असते तर एक महिन्याआधी अप्पर वर्धाचे पाणी गावकऱ्यांना मिळाले असते. दुसरा पर्याय खदानचे पाणी पालिकेने घेतले. यातही नियोजनाचा अभाव आढळून आला. आठ दिवसांपूर्वी केवळ एका इंजिनाने खदानचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर आणले. यातही डिझेल पंप ऐवजी १२ ते १५ अश्वशक्तीने सबमर्सीबल पंप टाकून पाणी घेतले असते तर ही वेळ आली नसती. त्यातही खदानचे पाणी दोन महिन्यापूर्वी घेतले असते तर योग्य झाले असते. नागठाणा धरण कोरडे होण्यापूर्वी खदानचे पाणी नियमित सुरू राहिले असते. पेयजल समस्येत भर पडली ती नागठाणा धरणातील पाण्यासोबतचा गाळ जलशुद्धीकरण केंद्रात आल्याने. हा गाळ साफ करण्यासाठी ५० हजार लीटर पाण्याची गरज असून यात दोन दिवसतरी लागतील.

टँकरने संत्रा झाडे व रोपवाटिकेला जीवदान
शेंदूरजना घाट, ३ जून / वार्ताहर

पाण्याच्या टंचाईमुळे संत्रा परिसर वाळवंटाकडे वाटचाल करीत असून अजून जवळपास तीन आठवडे या समस्येला तोंड लागणार आहे. टँकरने पाणी देऊन संत्रा झाडे व रोपवाटिका वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पाण्याच्या टंचाईची तीव्रता एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच जाणवत होती. संत्रा झाडे व बहुतांश नर्सरी ठिंबक सिंचनाच्या भरवशावर होती. आता परिस्थिती आणखी बिकट झाली असून ठिंबक साठीही विहिरीत पाणी शिल्लक नसल्याने बरीच संत्रा झाडे वाळली. बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याअभावी जंबेरी रोपसुद्धा टाकून दिले. संत्रा झाडाला व संत्रा कलमांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेरचा उपाय म्हणून गेल्या एक महिन्यापासून टँकरने पाणी टाकणे सुरू केले आहे. ३००० लिटरपासून ५००० लिटर क्षमतेच्या टँकरला ४०० रुपये ते ७०० रुपये मोजावे लागत असून संत्रा कलमाचे एका टँकरने अवघे १५ ते २५ वाफे ओले होतात तर संत्रा झाडांना टँकरमधून थेट पाईप लावून संत्रा झाडांच्या बुडालाा पाणी टाकून सिंचन करणे सुरू आहे. एवढे प्रयत्न करूनसुद्धा जर पावसाळ्याला मागील वर्षीप्रमाणे उशिरा सुरुवात झाली तर हे प्रयत्नही अपुरे पडणार आहेत. टँकरद्वारे लक्षावधी रुपये खर्चून संत्रा झाडे, संत्रा कलमे वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न येथील शेतकरी करीत आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू पकडली
गोंदिया, ३ जून / वार्ताहर

विनापरवाना अवैधरीत्या देशी दारू घेऊन जात असलेल्या दोघांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही घटना १ जूनला रात्री दरम्यान गोंदिया गोरेगाव राज्य महामार्गावरील मिलटोली येथे घडली. पोलिसांनी दारू नेण्यासाठी वापरण्यात आलेली टाटासुमो व ५० पेटय़ा देशी दारू असा एकूण १ लाख ८९ हजार ८०५ रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना रस्त्याने जात असलेल्या टाटा सुमोवर (एमएच ३५/ई/३४८) संशय आल्याने पोलीस निरीक्षक मुकुंद लांबे यांनी गाडी थांबवून तपासणी केली. तपासणीत यांना सुमोमध्ये देशी दारूच्या ५० पेटय़ा आढळून आल्या. आरोपी राजा अय्यूब खान (२१) व सुदीप शिवलाल पशिने (४३) दोघे राहणार रामनगर बाजार चौक गोंदिया हे दोघे विनापरवाना अवैधरीत्या देशी दारू घेऊन गोंदियावरून गोरेगावकडे जात होते. पथकाने आरोपीसह टाटा सुमो व दारू जप्त केली. सुमोची किंमत दीड लाख रुपये व दारूची किंमत ३९ हजार ८०५ रुपये असा एकूण १ लाख ८९ हजार ८०५ रुपयांचा माल पोलीस पथकाने जप्त केला असून दोघांना अटक केली आहे. फिर्यादी पोलीस निरीक्षक मुकुंद लांबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस हवालदार प्रमोद गजभिये, नायक पोलीस शिपाई राजू मिश्रा, राजेंद्र भेंडारकर व अनिल तायवाडे यांनी पार पाडली.

