Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

अग्रलेख

फड ‘क्रिकेटरंजना’चा!

 

क्रिकेटच्या पंढरीत आजपासून दुसऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा रोमांच सुरू होईल तेव्हा त्यामध्ये एक समान धागा असेल. तो म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा! विश्वचषकामधील क्रिकेटपटू त्यांच्या देशांबरोबरच डेक्कन चार्जर्स, रॉयल चॅलेंजर, सुपर किंग्ज, नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हनचे खेळाडू म्हणून संबोधिले जातील. कारण, कौटुंबिक मालिकांप्रमाणे ‘क्रिकेटरंजना’चा खजिना घेऊन ‘आयपीएल’ घराघरात पोचली आहे. मनोरंजनमूल्याच्या या ‘पॅकेज’द्वारे क्रिकेट आणि बॉलिवूडचा अनोखा संगम साधण्यात आला आहे. त्याचाच जल्लोषपूर्ण अध्याय आता साहेबदेशी सुरू होत आहे. ट्वेन्टी-२० प्रसिद्धीच्या झोतात आणले ते इंग्लंडनेच. इंग्लिश क्रिकेट मंडळाचे मार्केटिंग अधिकारी स्टुअर्ट रॉबर्टसन यांनी सहा वर्षांपूर्वी कौन्टी स्तरावर ट्वेन्टी-२० ची पहिली स्पर्धा भरविली. त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेमध्ये क्लब दर्जाचे ट्वेन्टी-२० सामने खेळले जात होते. तसे आपल्याकडेही क्लब स्तरावर १० आणि २० षटकांचे सामने रंगतातच की. परंतु त्याकडे क्रिकेटचे नवे मार्केटिंग तंत्र म्हणून कुणी पाहिले नव्हते. अर्थात, इंग्लंडची ती गरजच होती. फुटबॉलच्या प्रचंड वेडापायी तेथील युवावर्ग पॅड चढवून क्रिकेटच्या मैदानावर सोडा, सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्येही येईनासा झाला होता. त्यातच इंग्लिश क्रिकेटचा सुवर्णकाळही लोपला होता. अ‍ॅशेस मालिका आणि कौन्टी स्पर्धाच्या जिवावर किती काळ तग धरून राहणार? इंग्लिश क्रिकेट मंडळाला जोरदार ‘पॅकेज’ची आवश्यकता होती. ट्वेन्टी-२० सामन्यांनी बुडत्याला आधार दिला. खेळाडूंसाठी सीमारेषेलगत ‘डगआऊट’, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांकडे ध्वनिक्षेपक देऊन त्यांच्याशी ‘धावता’ संवाद, मैदानभर विहरणाऱ्या समालोचकांच्या माध्यमातून इंग्लिश पठडीतील क्रिकेट रंजक बनविले. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदही कात्रीत सापडली होती. कसोटी सामन्यांच्या वेळी प्रेक्षकांचा दुष्काळ आणि एकदिवसीय सामन्यांना येत असलेला साचेबद्धपणा, अशा स्थितीत क्रिकेटची लोकप्रियता टिकविण्याचे आव्हान होते. त्यांनीही या क्रिकेटक्रांतीच्या लाटेवर स्वार होत २००७ साली पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. त्याच वेळेस कॅरिबियन बेटांवर झालेला एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक कमालीचा नीरस ठरला. ‘क्रिकेटिंग फियास्को’ म्हणून त्यावर टीका झाली. काही महिन्यांनंतरच दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी-२० विश्वचषक तुफान गाजला आणि क्रिकेटला संजीवनी मिळाली. त्यापाठोपाठ ‘आयपीएल’ अस्तित्वात आली नि ट्वेन्टी-२०च्या लोकप्रियतेचे चौकार-षट्कार लगावले गेले. एव्हाना, क्रिकेटचा हा ग्लोबल आविष्कार साहेबाच्या हातून मात्र निसटला. प्रसिद्ध क्रिकेटपटू कोणत्या कौन्टीशी करारबद्ध होणार, अशा