Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

क्वीन ऑफ फ्यूजन..
गेल्या काही वर्षांपासून शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य यांनी आपला पाया कायम राखत बऱ्याच प्रमाणात बदल घडवून आणले. बदलत्या जमान्याप्रमाणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय संगीताने नव्या पिढीचा कल ओळखून कला सादर करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. आज लोकप्रिय असलेले ‘फ्युजन’ हे त्याचेच द्योतक आहे. शास्त्रीय नृत्य मात्र पुस्तकी साच्यातच अडकून राहिले. एखाददुसरा अपवाद वगळता शास्त्रीय नृत्यात तोचतोचपणा पाहायला मिळतो. तेच तेच कलाकार, तोच पदन्यास आणि तिच ती वेषभूषा.. शास्त्रीय नृत्यप्रकार आपली कास सोडायला तयार नाही असेच दिसून येत आहे. शास्त्रीय नृत्याचा गाभा कायम राखत आदिती भागवतने मोठय़ा हिमतीने आणि धोका पत्करून शास्त्रीय नृत्यात क्रांती घडविण्याचा वीडा उचलला आहे आणि आंतराष्ट्रीय स्तरावर आदितीच्या या प्रयत्नांचे खूप चांगल्यारितीने स्वागत केले जात आहे. एक उत्कृष्ट नर्तिका आणि अभिनेत्री म्हणून आदिती चांगलीच नावारूपाला आली आहे. मधुर भांडारकरच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’मध्ये आयटम साँग केल्यानंतर आदितीला एक चेहरा प्राप्त झाला.. ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘आई नंबर १’, ‘अदला बदली’, ‘तहान’ या चित्रपटांमुळे तिच्या अभिनयावर शिक्कामोर्तब झाले.. आणि लुई बॅंक्स, शिवामणी यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबत ‘जॅझ-कथ्थक’, ‘जॅझ-लावणी’ जुगलबंदी, सादर करणाऱ्या या ‘प्रयोगशील नर्तिके’मुळे नृत्यक्षेत्रात एक नवा ट्रेन्ड तयार होत चालला आहे. आदिती भागवत म्हणते की, ‘‘भारतात शास्त्रीय नृत्याची परंपरा आहे आणि ही कला शिकणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. मात्र इथे फक्त वयोमानानुसारच ‘सिनियरिटी’ मिळते, हे या क्षेत्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. तुम्ही शास्त्रीय नृत्यात कितीही निपुण असा, तुमचे वय जर कमी असेल तर तुम्हाला इथे कोणी विचारत नाही. इथे ठराविक नृत्यांगनांनाच कार्यक्रम मिळतात, प्रायोजक मिळतात. कारण त्या या क्षेत्रातील ‘सिनियर’ असतात. पण आमच्यासारख्या तरुण नृत्यांगनांनी काय करायचे? आमच्यात जोपर्यंत स्टॅमिना आहे, जोश आहे तोपर्यंत आम्हाला कोणी कार्यक्रम देणार नाही आणि सबंध आयुष्य खर्ची घातल्यानंतर कार्यक्रम मिळणार.. त्याचा काय उपयोग? आणि म्हणूनच मी जरा वेगळी वाट निवडली’’ आदितीच्या ‘प्रोफाइल’वर एक नजर टाकल्यास ‘प्रॅक्टिकल’मध्येच नाही तर ‘थिअरी’वरही तिची किती पकड आहे हे कळते. आदितीचे घरचे वातावरण कलेसाठी अतिशय पोषक. आदितीची आई रागिणी भागवत या शास्त्रीय गायिका आहेत. त्या अनेक मैफली, दूरदर्शन-आकाशवाणीवर कार्यक्रम करीत