Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

थर्ड आय
आम्ही भांडतो!
तुम्ही गंमत बघा..
आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! अहो, पण पुढे काय? दुकानांवरच्या पाटय़ा, अमराठी लोकांनी ‘ठिगळ’ चिकटवल्यासारख्या ‘मराठी’ केल्या. अहो, पण पुढे काय? मराठीच्या मुद्दय़ावर निवडणुकीत लाखोंची मतं पारडय़ात पडली. अहो, पण पुढे काय? पुढे नेहमीचंच! पुढे नेहमीप्रमाणेच पूर्वापार चालत आलेला इतिहास! मराठी माणसातली आपापसातली बेदिली आणि मराठी माणसाची भाऊबंदकी तर जगप्रसिद्धच!
भाऊबंदकी आणि बेदिली फक्त मराठी माणसातच असेल का? बहुधा सर्व भाषिकांमध्ये, सर्व धर्मीयांमध्ये असेल; परंतु स्वत:ची भाऊबंदकी, स्वत:चेच दुर्गुण स्वत:च चव्हाटय़ावर आणण्याची वृत्ती बहुधा फक्त मराठी माणसाकडेच असावी आणि म्हणूनच ती जगप्रसिद्ध आहे याचं वाईट वाटतं. आपल्या मराठी मनातली ही बेदिली, भाऊबंदकीची वृत्ती कमी व्हावी किंवा त्यावरून भावी पिढीने धडा शिकावा, काही बोध घ्यावा यासाठीही अनेक प्रयत्न झाले. पानिपतची लढाई हे त्याचं उत्तम

 

उदाहरण! विश्वास पाटलांनी ‘पानिपत’च्या रूपानं लोकांसमोर मराठी माणसाची बेदिली, भाऊबंदकी जिवंतपणे मांडली. पानिपतच्या लढाईवर पेशव्यांची हार कशी झाली, याचं उत्तम पृथ:करण म्हणजे पानिपत कादंबरी! पुढे या कादंबरीवर ‘रणांगण’ हे उत्तम नाटकसुद्धा पेश केलं गेलं. पण दुर्दैवाने असं वादग्रस्त विधान करावंसं वाटतं, की मराठी माणसाच्या ज्या बेदिलीवर आणि भाऊबंदकी वृत्तीवर प्रकाश टाकणारं हे नाटक सादर झालं, तीच बेदिली या नाटय़कृतीचे प्रयोग बंद करण्यास कारणीभूत ठरली.
दोन आठवडय़ांपूर्वी, हैदराबादच्या ‘हुसेनसागर’ तलावाजवळ मी फोटोग्राफीसाठी उभा होतो. अथांग सागरासारखा पसरलेला तो तलाव आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात फोटोग्राफी करताना एका तेलगू माणसाशी ओळख झाली. मी मराठी असल्याचं कळल्यावर तो आनंदाने म्हणाला, ‘जय महाराष्ट्र!’ मीही खूश झालो आणि लगेच त्याने विचारलं, मनसे की शिवसेना? मी अवाक् झालो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडींवर परप्रांतियांचं किती बारीक लक्ष असतं बघा. मी त्याला उत्तर दिलं- ‘मी मराठी!’ तो म्हणाला, ‘ग्रेट, प्राऊड मॅन, you will succeed one day, पण आपसमें झगडा नक्को करा, नही तो पानिपत!’ असं वाटलं, एखाद्याने आमच्या मराठी माणसाच्या वृत्तीवरून माझ्याच मुस्कटात मारली.
खरंच आपल्या मायमराठीची गळचेपी, मायमराठीवरचा अन्याय कोणामुळे होतोय? आपल्या मराठीचा झगडा, परप्रांतियांशी आहे की आपलाच आपल्याशी आहे? प्रत्येक क्षेत्रात परप्रांतियांच्या घुसखोरीमुळे आपल्यावर अन्याय होतोय की आपापसातल्या उदासीन, आळशी किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या वृत्तीमुळे मराठीवर आणि पर्यायाने मराठी माणसांवर अन्याय होतोय?