बातम्या पूर्वी झळकत. त्या खेळाडूसाठीसुद्धा ती मानाची गोष्ट ठरे. आता साहेबाचेच क्रिकेटपटू ‘आयपीएल’ प्रवेशासाठी रांगा लावून होते. त्यांच्यावर विक्रमी बोलीही लावली गेली. इंग्लंडमध्येच सुरू झालेल्या क्रिकेटच्या मार्केटिंगची ही भारतीय ‘फ्री-हिट्’ होती. ‘आयपीएल’च्या प्रभावाखाली होत असलेल्या या ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान साहेबाला पदोपदी असा कवित्वाचा न्याय सोसावा लागणार आहे! ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हणजे जोश आणि जल्लोष. बेधडक खेळ हा विजयाचा कानमंत्र. रणनीती आखायची, पण दुसऱ्याच क्षणाला ती बदलून नवीन डावपेच राबविण्याची लवचिकताही गरजेची. जेटयुगाला साजेशा वेगाचे हे क्रिकेट. सामन्यागणित नवा हीरो घडविणारे! केवळ आडवेतिडके फटके मारले की ट्वेन्टी-२० मध्ये यशस्वी होता येते, असा दिवाणखानी चर्चेतील गैरसमज आहे. प्रत्यक्षात क्रिकेटकौशल्याचा खरा कस ट्वेन्टी-२०मध्ये लागतो. केवळ एका चेंडूवर संपूर्ण सामन्याला कलाटणी मिळू शकते. हाच थरार जागवीत लॉर्ड्सच्या साक्षीने ट्वेन्टी-२० च्या विश्वचषकातही अविस्मरणीय लढती पाहण्यास मिळतील. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंडचे आव्हान स्वीकारत गतविजेतेपद राखण्यासाठी धोनीचे धुरंधर सज्ज झाले आहेत ते धडाकेबाज शिलेदारांच्या जोरावर. सेहवाग-गंभीरपाठोपाठ रोहित शर्मा, युवराजसिंग व सुरेश रैनाची फटकेबाजी. विजयी षट्कार लगाविण्यासाठी यूसुफ पठाण-धोनी आतुर! गोलंदाजीमध्ये झहीर-इशांतच्या जोडीला इरफान-प्रवीणकुमारचे स्विंग. हरभजनसिंगला नवोदित प्रग्यान ओझाच्या फिरकीची साथ. साहजिकच, क्रिकेटविश्वातील अशा ताऱ्यांचा भरणा असलेल्या टीम इंडियाला यंदाही विजयासाठी पसंती दिली जात आहे. सराव सामन्यामध्ये पाकिस्तानवर मिळविलेल्या एकतर्फी विजयाने विश्वचषकासाठीचा माहोल ‘वॉर्म अप्’ झाला नसता तरच नवल! अर्थात, स्पर्धेच्या संयोजकांबरोबरच भारतीय क्रिकेटपटूंपुढे आयपीएल आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक यामधील कामगिरीची तुलना केली जाण्याचा दबाव आहे. एखादी चूक होण्याचा अवकाश; ‘आयपीएलमुळे कोटय़धीश होताना कसे जीव तोडून खेळतात आणि देशाकडून खेळताना काडीचीही मेहनत घेत नाहीत. अतिक्रिकेटचे हे तोटे!’ अशी टीका करण्यासाठी क्रिकेटवेडे सरसावतील. आयपीएल आणि पर्यायाने पैशामागे धावताना देशाकडून खेळण्याची संधी दुय्यम मानली जात आहे काय? पैशाच्या मोहापायी टीम इंडियाची जर्सी परिधान करण्याची ओढ-प्रतिष्ठा कमी होत आहे काय, अशा अनेक वादांना वृत्तवाहिन्यांच्या कलचाचण्यांमधून तोंड फोडले जाईल. इंग्लंडमध्ये अपेक्षाभंग केल्यास भारतीय क्रिकेटपटूंना अशा टीकास्त्रांच्या बाऊन्सर्सचा सामना करावा लागेल! अर्थात, एक फटका वा चेंडूवर सामन्याला कलाटणी देणाऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत आत्मप्रौढी व आत्मसंतुष्टीला जराही वाव नाही, हे एव्हाना भारतीय क्रिकेटपटूंना उमगले असेल. एकूणातच या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने ‘सभ्य गृहस्थांचा खेळ ते चीअरगर्ल्सचा खेळ’ असे एक वर्तुळ पूर्ण होत