Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

अपयशी होणे हा गुन्हा नाही
नेमेचि येतो पावसाळा’ प्रमाणे जून महिना म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या निकालांचा महिना. अगदी दहावी ते पदव्युत्तर वर्गापर्यंत सर्वच परीक्षांचे निकाल ४-५ जूनपासून लागायला सुरुवात होते. शेतकरी जसा येणाऱ्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात असतो तसेच आमचे विद्यार्थीसुद्धा निकालाची अगदी आतुरतेने वाट पाहात असतात. विशेषत: १२वीचा निकाल हा आयुष्यातील टर्निग पॉईंट समजला जातो आणि त्यातील अपयशाचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर आणि अगदी जवळच्या नातेवाईकांवर सुद्धा होतो.
सर्व परीक्षांचे निकाल एकामागून एक जाहीर झाल्यावर यशाचे मानकरी हुरळून जातील, त्यांची स्वप्ने पूर्ण झाल्याच्या आनंदात डुंबूनही जातील, पण काहींना मात्र अपेक्षित यश मिळणार नाही. काहींचे डिस्टिंक्शन किंवा फर्स्ट क्लास केवळ काही गुणाने जातील, काही काठावर पास होतील तर काहीजण नापासही होतील. आजकाल मर्यादित

 

कुटुंब संख्येमुळे मुलांच्या निकालाबाबत पालक तर जागरूक असतातच पण मामा, मामी, काकू, फॅमिली फ्रेंड व इतरही नातेवाईक यांनाही खूप कुतूहल असते आणि त्यांच्याही खूप अपेक्षा असतात. खरं म्हणजे सगळेच नातेवाईक विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, आकलनक्षमता, स्मरणशक्ती, विषयाची आवड, तो विषय शिकवणाऱ्या शिक्षकाची पद्धत इत्यादी कशाचाही विचार न करता सरळ एखाद्याचे गुण ठरवून टाकतात. ‘ललिताचा मुलगा नं मग याला ८५ टक्के मिळणारच, अनुचा मुलगा मग त्याला ९० टक्के तर कुठे गेले नाहीत; पण अपर्णाचा मुलगा जेमतेम ७० टक्के मिळवेल’ असे आडाखे बांधले जातात. या अपेक्षा जास्त असल्यास व प्रत्यक्षात कमी गुण मिळाल्यास नातेवाईक व कुटुंबीय यांच्या प्रतिक्रिया काय असतील या विचाराने त्याच्या मनावर दडपण येते. एखाद्याला परीक्षेत अपयश मिळाले तर सगळे घरदार, नातेवाईक इतके दु:खी होतात की जणू घरात सुतकी वातावरण असते. आता आपला पाल्य आयुष्यात काहीही करू शकणार नाही या नकारात्मक विचाराने आईवडील दु:खी होतात. त्यामुळे अपयशाने खचून जाऊन मानसिक दौर्बल्य हरवणाऱ्या किंवा आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बातम्या ऐकून मन उदास होते. अपयश ही एक लाजिरवाणी व हास्यास्पद गोष्ट आहे व अपयशी व्यक्तीने समाजात खाली मान घालूनच वावरायला हवे अशी एक मानसिकता लहानथोरांमध्ये निर्माण झालीय. इन्स्टंटच्या जमान्यात आपली अपयश पचवायची सवयच गेली आहे. खरं म्हणजे अपयश ही निसर्गाची आगळीवेगळी भाषा आहे. तिच्यातून आपण घडत असतो. अपयश माणसाला नम्र बनवते व घडवतेही. प्रत्येक अपयशात उज्ज्वल भवितव्याचे सामथ्र्य असते.
यश म्हणजे काय याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येते की यशाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. एखाद्या व्यक्तीला खूपच श्रीमंत झाल्यावर यशस्वी झालो असे वाटते, एखाद्या शास्त्रज्ञाला अनेक संशोधने पूर्ण झाल्यावर यशस्वी झालो असे वाटते, एखाद्या समाजसेवकाला अनेक वर्षे समाजसेवा केल्यावर यशस्वी वाटते तर एखाद्याला पोटापाण्यापुरता पैसा, निरोगी आयुष्य व शांत जीवन लाभल्यास यशस्वी वाटते. यशस्वी व्याख्या म्हणजे ‘उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल’ अशी असल्याने श्रीमंताचे उद्दिष्ट पैसा कमवण्याचे, शास्त्रज्ञाचे संशोधनाचे, समाजसेवकाचे दीन-दुबळ्यांची सेवा करण्याचे तर एखाद्याचे सामान्य सुखी व शांत जीवन जगण्याचे.