अवैध दारूव्यवसायातून काकाची हत्या
तिवसा, ३ जून / वार्ताहर

येथून जवळ असलेल्या तारखेड येथील हरिभाऊ गंगाराम मेश्राम (५५) वर्षे यांची त्यांचा पुतण्या आरोपी रणजित महादेव मेश्राम (३५) रा. टाकरखेडा याने हत्या केली. प्राप्त माहितीनुसार हरिभाऊ मेश्राम व रणजित मेश्राम यांचा गावठी दारू विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसाय स्पर्धेतून मोठय़ा युक्तीने रणजित मेश्राम याने काकाला पार्टी करण्याच्या उद्देशाने बोलाविले. त्यांनी अगोदर वर्धा नदीच्या पात्रात जाळे टाकून मासे पकडले व तीरावर पार्टीचा बेत आखला. त्यामध्ये ओली पार्टी झाली. काकाचा दारूव्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालत असल्याने रणजितच्या मनात बऱ्याच दिवसाची खुमखुमी होती. याचा एक दिवस डाव काढण्याच्या भूमिकेनेच त्याने सर्व तयारी चालविली. वर्धा नदीच्या तीरावर जूनच्या ३ ते ४ वाजताचे दरम्यान पैसे मागण्यावरून वाद झाला. त्यात बेदम मारहाण केली. काकू तारा सोडवायला गेली. तिलाही पुतण्याने मारहाण केली. जीव वाचवून कशीतरी जावई व मुलाला बोलावून आणते म्हणून गेली. तोपर्यंत याने हरिभाऊची हत्या करून मृतदेह वर्धा नदीत टाकला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चप्पला, कपडे, जेवणाचे साहित्य फेकून दिले. एक महिन्या अगोदर याच गावात मुलाने बापाची हत्या केली. प्राथमिक अंदाजावरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

शेंदूरजनाघाटमध्ये वानरांचा धुमाकूळ
शेंदूरजना घाट, ३ जून / वार्ताहर

पाण्याच्या टंचाईचा फटका वन्य जीवांनाही बसत आहे. जंगलात पाणी नसल्याने सातनूर, खाळा, झटामझिरी वाई लगतच्या गावात अस्वल पाण्याच्या शोध घेत येत असल्याने व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघ, अस्वल पाण्याच्या शोधात गावठाण शिवारात येत असताना वानरांनी थेट शहरात पाण्यासाठी धुमाकूळ घातला आहे. या घरावरून त्या घरावर उडय़ा मारताना वानर दिसत असल्याने बालगोपालांना गंमत वाटत असली तरी या वानरांचा टोळी प्रमुख नागरिकांवर कधी हल्ला करण्याची भीती आहे. वानरांच्या धुमाकुळाने नागरिकात भीती निर्माण झाली. वाळवणासाठी टाकलेले धान्य, शेवया, कुरडया, पापड यांचा अक्षरश: पडशाही वानरसेना पाडीत आहे. घराघरांवरून उडय़ा घेताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरावरील कवेलू आरामात फोडत आहे.

गोंदिया जिल्ह्य़ातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या
गोंदिया, ३ जून / वार्ताहर

सध्या सुरू असलेल्या पोलीस दलाच्या बदलीसत्रात जिल्ह्य़ातील नऊ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्य़ाबाहेर करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यामध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व आठ पोलीस उपनिरीक्षकांच्या समावेश आहे. रविवारी बदलीचे आदेश निघाले. यामध्ये केशोरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांची बदली ठाणे शहर येथे करण्यात आली आहे. गोंदिया शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पगार व नक्षलसेलचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची नाशिकला शहर पोलीस व उपनिरीक्षक रसेडे यांची नाशिक शहर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेष शेळके व सी ६० पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोनोने यांची अमरावती परिक्षेत्र येथे तर शहर पोलीस उपनिरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, नक्षलसेलचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत शिंदे व रामनगर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय पिंगळे कोल्हापूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे.

महाराणा प्रतापांच्या शूरगाथा उपेक्षित -प्रा. बघेल
चिखली, ३ जून / वार्ताहर

मोगलांच्या राजवटीतील इतिहासकारांनी मोगल पराभवांचा इतिहास न लिहून महाराणा प्रतापांच्या अनेक वीरगाथांकडे दुर्लक्ष केल्याने त्या उपेक्षित राहिल्याचा आरोप महाराणा प्रताप या विषयाचे अभ्यासक प्रा. नरसिंह बघेल (जळगाव) यांनी केला. महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राणांच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या शूरकथा जगासमोर आणण्यासाठी युवकांनी मेवाडच्या भूमीमध्ये जाऊन इतिहास संशोधनाचे कार्य हाती घेण्याचे आवाहन देखील प्रा. बघेल यांनी केले. महाराणा प्रताप यांच्या ४६९ व्या जयंतीनिमित्त रथावरून महाराणांच्या पुतळ्याची मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती. पुतळ्यासमोर या मिरवणुकीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सध्या राज्यात सर्वत्र गाजत असलेल्या ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटाचे लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ. प्रताप राजपूत, अॅड. सदार, पत्रकार समाधान गाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.