असल्यामुळे आदितीला लहानपणापासून कलेची आवड निर्माण झाली. वयाच्या चौथ्या वर्षी रागिणी भागवतांनी आदितीला प्रख्यात कथक नर्तिका पद्मश्री रोशन कुमारी यांच्या हवाली केले. डान्स क्लासला जाऊन आल्यानंतरही त्या हातात छडी घेऊन आदितीकडून रियाझ करवून घ्यायच्या. राजा शिवाजी विद्यालयात शालेय आणि रुपारेलमध्ये उच्च शिक्षण घेता घेता आदिती नृत्याचेही धडे गिरवू लागली. नंदिता पुरी, झेलम परांजपे आदी दिग्गजांकडून आदितीने नृत्याचे वेगवेगळे प्रकार शिकून घेतले. मानसशास्त्रात एम.ए. केल्यानंतर आदितीने कथकमध्येही एम.ए. केले. संजय खान यांच्या ‘द ग्रेट मराठा’ या मालिकेत वयाच्या १३ व्या वर्षी आदितीला नृत्य सादर करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. राजभवनात राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या समोर वयाच्या १६ व्या वर्षी आदितीने नृत्याचा पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला. ‘सह्याद्री’च्या ‘दम दमा दम’मध्ये सलग सहा वर्षे आदितीने सूत्रसंचालन केले. मग आदितीला बरेच मराठी चित्रपट, बालाजी टेलिफिल्सची ‘कहानी घर घर की’ ही मालिका मिळाली. दुसऱ्या बाजूला आदितीचे नृत्याचे कार्यक्रम सुरूच होते. ताजमहाल हॉटेलमध्ये काही विदेशी प्रेक्षकांसमोर आदितीला नृत्य सादर करण्याची संधी प्राप्त झाली आणि तिचा ट्रॅकच बदलला. या कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती दाखवायची असल्यामुळे आदितीने लावणी आणि जोगवा सादर केला. याच कार्यक्रमात प्रख्यात जॅझ संगीतज्ज्ञ लुई बँक्स उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते आदितीकडे आले आणि त्यांनी तिला आपल्यासोबत काम करण्याची ऑफर दिली. आदिती म्हणते, लुई बँक्सला शास्त्रीय, पाश्चिमात्य आणि लोककला असे नृत्यप्रकार सादर करणारी कलाकार हवी होती. ती त्यांना माझ्यात सापडली. लुई बँक्सचे काम अतिशय वेगळ्या पठडीतले होते. तो नव्या जमान्याचा कलावंत होता. प्रयोगशील होता. नावीन्याचा ध्यास असलेला होता. त्याला जॅझ आणि कथ्थक तसेच जॅझ आणि लावणी यांच्यातील मेळ साधायचा होता. पाश्चिमात्य संगीतात जॅझ हा तसा अतिशय शास्त्रोक्त प्रकार, तर लावणीचा बाज जॅझपेक्षा फारच वेगळा. मात्र तरीही दोन्ही प्रकारात काही साम्यस्थळे होती. ‘जॅझ ब्लू’ आणि अदाकारीच्या लावणीचा धागा जुळत होता. अदाकारीच्या लावणीमधील श्रुंगार आणि जॅझ ब्लूमधील रोमान्स यांच्यात कमालीची समानता आम्हाला आढळली. जवळपास वर्षभर लुई बँक्स आणि मी त्यावर संशोधन केले, म्युझिक ट्रॅक तयार केला आणि ‘आकृती’ हा एक अनोखा कार्यक्रम सुरू केला. मुंबई फेस्टिव्हलमध्ये आम्ही त्याचा पहिला प्रयोग केला आणि तो खूपच यशस्वी ठरला. लावणी म्हटल्यावर काही पांढरपेशा समाजाने सुरुवातीला नावे ठेवायला सुरुवात केली होती. प्रत्यक्षात कार्यक्रम पाहिल्यानंतर मात्र त्यांच्याच तोंडात