एडविन विल्सने म्हटलंय ‘यशाचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणे असा नसून अंतिम युद्ध जिंकणे असा आहे’ केवढा अर्थ भरलाय या वाक्यात. यशस्वी होणे म्हणजे अपयश न येणे असे नसून केवळ अंतिम उद्दिष्ट गाठणे हा आहे. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट किंवा ध्येय ठरवून त्या दिशेने सतत प्रयत्न केल्यास यश प्राप्त होतेच. मग परीक्षेतले यश वा अपयश हे फारसे आपल्या आयुष्यावर परिणाम करत नाही. अनेक थोर विचारवंत, लेखक, राजकीय क्षेत्रातील यशस्वी मंडळी इत्यादी शाळा महाविद्यालयात अयशस्वी झालेच होते, पण तरीही ते मोठे झाले ते त्यांच्या ध्येयपूर्तीच्या जिद्दीमुळे व प्रयत्नांच्या चिकाटीमुळे. अरुण शेवते यांनी लिहिलेले ‘नापास मुलांची गोष्ट’ हे ऋतूरंग प्रकाशनने प्रकाशित केलेले पुस्तक प्रत्येक नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी वाचायलाच हवे. त्यात लेखक म्हणतात, ‘आईन्स्टाईन हे जगप्रसिद्ध थोर शास्त्रज्ञ शालेय जीवनात जीवशास्त्र, इतिहास, फ्रेंच व चित्रकला या विषयात नापास झाल्याने त्याचं वर्ष वाया गेले होते. श्रीमती इंदिरा गांधीसुद्धा ऑक्सफर्ड विद्यापीठात लॅटिन विषयात नापास झाल्या होत्या, लोकमान्य गंगाधर टिळकांना एम.ए.च्या परीक्षेत अपयश आले होते, तर थोर कवी कुसुमाग्रज गणितात नापास झाले होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तीनदा एस.एस.सी.च्या वाऱ्या कराव्या लागल्या. सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके यांना इंग्रजी चौथीच्या वार्षिक परीक्षेत १०० पैकी शून्य गुण मिळाले होते थोर कवी व संगीतकार गुलजार कॉलेजमध्ये असताना गणितात दोनदा नापास झाले होते. इंग्रजी साहित्यात आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केलेले आर. के. नारायण हे इंग्रजी विषयातच नापास झाले होते.
तर मित्रहो, एखाद्या विषयात किंवा एखाद्या परीक्षेत नापास झाले म्हणजे आयुष्य संपत नाही, आपले भविष्य घडण्यास उर्वरित आयुष्य असते. नापास होणे किंवा अपयशी होणे हा गुन्हा नाही. परिस्थितीचाही परिणाम आपल्या यशावर होत असतो, हे आपण लक्षातच घेत नाही. एखादा विद्यार्थी अपयशी ठरला तर तो स्वत:ला कमी बुद्धिमान समजतो, इतरही सर्वजण अभ्यासच केला नसेल म्हणून त्याला दोष देतात पण त्याला एखाद्या विषयात रुची नसणे, उत्तम दर्जाचे शिक्षक नसणे, घरात अभ्यासाचे वातावरण नसणे, प्रेम प्रकरणामुळे अभ्यासातून चित्त विचलित होणे, तब्येतीची साथ नसणे, कौटुंबिक कलहाचा मनावर ताण असणे अशी अनेक कारणे असू शकतात पण ती कारणे दूर करण्याचा विचार कोणी करत नाही. प्रत्येक वेळी परिस्थितीची साथ मिळेलच असे नाही, कारण परिस्थितीची साथ बेभरवशाची असते. पत्ते खेळताना डाव कधी मनाजोगता होतो तर कधी सुमार होतो. आपल्या हातात असणाऱ्या पानांनीच आपण खेळत असतो. आपण आपल्या हातातल्या एकुलत्या एक हुकूमाच्या पानाने प्रतिस्पध्र्याच्या पानाला मारले की दुसऱ्याकडे त्यापेक्षा भारी हुकूमाचे पान नसावे असे वाटते व ते नसले तर ती त्यावेळची परिस्थितीची साथ, पण पुढच्याने भारी पानाने मारले तर हात तर जातोच पण एकुलता एक हुकूमही वाया जातो ती असते परिस्थितीची प्रतिकूलता. त्यामुळे कधीतरी परिस्थितीची साथ नसेल तर अपयश आले म्हणून आयुष्यात पुढे अपयशच येणार या नकारात्मक विचाराची जळमटे झटकून जो पुढे जातो तोच यशस्वी होतो. लोकमान्य टिळक म्हणतात, ‘समोर अंधार असला तरी पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा व हा अंधार जो आत्मविश्वासाने पार करतो त्यालाच पुढचा उजेड दिसतो.’
