Leading International Marathi News Daily
गुरुवार । ४ जून २००९

ब्यूटी कॉर्नर
घरगुती लेप

चण्याचे पीठ/ मसुराच्या डाळीचे पीठ/ मक्याचे पीठ/ मेथीचे पीठ किंवा ओटचे पीठ यामध्ये लिंबाचा रस साध्या पाण्यात मिसळून लेप लावावा.
संत्री, मोसंबी, लिंबे यांच्या सालींच्या आतल्या भागातले पांढरे धागे काढून टाकून साली वाळवाव्यात. त्यांची बारीक भुकटी करावी व कुठल्याही फेसपॅकमध्ये अर्धा ते एक चमचा घातली तर चेहऱ्याला ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते.
‘पपई’ या फळात ‘पेपेन’ हे एन्झाइम मोठय़ा प्रमाणात असते. शिवाय पपईच्या गरात त्वचेवरील मृत किंवा कोरडय़ा पेशी काढून टाकण्याचे सामथ्र्य आहे. तेलकट त्वचेसाठी पपईचा लेप गुणकारी आहे, हा जंतुनाशक म्हणूनही उपयुक्त ठरतो.

थोडय़ा कोमट केलेल्या चमचाभर दुधात पाव चमचा यीस्ट घालून जरा वेळाने ते मिश्रण कापसाने चेहऱ्यावर लावावे. काही वेळाने पॅक घट्ट होतो. चेहऱ्यातील रुधिराभिसरण वाढविण्यासाठी यीस्ट पॅक फारच गुणकारी ठरते. तेलकट व कोरडय़ा दोन्ही प्रकारच्या त्वचेवरील निस्तेज पेशी नाहीशा होऊन आतली नवीन त्वचा प्रकट होते.

अंडय़ांमध्ये शरीरनिर्मितीला उपयुक्त ठरणारी प्रथिने असतात. अंडय़ातला पांढरा बलक हा प्रथिनांचा बनलेला असतो तर पिवळा बलक हा संपूर्णतया स्निग्ध असतो. यातला बराचसा भाग त्वचा शोषून घेते. ज्यांची त्वचा अत्यंत शुष्क झाली आहे अशा मध्यमवयीन किंवा प्रौढ स्त्रियांना पिवळा बलक उपयोगी आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी चेहऱ्याला पांढरा

 

बलक लवावा. दोन्हींमध्ये अर्धा चमचा मध घालवा. ज्यांची त्वचा नॉर्मल आहे त्यांनी चेहऱ्यावर प्रथम पांढऱ्या बलकाचा पॅक लावावा. तो सुकल्यावर त्याच पॅकवरती पिवळ्या बलकाचा पॅक लावावा म्हणजे हे दोन्ही बलक त्वचेमध्ये शोषून घेतले जातील.

कोबीच्या रसात गंधक व क्लोरीन ही द्रव्ये असतात. त्यामुळे त्वचेला नवे जीवन प्राप्त होते. कोबी किसून फळांप्रमाणे चेहऱ्यावरही लावता येतो.

ताज्या मक्याची कणसे किसून घेऊन पिळावीत. त्यातून मक्याचे दूध भरपूर प्रमाणात मिळते. या दुधात ‘अ’ व ‘ड’ ही जीवनसत्त्वे असतात. हा स्टार्च पॅक किंवा पिष्टमय पदार्थाचा पॅक म्हणून चेहऱ्यावर फारच उपयुक्त ठरतो.

आंबेहळद, जायफळ दुधात किंवा लिंबाच्या रसात उगाळून लेप करावा. हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे. त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यास या लेपाचा फार उपयोग होतो.
तांबडय़ा मुळ्याचा रस व दही यांचे मिश्रण चेहऱ्याला लावले तर चेहऱ्यावरचे मुरमांचे डाग कमी होतात.