Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

मेल बॉक्स
भाषांतराचा घोळ
मी दिनांक २१ मे २००९ ची लोकसत्ता व्हिवा पुरवणी वाचली. त्यातील अभय परांजपे यांच्या ‘दवंडी’ या सदरात त्यांनी ‘भाषातुराणाम न भयं न लज्जा..’ या मथळ्याखाली हिंदीतल्या जाहिरातींचा मराठीत शब्दश: भाषांतर केल्यामुळे झालेला घोळ लक्षात आणून दिला आहे. शब्दश: भाषांतर केल्यामुळे व्याकरणाच्या चुका तर घडतातच शिवाय काहींतून अश्लील अर्थही निघतो. मराठीत कॉपी लिहिणारे नाहीत हा प्रश्नही आहेच. हे सदर वाचून मला एवढंच

 

सांगावसं वाटत की काही दिवसांपूर्वी जाहिरातींवर एक लेख वाचला होता. त्यात ‘दाग अच्छे है’ या जाहिरातींमुळे मुलांवर वाईट संस्कार होऊ शकतात. तसेच डाग मग कुठलाही असो कपडय़ावर अथवा चारित्र्यावर पडलेला तो वाईटच असं विधान केलं होतं. या लेखामुळे संबंधित जाहिरात बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी ती जाहिराती मागे घेतलीच परंतु लेख लिहिणाऱ्या लेखिकेला आपल्या संस्थेत बोलवून त्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं.
सांगायचा मुद्दा हाच की आपणही जर तसं केलं तर निदान मराठीची तोडमोड तरी होणार नाही. ‘एकास ठेच पुढचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे मराठीची वाट तर लागणार नाही.
वसुधा धुमक, चेंबूर

प्रयत्नान्ती परमेश्वर!!
बाप! बाप!! बाप!!! शब्दभ्रमाच्या तीन पिढय़ा हा ७ मेच्या लोकसत्ता व्हिवामध्ये संजय पेठे यांनी लिहिलेला लेख मनाला भावला. हा माहितीपूर्ण लेख बरेच काही सांगून गेला.
रामदास पाध्ये व त्यांच्या अर्धागिनी अपर्णा ‘शब्दभ्रम’ कलेला मनोभावे साथ देत आहेत हे कौतुकास्पद आहे.
त्यांची पहिली पिढी प्रो. वाय. के. पाध्ये गणेशोत्सव, रामनवमी, होलीकोत्सव या कार्यक्रमांत लोकांचे मनापासून मनोरंजन करत.
तिसरी पिढी ‘शब्दभ्रमकार’ सत्यजित पाध्ये हे चार्टर्ड अकाऊंटंट असून, त्यांचे मन रमते नव्या बाहुल्यांच्या नव्या पिढीचा नवीन बाप होण्यात हे केवढे आश्चर्य! आपल्या देशात ‘शब्दभ्रम’ या अवघड कलेचा तरुण उमदा शिलेदार- सत्यजित आणि त्याला सतत साथ देत असतो त्याचा भाऊ परिक्षित.
‘शब्दभ्रमाच्या’ या तीन पिढय़ांना या देशात कोणताही उच्च बहुमान, पद्मश्री, भारतरत्न किंवा महाराष्ट्रभूषण अद्यापि मिळालेला नाही. तरीसुद्धा १९७९ साली रामदास पाध्ये परदेशात गेले व प्रगत बाहुल्या बनवायचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले व आपल्या देशातील या कलेच्या प्रसारासाठी एक संस्था स्थापन करायची हे त्यांचे स्वप्न आहे. या दीर्घ प्रयत्नांना व चिकाटीला माझ्या शुभेच्छा!! प्रयत्नान्ती परमेश्वर!! आगे बढो!!
मधुमालती पुजारे, देवनार

घरजावई होऊ नये
मी लोकसत्ताचा नियमितपणे गेली ३० वर्ष वाचक आहे. आपला अंक व पुरवण्या या मार्गदर्शक असून दरवेळी वाचकांच्या ज्ञानात भर टाकतात. गुरुवार, ७ मे व्हिवा पुरवणीमधील सुनील साळुंके यांचे ‘कट्टा’ मधील घरजावई व्हावं की नाही? हा लेख वाचला आणि माझ्या मनातील विचार हे मी नमूद करत आहे.
नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. यातील विचार हे अगदी दोन्हीही बाजू स्पष्टपणे परखड नमूद केले आहेत. सांगोपांगपणे उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे, पण ‘घरजावई होऊ नये’ असे माझे स्पष्ट व प्रामाणिक मत आहे. कारण जावई म्हणून काही किंमत असते. ती आपण स्वत:हून कमी करू नये. ज्याला मुलीच्या आई-वडिलांची सेवा करायची आहे त्याने ती जरूर करावी. त्यात दुमत नाही पण त्यांच्याकडे न राहता सुद्धा सेवा करता येते. जी वेळ आपण देवू त्यावेळी जायचे. काय पाहिजे नको ते द्यावे. (औषधपाणी, दवाखाने व अन्य बाबतीत) उलट स्वत:च्या घरी राहून हे केले तर एक प्रकारची मानमर्यादा, किंमत राहील. या सर्व गोष्टीची चर्चाही विवाहापूर्वी व्हावी. स्पष्टपणे परखड सांगून याबद्दल एकमेकांना कल्पना असावी. दोघांच्या आई-वडिलांनी जॉइन्ट कुटुंबाप्रमाणे रहावे म्हणजे कुठलाच प्रश्न उपस्थित राहणार नाही असे मला वाटते.
सुहास मुंगळे, पुणे