परप्रांतियांना आणि अन्य भाषिकांना मराठीची ताकद दाखविण्यासाठी, मराठीच्या मुद्दय़ांवर, मराठी मतांची दुथडी भरून पोतडी भरणं एक वेळ समजू शकतो. पण म्हणून दोन मराठी माणसांनी, आपल्याच मराठीच्या मुद्दय़ावर, ‘एकमेकांवर’ चिखलफेक करायलाच हवी का? म्हणजे मराठीचा मुद्दा राजकीय असेल किंवा भावनिक म्हणू हवं तर, पण चिखलफेक मात्र वैयक्तिक पातळीवर? कशासाठी?? मराठीच्या तराजूत कोणी किती योगदान टाकलं आणि त्यामुळे कोणाचं पारडं किती जड आहे ते दाखवण्यासाठी म्हणजे ‘मराठीवरचा अन्याय,’ ‘मराठीची गळचेपी’ हे मूळ मुद्दे बाजूला सरकवून, पुन्हा एकदा कोंबडय़ांची झुंज लगते तसं- ‘आम्ही भांडतो, तुम्ही गंमत बघा’ असा तर हा लाजिरवाणा खेळ नाही ना?
व. पु. काळे यांची एक कथा आठवते आहे. त्यात जे. पी. (म्हणजे सध्याचा S.E.M. म्हणा) जोशी नावाचा गृहस्थ आहे. तो चक्क भांडणाचे क्लासेस चालवतो. त्या भांडणाच्या क्लासेसचा चक्क सिलॅबस असतो; वर्गवारी असते. म्हणजे भांडण कोणाशी करावे? भांडणाचा विषय काय असावा? कुठल्या स्थळावर कुठले भांडण करावे? पुरुषांची भांडणे, बायकांची भांडणे यांची दोन वेगवेगळी वर्गमांडणी केलेली आहे. मराठीच्या मुद्दय़ावर, आपापसातच कोंबडय़ाची झुंज लागल्यासारखे भांडणाऱ्यांनी या जोशींकडे भांडणाच्या क्लासला जावं की काय? असं वाटतं. काय गमंत आहे बघा; व. पुं.ची ही फार जुनी कथा आहे. परंतु एका मराठी माणसाने, श्री. जोशी याने भांडणाचे क्लासेस काढावेत, ही संकल्पना म्हणजे निव्वळ योगायोग! वपुंच्या याच कथेत भांडणाच्या क्लासेसची गंमतीशीर वर्गवारी आहे म्हणजे पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम वेगळा, दुसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम वेगळा असे टप्पे आहेत. एक गंमतीशीर प्रसंग आहे-जोशींचा भांडणाचा क्लास सुरू असतो. विषय: बसच्या रांगेत घुसखोरी करणाऱ्याशी कसे भांडावे? त्यांचा विद्यार्थी पद्धतशीर भांडत असतो. भांडण विकोपाला जाते आणि भांडणारा एक विद्यार्थी, दुसऱ्या विद्यार्थ्यांला भांडताना विचारतो, ‘बस काय तुझ्या बापाची आहे का?’ जोशी पटकन मध्ये पडतात आणि त्याला विचारतात, ‘तू कुठल्या वर्षांचा विद्यार्थी आहेस? तो विद्यार्थी म्हणतो, 1st year! जोशी त्याला खडसावतात-दुसऱ्याचा बाप काढणे, हा भांडणाच्या दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमात आहे; तू आत्ता त्या माणसाचा बाप काढू शकत नाहीस.’
मूळ मुद्दा सोडून लोकांसमोर आदर्श बनून राहण्याऐवजी, वैयक्तिक पातळीवर चिखलफेक करून, जनसामान्यांसमोर तमाशाचा किंवा कोंबडय़ाची झुंजीचा खेळ करणाऱ्यांनो, वपुंच्या काल्पनिक कथेतसुद्धा अभ्यासक्रमाची वर्गवारी आहे. मग तुम्ही तर लोकांचे आदर्श! तुम्हीच ताळतंत्र सोडून हमरीतुमरीवर आलात तर तुमच्या या खेळासाठी सुद्धा काही अभ्यासक्रम किंवा नियम असायला हवेत.
मराठीचा ऱ्हास किंवा मराठीचा विकास यासाठी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. नवीन पिढीची वाचनाची आवड हळूहळू नाहीशी होते आहे. मराठीसाठी काही करावेसे वाटलेच तर नवीन पिढीला आधी वाचनसंस्कृतीकडे वळवा. थोरामोठय़ांचा आदर ही नेस्तनाबूत होत चाललेली एक चिंता आहे. मराठी संस्कृती जर खरंच टिकवायची असेल तर थोरामोठय़ांचा आदर तुम्हीही बाळगा आणि नवीन पिढीलाही शिकवा.
