Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

ग्रूमिंग कॉर्नर
आयुष्याने शिकवलेले धडे..
आत्ताच मला आयुष्यातल्या एका दु:खद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. १८ मेला माझ्या वडिलांचं हृदयविकारामुळे निधन झालं.. मी स्वत:चीच समजूत काढत राहिलो. ते ८० वर्षांचे होते. (५ दिवसांत ८० पूर्ण होणार होते) त्यांनी त्यांचं आयुष्य खूप छान एन्जॉय केलं. त्यांचा शेवटपण त्यांना फार त्रास होईल असा नव्हता. मी आधी जे काही शिकलो त्याला त्यांच्या मृत्यूमुळे दुजोरा मिळत गेला..
माझ्या बायकोची आणि मुलांची एखाद्या ठिकाणी फिरायला जायची खूप इच्छा होती. मग ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आम्ही अलिबागला गेलो. एका फोनमुळे त्या सुट्टीचा शेवट झाला.. तुम्ही आणि मी बरेच प्लॅन्स तयार करू शकतो. पण देवाने आधीच काही आराखडे बांधलेले असतात.
धडा पहिला-
आयुष्यात पुढे काय होणार आहे हे कधीच वर्तवता येत नाही. आयुष्य येईल तसं स्वीकारावं लागतं.

आम्ही अलिबागला असताना माझ्या बायकोच्या फोनवर माझ्या बाबांचा फोन आला. पण तेव्हा तिला तो फोन नाही घेता आला. तिला वाटलं, आरामात संध्याकाळी परत फोन करू. पण का कुणास ठाऊक तिने तिचा विचार बदलला आणि लगेच

 

परत फोन केला. ते दोघं थोडा वेळ बोलले, तेव्हा बाबा नेहमीसारखंच नॉर्मल बोलत होते. ‘काय, कसं काय?’ वगैरे चौकशी केली. पण हा साधारण फोन माझ्या बायकोसाठी खूपच खास ठरला. कारण तिच्याशीच ते शेवटचं बोलले आणि नंतर दोन तासांतच ते कायमचे आम्हाला सोडून गेले..
धडा दुसरा-
जे काही करायचंय ते लगेच करा, पुढे किंवा उद्यावर ढकलू नका. आयुष्य पूर्णपणे जगा.

बाबा गेले त्याच्या बरोबर दोन दिवस आधी ते माझ्याशी त्यांच्या जमिनीबद्दल बोलत होते. कशी गोवा सरकारने त्यांची जमीन घेतली आणि अजूनपर्यंत त्यांना पुरेसा मोबदला मिळाला नाही अशी तक्रार करत होते. मी हसलो आणि म्हणालो, ‘शेवटी तुम्हाला ६ बाय ३ फूट एवढय़ाच जागेची गरज लागणार आहे.’ आम्हा कॅथलिकांमध्ये दफनविधी होतात त्या संदर्भात मी बोलत होतो. माझी आई आणि बाबापण माझ्याबरोबर हसायला लागले.
धडा तिसरा-
आयुष्याच्या शेवटी तुमची प्रॉपर्टी, पैसा याला काडीमात्र किंमत नसते.

बाबांच्या मृत्यूने सगळ्यात जबर धक्का बसला तो माझ्या आईला.. ते नवरा-बायको म्हणून ४७ वर्षे जगले. पण या दु:खात सुद्धा माझ्या आईने बाबांची नेत्रदान करायची इच्छा पूर्ण केली.
धडा चौथा-
दुसऱ्यांचा विचार न करणं याचं कारण तुमचं वैयक्तिक दु:ख असू शकत नाही.

दफनविधीच्या वेळी सगळे एकत्र येतात आणि आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीबद्दल बोलतात. मी माझ्या विचारांची जुळवाजुळव करायला सुरुवात केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कितीतरी गोष्टींसाठी त्यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी माझ्यासाठी जी काही अफाट संपत्ती मागे ठेवली होती.. त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची विनोदबुद्धी, बौद्धिक उंची, शारीरिक ताकद, त्यांचा आत्मविश्वास, जिज्ञासू वृत्ती, बिघडलेल्या गोष्टी नीट करण्याचं त्यांचं सामथ्र्य.. थोडक्यात सांगायचं झालं तर आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच. त्यांनीच मला मी काय करू शकतो हे दाखवून दिलं. त्यांनी मला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा मोठा होत होतो, तेव्हा ते इतके कधी माझ्याबरोबर नसायचे. ते पश्चिम रेल्वेमध्ये कामाला होते आणि सलग १५ दिवस ते मुंबईच्या बाहेर असायचे. काही तासांसाठी किंवा जास्तीत जास्त एका दिवसासाठी ते घरी यायचे आणि परत त्यांच्या नोकरीवर जायचे.
धडा पाचवा-
उपदेश कमी करा. कृती जास्त करा. मुलं जे ऐकतात, त्यापेक्षा मुलं जे बघतात ते जास्त ऐका.

आपण जे काही गमावतो त्यात फायदापण लपलेला असतो. आपण आपले डोळे उघडे ठेवून बघितलं तर आपल्याला कळेल की मृत्यूलाही किंमत असते. मृत्यू नसता तर आयुष्याला आपण किंमत दिली असती? आपण एकमेकांची कदर केली असती? हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे.
धडा सहावा-
मृत्यू आपल्याला स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या आयुष्याला किंमत द्यायला शिकवतो.

डॉमिनिक कोस्टाबीर
अनुवाद- यशोदा लाटकर

dominic@hti-india.com