Leading International Marathi News Daily

गुरुवार, ४ जून २००९

विविध

सत्ताधारी व विरोधी पक्षांशी समन्यायी वृत्तीने वागण्याची मीराकुमार यांची ग्वाही
नवी दिल्ली, ३ जून/खास प्रतिनिधी

सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या आणि जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीवादी देशाच्या या महान प्रतिनिधी सभागृहाला शंभर कोटींहून अधिक लोकांचे भाग्य निर्धारित करण्याची गंभीर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सभागृहाचे अध्यक्षपद सोपवून अगाध विश्वास व्यक्त केल्याबद्दल मी गौरवान्वित व विनम्र झाले आहे, अशा शब्दात लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्यामुळे भारावून गेलेल्या मीराकुमार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. .

लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मीराकुमार यांना..
नवी दिल्ली, ३ जून/खास प्रतिनिधी

लोकसभा अध्यक्षपदी मीराकुमार यांची निवड करण्याचा प्रस्ताव काँग्रेस व युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मांडला आणि लोकसभेचे नेते प्रणव मुखर्जी यांनी त्याचे अनुमोदन केले.

काश्मीर खोऱ्यात पुन्हा तणाव; पोटनिवडणुकीला फटका
श्रीनगर, ३ जून/वृत्तसंस्था

शोपियान येथील दोन महिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ‘हुरियत कॉन्फरन्स’ने पुकारलेल्या बंदमुळे गेले तीन दिवस काश्मीर खोऱ्यात पुन्हा तणाव वाढला असून र्निबध झुगारून रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांवर पोलिसांना लाठीमार करावा लागला. या तणावाचा फटका हजरतबल येथील विधानसभा पोटनिवडणुकीला बसला असून तेथे अत्यल्प मतदान झाले आहे. शोपियानमध्येच आज अतिरेक्यांनी एका मुलीचीही हत्या केली आहे. नीलोफर (वय २२) आणि आसिया (१७) या दोघी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. शनिवारी त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. या दोघींची बलात्कारानंतर हत्या झाल्याचा आरोपोहे.

अणुकार्यक्रमाची ‘अतिगोपनीय माहिती’ चुकीने उघड
न्यूयॉर्क, ३ जून/पी.टी.आय.

देशातील नागरी अणुऊर्जा प्रकल्पांची ठिकाणे आणि अणुप्रकल्पांची सर्व अतिगोपनीय माहिती अमेरिकन सरकारने अनवधानाने संकेतस्थळावर दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अणुकार्यक्रमांच्या ज्या गोष्टींबाबत गुप्तता बाळगणे आवश्यक असते, त्या सर्व गोष्टी या चुकीमुळे जगजाहीर झाल्या आहेत. सुमारे २६६ पृष्ठांचा अणुकार्यक्रमांबाबतचा अहवाल सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारी उपलब्ध करून देण्यात आला होता.

डॅनी बॉयल चित्रित करणार ‘मध्यरात्रीची मुंबई’!
लंडन, ३ जून/पीटीआय

ऑस्कर पुरस्कारांची लयलूट करून जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘स्लमडॉग मिलियनेर’ या बहुचर्चित चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी बॉयल याचे मुंबईवरील प्रेम अद्याप कमी झाले नसावे! म्हणूनच की काय त्याचा आगामी चित्रपटही मुंबई महानगरीवर आधारित असणार आहे. मात्र, आता तो या महानगरीतील मध्यरात्रीचे थरारक जीवन चित्रित करणार आहे.‘स्लमडॉग’मध्ये मुंबईच्या झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवनाचे चित्रण केले होते. हा चित्रपट विकास स्वरूप यांच्या ‘क्यू अ‍ॅँड ए’ या पुस्तकावर आधारित होता. डॅनी बॉयलचा आगामी चित्रपट ‘मॅक्सिमम सिटी:बॉम्बे लॉस्ट अ‍ॅँड फाऊंड’ या सुकेतू मेहतालिखित कादंबरीवर आधारित असेल. सुकेतू मेहता हे मूळचे भारतीय लेखक व पत्रकार असून सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. ‘दि टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार बॉयल यांनी या कादंबरीचे हक्क विकत घेतले आहेत. २००४ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी चांगलीच लोकप्रिय झाली. थोडेसे प्रवासवर्णन व थोडेसे आत्मचरित्र असे तिचे स्वरूप असून त्यात मुंबईच्या बकाल वस्त्यांबरोबरच डान्स बारमधील मुली, अंडरवर्ल्डमधील डॉन आणि हिंदू मूलतत्त्ववादी संघटना यांचे चित्रण आहे.
डॅनी बॉयलच्या ‘स्लमडॉग मिलियनेर’ या चित्रपटाने तब्बल आठ ऑस्कर पटकावण्याबरोबरच सुमारे बावीस कोटी पौंड एवढा गल्ला गोळा केला होता.

शतकानंतर प्रथमच काश्मीर खोऱ्यात यज्ञ
नारननाग, ३ जून/वृत्तसंस्था

शंभर वर्षांच्या खंडानंतर काश्मिरी पंडितांनी प्रथमच गंगबल येथील पवित्र तलावाकाठी वैदिक यज्ञ केला. जम्मू आणि काश्मिरात शांतता नांदावी, यासाठी हा यज्ञ केला गेला.काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेल्या पंडितांच्या ‘अखिल भारतीय स्थलांतरित समन्वय समिती’चे अध्यक्ष विनोद पंडित यांनी सांगितले की, शंभर पंडितांच्या पहिल्या तुकडीने तलावात स्नान करून नंतर हा यज्ञ केला व काश्मीरमध्ये शांतता व स्थैर्य नांदावे, यासाठी प्रार्थना केली.कश्यप मेरु पीठाच्या अखत्यारितील काश्मिरी पंडितांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सर्व ऐतिहासिक व धार्मिक स्थळे खुली करण्याच्या व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून काश्मिरी पंडितांनी हा शांतीयज्ञ केला. काश्मीरच्या ईशान्य भागातील गंगबल हे हरमुक्त गंगा म्हणूनही ओळखले जाते. हरमुक्त पर्वतराजीतील १३ हजार फूट उंचीवरील या स्थानाला काश्मिरी पंडितांच्या दृष्टीने मोठे धार्मिक महत्त्व आहे. या स्थानाची यात्राही बऱ्याच वर्षांच्या खंडानंतर प्रथमच पार पडली आणि त्यात ३०० पंडित सहभागी झाले होते.

ब्रिटिश नागरिकाची हत्या
लंडन, ३ जून/पी.टी.आय.

ब्रिटनच्या ताब्यातील अबू कटाडा याच्या सुटकेसाठी अल् काईदाच्या उत्तर अफ्रिकेतील गटाने सहारा वाळवंटात ओलीस ठेवलेल्या एडविन डायर या ब्रिटिश बंधकाची हत्या केली.
ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी एडविन डायरची हत्या म्हणजे दहशतवादाचे सर्वात निर्घृण कृत्य असल्याचे मत व्यक्त केले. अबू कटाडा या जॉर्डनमधील दहशतवाद्याला सोडावे अन्यथा डायर याला ठार मारू, अशी धमकी अल् काईदाने दिली होती. त्याची मुदत ३१ मे रोजी संपल्यामुळे त्याला ठार मारल्याचे या गटाने संकेतस्थळावर म्हटले आहे. या हत्येने जगभरातील निष्पाप मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाचा काही प्रमाणात बदला आम्हाला घेता आला, असेही या संकेतस्थळावर म्हटले आहे.