Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

घरोघरी - काष्ठमहाल
शाश्वती : अरे वा! समस्त महिला मंडळ इथं आहे की!
नंदिनी : अग, तसा आमचा मुक्काम सध्या इथेच असतो. बाईसाहेबांनी पाय मोडून घेतलाय ना!
माधुरी : या मुलांच्या भाषेत आम्ही ना इथे पडीक असतो बरं का!
नंदिनी : तू रेखाला भेटायला येणार कळल्यावर म्हटलं चला रेखाच्या निमित्तानं या उंबराच्या फुलाशी तरी गाठ पडेल.

 

माधुरी : तर काय. नाही तर तू आम्हाला भेटतेस ती या मुलांच्या बोलण्यातून हं.
शाश्वती : अहो काकू, पण मग तुम्ही पण येत जा ना गप्पा मारायला.
माधुरी : अगं, तुझ्या आणि आमच्या वेळा कुठे जमताहेत, आम्ही या अशा दुपारी मोकळ्या होणार तेव्हा तुम्ही सगळे ऑफिसमध्ये. तुम्ही ऑफिसमधून परत येणार तेव्हा आम्ही स्वयंपाकघरामध्ये.
रेखा : पण काय गं शाश्वती, तू कशी काय आज घरी?
शाश्वती : मी सध्या रजेवर आहे. नुकतंच शिबीर संपलंय ना..
रेखा : तुझ्या शिबिरावर मुलं मात्र एकदम खूश आहेत हं.
शाल्मली : खूश..? अगं कुणालाच परत यायचं नव्हतं. शेवटच्या दिवशी तर मुलं अक्षरश: रडली.
शाश्वती : खरं सांगू का.. हा माझा प्रत्येकच शिबिराचा अनुभव आहे. मुलं मोठय़ा मुश्किलीनं घरी जातात.
शाल्मली : पण आता एक बरं झालंय, हा ग्रुप असाच एकत्र ठेवण्यासाठी शाश्वतीनं एक धमाल आयडिया काढली आहे.
माधुरी : ती काय बाई?
शाल्मली : अगं माई, प्रत्येक गुरुवार हा आता स्टोरी टेलिंग डे असणार आहे.
नंदिनी : म्हणजे काय?
कुहू : थांब, थांब मी सांगते. म्हणजे आता प्रत्येक गुरुवारी शाश्वतीदी आम्हाला गोष्ट सांगणार.
नंदिनी : असं होय ठमाकाकू. अगं आमच्या लहानपणी आमची आजी तर आम्हाला रोज गोष्ट सांगायची.
कुहू : ते वेगळं गं नंदिनीआजी. तशी लास्ट इयपर्यंत माझी ममा पण सांगायची. पण या वर्षी ममानं जॉब चेन्ज केलाय ना तर ती इतकी दमते की पटकन झोपूनच जाते.
अंजोर : माझी ममा पण असंच करते.
शाश्वती : खरं सांगायचं ना तर बहुतांश घरात आज अशीच परिस्थिती आहे.
शाल्मली : एवढंच नाही तर वेळ असला तरी हल्लीच्या आयांना आणि आज्यांना टीव्ही बघायचा असतो. मग गोष्टी बिष्टी दूरच राहतात.
वेदा : त्याच्यावर उपाय म्हणून ही स्टोरी टेलिंग डेची कल्पना. अगं, कारण शाश्वतीकडे काय स्टोरीज आहेत ग एकेक खजिना आहे अक्षरश:.
शाल्मली : नुसत्या स्टोरीज असूनही काही उपयोग नसतो वेदा. गोष्ट सांगणं ही एक कला आहे..
वेदा : आणि शाश्वती त्यातही एक्स्पर्ट आहे अगदी.
कुहू : तुला माहित्येय रेखाआजी, शाश्वतीदी आम्हाला रोज रात्री एक गोष्ट सांगायची.