आहे; तेही क्रिकेटच्या पंढरीतच! या विश्वचषकाने क्रिकेट प्रसारणाचे आणि पर्यायाने उत्पन्नाचे विक्रम मोडले जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. चीन-रशियासह तब्बल २१६ देशांमध्ये त्याचे प्रसारण केले जाईल. ट्वेन्टी-२० ही क्रिकेटच्या ग्लोबल आविष्काराची नांदी आहे, असे २००७ च्या विश्वचषकानंतर आम्ही म्हटले होते. त्याचीच प्रचीती आता येत आहे. मात्र, खेळाचा व्यवसाय आणि व्यवसायाचा धंदा या ‘आयपीएल’ने उभे केलेल्या आव्हानाचा इथेही मुकाबला करावा लागेल. वास्तविक, ऑलिम्पिक-एशियाड आणि विश्वचषक फुटबॉलसारख्या स्पर्धा दर चार वर्षांनी भरविण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे त्या केवळ स्पर्धा नसून एक बहुआयामी चळवळ म्हणून विश्वव्यापी ठरल्या आहेत. पुण्यात गेल्या वर्षी झालेली राष्ट्रकुल युवा स्पर्धा आणि दिल्लीत २०१० साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या माध्यमातून भारतीयांना त्याची पुन्हा प्रचीती येत आहे. या स्पर्धाच्या निमित्ताने तळागाळात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी नॅशनल क्लब गेम्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अभिजनांपेक्षा बहुजनांच्या क्रीडाचळवळीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना, आशियाई क्रीडा परिषद, जागतिक फुटबॉल महासंघ आदी संघटना झटत आहेत. संपूर्ण जगाला जोडणाऱ्या क्रीडाचळवळीची ती आनंदाची वैश्विक अनुभूती असते. क्रिकेटच्या मैदानानेही भारतीयांना काही अविस्मरणीय क्षणांचा नजराणा दिला आहेच. प्रुडेन्शियल वर्ल्डकप उंचावतानाचा कपिल देव, रवि शास्त्रीच्या ऑडीवर विराजमान होऊन मिनी वर्ल्डकपचे विजेतेपद साजरा करणारा सुनिल गावसकरचा भारतीय संघ, पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविल्यानंतर धोनी ब्रिगेडचे मुंबापुरीत झालेले अभूतपूर्व स्वागत, असे अनेक ऐतिहासिक क्षण अजूनही स्मरणरंजनाचा क्रिकेटोत्सव साजरा करतात! क्रिकेटच्या या जल्लोषाबरोबर जबाबदारीचेही भान ठेवले जात आहे. ‘आयपीएल’च्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील शाळांसाठी लाखो डॉलरचा निधी उभारण्यात आला आणि आता इंग्लंडमधील विश्वचषकात ‘शांततेसाठी क्रिकेट’ असा नारा देत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी निधीसंकलन केले जाणार आहे. परंतु, पाठोपाठच्या ‘आयपीएल’, ऑक्टोबरमध्ये होणारी ‘चॅम्पियन्स लीग’ आणि आता दोनच वर्षांनी खेळविल्या जाणाऱ्या या ट्वेन्टी-२० विश्वचषकामुळे जल्लोषाचा अतिरेक होऊन क्रिकेट भरकटण्याचा धोका आहे. भारतामध्ये क्रिकेट हा खेळ नसून धर्म आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र, कर्णकर्कश ध्वनिक्षेपक लावून देवधर्माचा बाजार मांडला गेल्यानंतर भक्तगण त्यापासून दूर पळतात. गावात एखादा मनोरंजनाचा फड लागावा; चार-दोन विदूषकी चाळ्यांना टाळ्या-शिटय़ा ठोकत आयुष्यातील दु:खे घटकाभर विसरली जावीत आणि त्याची गुंगी दूर झाल्यावर पुन्हा कफल्लक मनाने घरच्या उंबरठय़ाकडे पाय वळावेत, अशी स्थिती ‘क्रिकेटरंजना’च्या या फडाची होऊ नये. कारण.. ‘क्रिकेट डिझव्‍‌र्हस् मोअर’!