फक्त दुकानांच्या पाटय़ांवरची अक्षरं मराठीत लिहिण्याने, मराठी टिकणार नाही. त्यापेक्षा अन्य भाषिकांनी बनवलेल्या, लाजिरवाण्या मराठी जाहिरातीमधली, मराठी भाषा वाचवा. त्यांचं अशुद्ध लेखन आणि धेडगुजरी मराठी बोली भाषा, यालाच आमची नवी पिढी आदर्श मानत आहे. त्याकडे लक्ष द्यायलाच हवे. ‘कांदेपोहे’ हे नाव मराठी चित्रपटाच्या शीर्षकात दिसते; पण मराठी घरातले कांदेपोहे हा खाद्यपदार्थ दुर्मिळ होऊन, पिझ्झा-बर्गरचे चोचले वाढत आहेत; त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शाळांमधून ICSEचं फॅड वाढतंय, पण त्यामुळे त्या मुलांना शेक्सपियरचं रसग्रहण करायची संधी मिळत आहे; वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, वि. वा. शिरवाडकर त्यांच्या साहित्याचं रसग्रहण करण्याची नव्हे!
हैदराबादला ज्या ‘हुसेन सागर’ तलावाजवळ मी फोटोग्राफी केली, त्या तलावाच्या चारही बाजूने मोठे रस्ते आहेत. मी ज्या ‘टँकबंड’ रोडजवळ उभा राहून फोटोग्राफी केली; त्या रस्त्यालगत तेलुगू भाषेतील, साहित्य-सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित, अशा २६ दिग्गजांचे पुतळे उभारलेले आहेत. तेलगू लोकांनी आपल्या संस्कृतीचा केलेला हा सन्मानच म्हणायला हवा.
मराठी संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे. मराठीची गळचेपी होते आहे, म्हणून गळे काढून, नंतर आपापसातच भांडत बसणाऱ्यांनो, मराठीचे चांगले दिवस येण्यासाठी किंवा मराठी संस्कृतीची, भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी, आपण आमचे लोकप्रतिनिधी म्हणून काय प्रयत्न करत आहात; याची एकदा तरी जनतेला जाहीरपणे माहिती सादर कराल का हो? मराठी माणूस उद्योग क्षेत्रात पुढे जावा यासाठी, वडापाव/झुणका भाकर यापलीकडे झेप घ्यायला शिकवाल का हो? मराठी माणसाचे सांस्कृतिक क्षेत्रातलं पहिलं प्रेम आणि वेड म्हणजे मराठी नाटक! पण महाराष्ट्रातील किती मराठी नाटय़गृहांना, मराठी नाटककारांची नावे दिली असतील? नाटय़गृहांना राजकीय नेत्यांची नावे देण्याच्या लालसेपोटी, आम्ही नव्या पिढीला नाटककार, दिग्दर्शक व एकूणच नाटय़क्षेत्राविषयी जाणूनबुजून अंधारात ठेवतो आहोत असे तर नाही ना? मग मराठी संस्कृतीविषयी अज्ञान, अंधार, गळचेपी, अन्याय कोणामुळे होत आहे?
मराठी भाषा, मराठी संस्कृतीबद्दल खरोखरच उदात्त प्रेम असेल, तर वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक चिखलफेक थांबल्याशिवाय हे कसे साध्य होईल? मराठीच्या प्रेमापोटी लढणाऱ्यांनो, मराठी माणसाला दुधखुळा समजू नका. मराठी माणूस फक्त ‘तमाशा’ बघणारा किंवा कोंबडय़ाची झुंज बघत बसणारा आहे, असा गैरसमज कृपा करून, करून घेऊ नका. मराठी संस्कृती आणि मराठीचा खरा ऱ्हास कोणामुळे होत असेल, तर तो मराठी माणसाच्या, ‘आम्ही भांडतो, तुम्ही गंमत बघा..’ या विलासी आणि घमेंडी वृत्तीमुळेच, हे विसरू नका.
संजय पेठे
sanjaypethe@yahoo.com