सलील : होय. आम्ही जिथे राहत होतो ना त्या घराच्या अंगणात एक मोठं बनयान ट्री होतं आणि त्या ट्रीभोवती एक स्टेज बांधलं होतं त्याच्यावर बसून आम्ही गोष्ट ऐकायचो.
माधुरी : कुठलं झाड होतं?
शाल्मली : वडाचं झाड गं माई! त्याच्याभोवतीचं स्टेज म्हणजे पार.
माधुरी : पण सलीलनं काहीतरी वेगळं नाव घेतलं आता.
वेदा : हं, अग तो बनयान ट्री म्हणाला. बनयान ट्री म्हणजेच वडाचं झाड.
माधुरी : असं होय. कसली धेडगुजरी भाषा रे तुमची. अगं बाई, बरी आठवण झाली. सात तारखेला वटपौर्णिमा आहे लक्षात आहे ना गं सगळ्यांच्या.
शाश्वती : मग इथेही वडाच्या फांद्या घरी आणून पूजा होते की काय?
शाल्मली : शंतनू असताना असं काही शक्य आहे का? तो फाडूनच खाईल. आपल्या सोसायटीत तर वडाच्या फांद्या आणायला टोटल बंदी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून जवळपासच्या सगळ्या सोसायटय़ांनीही बंदी घातली आहे.
शाश्वती : मग ठीक आहे, नाही तर वटसावित्रीच्या निमित्ताने वडाच्या झाडांची जी बेफाम कत्तल होते ती अक्षम्य असते.
माधुरी : घ्या. तू पण शंतनूसारखी वृक्षमैत्रीण का?
शाल्मली : अगदी पक्की. झाडं वाचवण्यासाठी काहीही करायला तयार असते. तिच्या घरी जाऊन बघ. झाडांमध्येच राहते ती.
वेदा : हो नं. आणि माई, झाडांबद्दलच्या माहिती आणि गोष्टींचाही खजिनाच आहे तिच्याकडे. पण शिबिराच्या शेवटच्या दिवशी तिनं सांगितलेली गोष्ट मला खूपच आवडली होती.
शाल्मली : कोणती गं?
वेदा : ती गं.. राजाचा महाल जळतो..
शाल्मली : हां हां ती होय! खरंच. अगदी आय ओपनर स्टोरी होती.
कुहू : मला सुद्धा खूप आवडली. घरी गेल्यावर मी आणि कुंजरनं ती गोष्ट ममा आणि पपाला सांगितली तर तेही खूश झाले. म्हणाले, अरे, असं काही शिबिरात शिकवत असतील तर छानच आहे.
माधुरी : अरे, नुसतंच त्या गोष्टीचं कौतुक करताय. काय गोष्ट होती ते तर सांगा ना.
शाल्मली : ए शाश्वती, तूच सांग ना.
शाश्वती : गोष्ट? आणि आता?
नंदिनी : सांग गं. आम्हालाही ऐकू दे ना. नाहीतरी आजपासून तुमच्या स्टोरी टेलिंगला सुरुवात होणारच आहे. मग इथूनच श्रीगणेशा होऊ दे. तुला काही काम नाही आता?
शाश्वती : नाही. तसं काही र्अजट काम नाहीये..
नंदिनी : मग बस. नाही तरी तू कुठे आमच्या वाटय़ाला येणार?
