Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

दवंडी
मंदीत धंदा मनोरंजनाचा..
माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
सिनेमा, टीव्ही हे क्षेत्रच मुळी स्वप्नांच्या गावात रमण्याचं आहे. स्वप्न दाखवायची, खोटे संघर्ष दाखवायचे.. आणि अखेर सगळं चांगलं होईल, सज्जनांचा विजय होतो, दुर्जनांचा पराभव होतो या परंपरागत निर्णयापर्यंत येऊन थांबायचं. जगात काहीही चाललं असलं तरी आपण त्यातून मुक्त आहोत, आपलं जगच वेगळं आहे अशा भ्रमात यातली बरीचशी मंडळी वागत असतात. गेले वर्षभर देशात मंदीचे वातावरण आहे. त्याचा यांच्या चटोर साडय़ांवर, गोंडेदार शालींवर

 

आणि तलम सलवार कुर्त्यांवर काही परिणाम झाला नव्हता. नाही म्हणायला मध्ये टेलिव्हिजन क्षेत्रातल्या पडद्यामागच्या कामगारांनी संपाचे हत्यार उपसले तेव्हा सगळे हवालदिल झाले होते. अनेक मालिका पुन:प्रक्षेपण करू लागल्या होत्या. जाहिराती कमी झाल्या होत्या. तेव्हा सगळ्या वाहिन्यांनी असा आव आणला होता की हा तुमचा अंतर्गत मामला आहे. तुम्ही काय ते करून सोडवा.. पण तेव्हाच लक्षात आलं होतं की, सगळं ठाकठीक वाटत असलं तरी तसं नाहीये..
ताजी बातमी अशी आहे की, निर्मात्यांचे करोडे रुपये वाहिन्यांनी थकवले आहेत आणि त्यामुळे ज्यांचे पोट हातावर आहे अशांनी आता बंड पुकारले आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) या संस्थेच्या अधिपत्याखाली २२ छोटय़ा-मोठय़ा कामगार संस्था येतात. सहारा वन आणि ९ एक्स या दोन वाहिन्यांनी निर्मात्यांचे करोडो रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे त्या निर्मात्यांनी हाताखालच्या सगळ्याच लोकांचे पैसे थकवले आहेत. या संस्थेने आता या वाहिन्यांचे चित्रीकरण जिथे चालू असेल तिथे जाऊन ते नासधूस करून बंद पाडण्याचा निर्णय घेतला आहे. असं करणं वाईट आहे, पण नाकातोंडात पाणी जायला लागलं की माकडीण स्वत:च्या पोरालाही पायाखाली घेते.
सहारा वनवर एक कार्यक्रम दाखविला जात असे ‘बिगेस्ट लूजर जितेगा.’ या कार्यक्रमामध्ये जाडय़ा जाडय़ा लोकांना सहभागी करून काही आठवडय़ात जो सर्वात जास्त वजन कमी करील तो जिंकेल अशी संकल्पना होती. मे २००७ मध्ये सोळा स्पर्धकांना घेऊन हा कार्यक्रम झाला, संपला.. पण निर्मात्याचे जवळपास १५ कोटी रुपये वाहिनीने दिलेच नाहीत. त्यातले चार कोटी तर कष्टकरी कामगार लोकांचे आहेत. FWICE या संस्थेचे असे म्हणणे आहे की, ‘९ एक्स’ या वाहिनीकडे निर्मात्यांचे जवळपास १०० कोटी रुपये थकले आहेत. त्यापैकी २५ कोटी कष्टकरी जनतेचे आहेत. किती दिवस वाट पाहायची? FWICE चे म्हणणे असे आहे की, ऑक्टोबर २००८ मध्ये जसा आम्ही संप केला होता तसा आता करणार नाही.. कारण सगळ्याच उद्योगाला वेठीला धरण्यात काही अर्थ नाही. ज्या निर्मात्यांनी आमचे पैसे थकवले आहेत त्यांची चित्रीकरणे आम्ही बंद पाडू. पूर्वी ही युक्ती सफल झालेली आहे. झी टीव्हीवरच्या ‘झाँसी की रानी’ या मालिकेचे चित्रीकरण अशा पद्धतीने थांबवून त्यांनी सुमारे ६६ लाख रुपयांचे येणे वसूल केले होते.
सोनी टीव्हीवरच्या ‘मीत मिला दे रब्बा’ या मालिकेचे चित्रीकरण जेव्हा येणी प्रमाणाबाहेर गेली तेव्हा निर्मात्यानेच थांबविले आणि मग वाहिनीने १ कोटी ९१ लाखांचे देणे दिले. ‘नाक दाबले की तोंड उघडते’ ही म्हण सगळीकडेच लागू होते. वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे असे आहे की, जाहिरातदारांकडून पूर्वी ६६ दिवसांनंतर पैसे येत असत. तेवढी सवलत सगळ्यांनाच द्यावी लागते.