आत्मविश्वासाचे एक उदाहरण आठवले. असाच एक माझा विद्यार्थी प्रथम वर्ष वाणिज्य वर्गात नापास झाला. त्याची आई मला भेटायला आली तेव्हा खूप रडली व म्हणाली ‘प्रथम वर्षांला हे दिवे लागले, आयुष्यात पुढे काय करणार? सतत नाचाचे वेड, तो नाच काय आयुष्यात पुरणार?’ त्यानंतर काही वर्षांनी तो विद्यार्थी जेव्हा कोरिओग्राफर झाला आणि एकेका डान्सचा माझा एवढा चार्ज आहे सांगू लागला तेव्हा त्याचा मला खूप अभिमान वाटला. अशाच आणखी एका प्रथम वर्ष नापास झालेल्या मुलाने पुन्हा परीक्षा न देता हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रडणारी आई व तळतळणारे त्याचे वडील यांचे चेहरे विसरायला मला खूप दिवस लागले, पण पुढे काही वर्षांनी हॉटेलच्या उद्घाटनाची निमंत्रणपत्रिका घेऊन आलेल्या व आत्मविश्वास ओसंडून वाहणारा त्यांचा चेहरा मात्र मला आजही आठवतोय.
सुप्रसिद्ध उद्योगपती, कलाकार, अभिनेते, शास्त्रज्ञ, लेखक, कवी, चित्रकार, संगीतकार यांना यश प्राप्त झाले ते अपयशामुळे न थांबता आत्मविश्वासाने पुढे गेल्यामुळेच. स्वत:चा स्वत:वर असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास पण अपयशाने आत्मविश्वास गमावलेल्या विद्यार्थ्यांला तो आईवडिलांनी मिळवून द्यायलाच हवा. लहान वयात हुंदडण्याचे, बागडण्याचे दिवस असताना जिजामाता बालशिवाजीला राजे म्हणून संबोधत व त्यातूनच राजे होण्याचे उद्दिष्ट त्यांच्यात रुजले. दांडपट्टा, तलवारबाजी, नेमबाजी शिकवून आत्मविश्वास आला. शूरांच्या वीरकथा जीजाऊंनी शिवाजीराजांना ऐकवल्या व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न नुसतेच दाखवले नाही तर पुरे करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात रुजवला; म्हणूनच वयाच्या चौदाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा सर केला. शिवाजी महाराजांनी सुद्धा मावळ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला म्हणूनच मूठभर मावळे मोगलांच्या लाखोंच्या संख्येनी असलेल्या सैन्याशी लढा देऊ शकले.
आत्मविश्वास रुजवणारी जिजाबाईसारखी आई काही प्रत्येकाच्या नशिबात नसते. पण स्वयंप्रेरित होऊन आत्मविश्वास मिळवा. ‘माझे हे स्वप्न आहे, ते मी साकार करू शकतो व ते मी साकार करणार आहे’ हा तो आत्मविश्वास. आत्मविश्वासाच्या प्रपातामुळे अनेक कठीण खडकांचा चुरा चुरा होऊन जातो. आत्मविश्वासाचा अभाव हा यशाच्या मार्गातला दडून बसलेला मोठा शत्रू असतो, तो दूर केला की यश दूर नाही. कुणीतरी म्हटलंय ‘झाडावर बसलेल्या पक्ष्याला हलणाऱ्या फांदीची भीती वाटत नाही कारण, त्याचा स्वत:च्या पंखांवर विश्वास असतो.’ आत्मविश्वास, मेहनत व चिकाटी यांचा सुरेख संगम आपल्यात जोपासा. यश धावत तुमच्याकडे येईल. प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने लढा देणाऱ्या लोकांच्या सुवर्णाक्षरांनी घेतलेल्या नोंदींनी इतिहासाची अनेक पाने भरली आहेत. शेतमजूर किंवा लाकूडतोडय़ा एवढीच प्रगती शक्य असणाऱ्या अब्राहम लिंकनने स्वयंशिक्षणातून ज्ञान मिळवून आयुष्यात २६ वेळा अपयश पचवून वयाच्या ५२ व्या वर्षी अमेरिकेसारख्या बलाढय़ देशाचा राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न पुरे केले हे कधीच विसरू नका.
प्रा. शैलजा सांगळे