शाश्वती : बरं बरं सांगते. पण जरा थोडक्यात सांगते हं. एकदा एका राजाने एक काष्ठमहाल बांधून घेतला. उत्तम कारागीर, उत्तम प्रतीचं लाकूड, भरपूर पैसा.. त्यामुळे एक उत्कृष्ट कलाकृती निर्माण झाली होती. अशा स्वप्नमहालात एका शुभदिवशी वाजत-गाजत प्रवेश करायचा असं त्यानं ठरवलं. पण ते त्याच्या नशिबात नव्हतं. कारण प्रवेश करण्याआधीच तो काष्ठमहाल जळाला. पण ते पाहूनही राजा शांत होता. त्यानंतर काहीच दिवसांनी राजवाडय़ाच्या समोरचा शंभरी पारा केलेला अशोक वृक्ष उन्मळून पडला. ते बघायला गेलेल्या राजाचा बांध सुटला. त्याला रडताना पाहून तिथं जमलेल्या अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण काष्ठमहाल जळून खाक झाला तेव्हा राजाचं करोडोंच नुकसान झालं होतं. पण तेव्हा राजा शांत होता. आणि आता एका झाडासाठी शोक करतोय. हा काय प्रकार आहे? त्यांनी राजाला विचारलं, तेव्हा राजा म्हणाला, ‘अरे, इतक्या हौसेनं बांधलेला माझा काष्ठमहाल जळाला. खूप नुकसान झालं. याचं वाईट निश्चित वाटलं. पण तरीही मी शांत होतो कारण तसा काष्ठमहाल मी पुन्हा बांधू शकतो. पण शंभरी पार केलेला हा अशोक वृक्ष कुठून आणू? अरे, माझ्या काष्ठमहालात फक्त काही जणांची सोय झाली असती, पण हा अशोक वृक्ष किती जणांना सावली देत होता. याच्या प्रेमळ सावलीत किती जण विसावत होते.. शंभर पावसाळे त्यानं पाहिले होते. असे एकेक वृक्ष म्हणजे पदरी असलेलं अमूल्य वैभव आहे आणि हे वैभव मी आज गमावून बसलो. माझं हे नुकसान फार मोठं आहे.
माधुरी : आज राजे गेले, राजवाडे गेले, पण राजाचे विचार काही कालबाह्य़ झालेले नाहीत, नाही? आज ज्या मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होते आहे, त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागतो आहे. पण तरी आपण काही विचार करायला तयार नाही, हे भीषण आहे.
नंदिनी : हल्ली लोकांना सारखं सगळं सांगायला लागतं. मतदान करायला जा, झाडं तोडू नका, पाणी वाया घालवू नका, वीज वाचवा, निर्माल्य खाडीत टाकू नका, थुंकू नका, सार्वजनिक ठिकाणी सिगारेटी ओढू नका, प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका..
माधुरी : आणि तरीही लोकांना कळत नाही ते नाहीच..
शाल्मली : काकू, ही यादी वाढवू तेवढी कमीच आहे.. असं वाटतं लोकांनी हल्ली स्वत:ची बुद्धी वापरणंच सोडून दिलंय. इतकं कानीकपाळी ओरडून सांगितलं तरी पालथ्या घडय़ावर पाणी.
शंतनू : पण तरीही, प्रयत्न सोडून चालत नाही.
माधुरी : या. आपण कधी आलात? आणि हे हातात काय आहे? कुठल्या मोहिमेची तयारी?
शंतनू : तुम्ही सगळे गोष्टीत रमला होतात ना तेव्हाच आम्ही आलो आणि मोहीम म्हणशील तर उद्या पर्यावरण दिन. त्यासाठी ही सगळी पोस्टर्स लावायची आहेत.
नंदिनी : अगं बाई, बराच मोठा गठ्ठा दिसतोय. कधी करता रे हे सगळे उद्योग तुम्ही मुलं?
शंतनू : अं हं हं माई. ही पोस्टर्स, शिबिरात तयार केलेली : या छोटय़ा दोस्तांनी. आम्ही फक्त लावणार. आम्ही परत परत प्रयत्न करत राहणार.
माधुरी : तेही खरचं म्हणा. हे तुम्हाला शिकवणाऱ्या आम्हीच की.
शंतनू, शाल्मली, वेदा : म्हणजे?
माधुरी : अरे, तुमच्या लहानपणी आम्हीही हेच धोरण स्वीकारलं होतं.. परत परत प्रयत्न करण्याचं..तेव्हा तर..
शंतनू, शाल्मली, वेदा आणि इतर : कळलं.. कळलं..
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com