पण आता तेही येण्याचे बंद झाले आहे. मोठमोठे जाहिरातदार आता पैसे वेळेवर द्यायला टाळाटाळ करू लागले आहेत. जर आमच्याकडे पैसे आले नाहीत तर आम्ही निर्मात्यांना कुठून देणार? पण वाहिनीचे प्रतिनिधी हे विसरतात की त्यांनी निर्मात्यांना आम्हाला पैसे आले तर देऊ अशी अट घातलेली नाहीये. आम्ही तुमचा हा माल घेतो, त्याबद्दल आम्ही एवढे पैसे देऊ असा हा व्यवहार आहे. निर्मात्याला दिलेल्या पैशाच्या पाचपट नफा जेव्हा वाहिनीचे निर्माते कमवीत होते तेव्हा त्यांनी त्यातला काही फायदा निर्मात्यांकडे सरकविला का? नाही. मग आता तुमची दुखणी निर्मात्यांवर कशी काय लादता?
हिंदीत हे चित्र असेल तर मराठीत परिस्थिती आणखी बिकट आहे. हिंदीत निदान निर्माते मोठमोठे आहेत. मराठीमध्ये असलेल्या वाहिन्यांची आर्थिक स्थिती आणि निर्मात्यांची स्थिती याकडे ‘करुणा’ यापेक्षा वेगळ्या भावनेने पाहता येणार नाही. ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी’ अशी परिस्थिती आहे. त्यात आपले मराठी कलाकार कमी नाहीत. मोजके कलाकार आणि त्यातही बरे कलाकार आणखीनच मोजके याचा फायदा घेऊन आपले मराठी कलाकार सरळ सरळ ब्लॅकमेल करतात. तारखा देत नाहीत, अमाप पैसे मागतात, ते मिळाले तरी तारखा देत नाहीत आणि अत्यंत अभिमानाने ‘मला काढून टाका’ असं सांगतात. सकाळी नऊ वाजता चित्रीकरणाला येण्याऐवजी संध्याकाळी पाचला उगवतात. सकाळी नऊला येऊन दुपारी एकला जातात आणि पैसे मात्र दिवसाचे घेतात. आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. तू नाही तर दुसरा कोणीतरी मला घेईल. त्याच्याशी मी असाच वागेन. तो मला तसं वागूनही खपवून घेईल ही मराठी कलाकारांची सरसकट वृत्ती होत चाललेली आहे हे लिहितानाही वाईट वाटतं. पण पाणी गळ्याच्या वर केव्हाच गेलं आहे.
मराठी प्रेक्षक आपल्या कलाकारांवर प्रेम करतो. त्यांना कौतुकाने तसं सांगतो. पण ज्याला आपण डोक्यावर घेत आहोत तो कलाकार निर्माता- दिग्दर्शकाला कसा आणि किती नाडतो आहे हे त्या बिचाऱ्या प्रेक्षकांना माहीतही नसते. परिसंवादात, मुलाखतीत हेच कलाकार प्रेक्षकांशी आमची किती बांधिलकी आहे हे अशा काही गळाभरल्या आवाजात सांगतात की प्रेक्षक म्हणतो केवढे यांचे कलेवर प्रेम. मराठी वाहिन्यांनीही अनेक निर्मात्यांचे पैसे थकविले आहेत. काही मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या आणि नंतर धापा टाकणाऱ्या वाहिन्यांवर कार्यक्रम करण्यासाठी उत्साहाने सरसावलेल्या निर्मात्यांचे तर लाखो रुपये बाकी आहेत आणि ते कधी मिळतील याची अजिबात शाश्वती नाहीये. हा एक मोठा बुडबुडा निर्माण झालेला आहे, तो कधीतरी फुटणार आहे. मराठी वाहिन्या जोरदार चालू लागल्या असं लोकांना वाटतं. पण १९९९ सालापासून आजपर्यंत निर्मात्यांना मिळणाऱ्या पैशात किती वाढ झाली आणि त्याच वेळी कलाकारांचे मानधन (?), बंगल्याची भाडी व इतर खर्च किती वाढले याचा अंदाज घेतला तर हा सगळा आतबट्टय़ाचा धंदा आहे. ज्या चॅनेलला स्वत: निर्माण केलेल्या कार्यक्रमाने चॅनेल चालणार नाही हे कळते आहे त्यांनी आपल्या सेवेत असणाऱ्या निर्मात्यांना किती नाडावे? आणि मुळातच ज्यांचा धंदा बाहेरून विकत घेतलेल्या मालावर चालला आहे त्यांनी तो विकणाऱ्यावर किती दादागिरी करायची? याचाही एकदा विचार व्हायला पाहिजे.
कलेच्या धंद्यात वरून रसाळ गोमटी दिसणारी फळं नासलेली आहेत. कोणी बोलत नाही कारण त्यांनाही धंदा करायचा आहे. मुळात मोजक्या वाहिन्या आहेत. त्यांच्या विरोधात बोलून आपलं दुकान कशाला बंद करा.. असा साधा हिशोब आहे. पण कोपऱ्यात कोंडून मांजराला जरी मारहाण केली ना तरी ते कधीतरी नरडीचा घोट घेते हे लक्षात ठेवायला पाहिजे.
अभय परांजपे
asparanjape1@gmail.com