Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

ओपन फोरम
व्हिवाच्या गेल्या दोन अंकांमध्ये रॅगिंग हा महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय हाताळला गेला. रॅगिंगसाठी आता हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनचा तरूण मुलांना काय आणि कसा उपयाग होईल, या बाबतीत जाणून घेतलेली ही मतं.

सचिन पवार : (बी. कॉम.)
रॅगिंग हा प्रकार वाईटच आहे. मस्करीत थोडीशी चिडवाचिडवी ठीक आहे. पण त्याचा अतिरेक व्हायला नको. रॅगिंगचा वाईट परिणाम होत आहे, आपल्या चिडवण्यामुळे कोणाचे नुकसान होत आहे, असं वाटलं, तर तिथेच ही मस्ती थांबवावी. रॅगिंगसाठी हेल्पलाईन असली तरी त्याचा काही फायदा होईल असं नाही वाटत. कारण जी मुलं रॅगिंगला बळी पडतात, ती घरी आपल्या आई-बाबांनाही काही सांगत नाहीत. तर हेल्पलाईनचा उपयोग कसा करणार?

कविता सुरवैये : (एस.वाय.बी.ए.)
माझ्या मते रॅगिंगसारखा प्रकार समूळच नष्ट झाला पाहिजे. थोडी थोडी मजा म्हणताना ती कधी मोठं रुप धारण करते ते आपलं आपल्यालाच कळत नाही. त्यामुळे थोडीही मस्करी नको. ग्रुपमध्ये ज्या प्रमाणात मजा, मस्ती चालते तेवढं ठीक आहे. पण ते तेवढंच.. हेल्पलाईनचा फायदा होऊ शकतो, पण ती सेवा तितकीच तत्पर हवी.

पंकेश खामकर : (बी.कॉम.)
माझ्या मते रॅगिंग चुकीचच आहे. यात फक्त रॅगिंग करणारेच चुकीचे आहेत असं नाही. तर ते सहन करुन गप्प बसणारेही चुकीचे आहेत. हे थांबवण्यासाठी आपण स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांची कॅम्पेन्स झाली पाहिजेत. हेल्पलाईन असेल तर चांगलं आहे. पण त्याचा जास्त फायदा होईल असं नाही वाटत.

किरण बागवे : (हॉटेल मॅनेजमेंट)
रॅगिंग म्हणजे थट्टा- मस्करी. थोडय़ा प्रमाणात अशी मस्करी करणं चालू शकतं. पण जास्त पर्सनल होत असेल तर ते मात्र निश्चितच वाईट. मला वाटतं की मस्करी करणाऱ्यांचा उद्देश एवढा भयानक नसतो. त्याचा होणारा परिणाम हा त्या त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. हेल्पलाईन सुरु झाली तर तिचा उपयोग होईल असं मला वाटतं.

मुग्धा देसाई : (सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग)
मस्करी शेवटच्या टोकापर्यंत होत असेल तर ते रॅगिंग. त्यामुळे ते वाईटच. कारण अशी मजा जीवावर बेतू शकते. अशी मजा करणाऱ्यांना शिक्षा हवीच. पण त्याच बरोबर अशा मुलांना समुपदेशनाचीही गरज आहे. आपल्या समोर जर असे प्रकार होत असतील तर आपणही ते रोखण्यासाठी पुढे झालं पाहिजे. हेल्पलाईन सुरु झाली तर तिचा उपयोग होईल असं मला वाटतं.