चपराक बसली. लुई बँक्सकडेच प्रख्यात तालवादक शिवमणी यांची ओळख झाली आणि ‘कथक ऑन ड्रम्स’ जन्माला आले. ‘फ्युजन’ हा सृजनशीलतेचा एक अनोखा अविष्कार आहे. ‘फ्युजन’म्हणजे फक्त म्युझिक, ऱ्हिदम आणि डान्सचे मिश्रण नसून त्यात एक विचार आहे, संकल्पना आहे आणि ते एक भावनांचे मिश्रण आहे. ‘फ्युजन’मधील प्रत्येक कलावंत हा आपापल्या अभिव्यक्तीनुसार विचार मांडत असतो आणि या विचारांमधून एक अनुभुती निर्माण होते. या सगळ्यांची सांगड जर नीट झाली नाही तर ‘फ्युजन’चे ‘कन्फ्युजन’ व्हायला वेळ लागत नाही. आदितीला ती नस अचूक सापडली आहे. पारंपरिक वेशभूषेला आदितीने छेद दिला आहे. ‘फ्युजन’मध्ये आदितीने लावणी सादर करताना चक्क काळ्या नऊवारीचा वापर केला आहे. वास्तविक या रंगाचा लावणीत कोणीही फारसा वापर करीत नाही. ‘फ्युजन’मध्ये कथ्थक सादर करताना आदितीने स्पॅनिश वेशभूषेचाही वापर केला. फिल्मी पाश्र्वभूमी असल्यामुळे आदितीने आपल्या ‘लूक’ला नेहमीच महत्त्व दिले आहे. अशा प्रकारचे ‘गिमिक्स’ वापरल्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पडली असे आदिती म्हणते. पारंपरिक लोकनृत्यावर आदितीची हुकूमत आहे. शास्त्रशुद्ध लावणीवर अधिक भर देताना आदितीने लावणीचे फ्युजन सादर करून अनेकांना धक्का दिला आहे. फ्युजन लावणीमुळे या लोककलेच्या प्रकाराबद्दल असलेले बरेच गैरसमज दूर झाले, असे आदिती म्हणते. जॅझमधील प्रसिद्ध ‘फिव्हर’ हे गाणे आणि ‘पाडाला पिकलाय आंबा’ या दोन्ही गाण्याच साम्य आढळल्याने आम्ही आमच्या या कार्यक्रमात त्याचा समावेश केला आहे. ‘पाडाला पिकलाय आंबा’ ही लावणी आम्ही इंग्रजीत सादर करतो आणि त्यामुळे त्याच्या आशयाला कुठेही धक्का लागत नाही हे विशेष, असे आदिती सांगते. प्रख्यात ड्रमर मुकुल डोंगरे, सितारवादक रवींद्र चारी यांच्यासोबत आदितीने आता ‘तालात्मा’ हा आणखी एक वेगळा कार्यक्रम तयार केला आहे. पुढच्याच महिन्यात या ग्रुपचा अमेरिकेत कार्यक्रम सादर होणार आहे. ‘फॅन्टम ऑफ ऑपेरा’प्रमाणे आदितीने ‘ड्रिमगर्ल ऑफ बॉलीवूड’ हा कार्यक्रम न्यूझीलंडमध्ये सलग ३० दिवस सादर केला होता. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. पारंपरिक लोककलांवर विशेष प्रेम असलेल्या आदितीला पारंपरिक लोककलावंताबद्दल खंतदेखील आहे. आज राजस्थानप्रमाणे महाराष्ट्राच्या लोककला अधिक व्यावसायिक का होऊ शकत नाही, असा सवाल आदिती करते. लोककलावंत, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि विद्यापिठांनी आता त्याच त्याच पठडीत सादर होणाऱ्या लोककलांचा साचा बदलायला हवा, असे तिचे मत आहे. लावणीच्या नावाखाली जो सध्या धुडगुस सुरू आहे त्याबद्दल तिची तक्रार आहे. पारंपरिक बाज टिकवून लावणीत कसा बदल करता येईल यावर आदितीचे संशोधन सुरू आहे आणि त्यातूनच ‘जॅझ-लावणी’, ‘लावणी ऑन ड्रम्स’ असे प्रयोग जन्माला आले आहेत.
shivaprash@gmail.com