Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

कोल्हापूर विभागात बारावीत ‘सातारा पॅटर्न’
राज किरण जोशी, चिन्मय पावसकरला विभागून पहिला क्रमांक
कोल्हापूर, ४ जून / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे फेब्रुवारी-मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेच्या गुणवत्ता यादीवर यंदा सातारा जिल्ह्य़ातील गुणवान विद्यार्थ्यांनी कब्जा केला आहे. या परीक्षेच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीसह मुली, मागासवर्गीय विद्यार्थी, शास्त्र शाखा, व्यावसायिक गट, कलाशाखा आणि किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम या सर्व गटात सातारा जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजला गुणवत्ता यादीवर विजयी ध्वज लावण्याचा मान मिळाला आहे.

सांगलीचा अमित गुरव, इस्लामपूरचा प्रशांत पंडित कोल्हापूर बोर्डात द्वितीय
रात्र शाळेत गीतांजली बेलवलकर दुसरी
सांगली, ४ जून/प्रतिनिधी
कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीने मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेत विलिंग्डन महाविद्यालयाचा अमित मुकुंद गुरव व इस्लामपूरच्या विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा प्रशांत रमेश पंडित यांनी ९५.८३ टक्के गुण मिळवून सांगली जिल्ह्य़ात पहिला, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला. रात्र शाळेतही सांगलीच्या गीतांजली परशुराम बेलवलकर हिने ७५.१७ टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. सांगली जिल्ह्य़ाचा एकूण निकाल ८६.१८ टक्के इतका लागला आहे.

विभागीय गुणवत्तायादीत साताऱ्याचे तीन टॉपर; निकाल ८५ टक्के
नेहा पानसरे मुलीत प्रथम, कुलसुम सय्यद मागासवर्गीयांत प्रथम
शास्त्र शाखेत चैत्राली जोशी, कला शाखेत रोहिणी जाधव
सातारा, ४ जून/प्रतिनिधी
सातारा जिल्ह्य़ाचा निकाल ८५.०८ टक्के लागला असून, कोल्हापूर विभाग उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान सातारच्या राज किरण जोशी व कराडच्या चिन्मय अनंतप्रसाद पावसकर या दोन विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. तिसरा क्रमांक पटकावणारी साताराची नेहा विजय पानसरे मुलींत प्रथम, तर मागासवर्गियांत कुलसुम जहांगीर सय्यद, शास्त्र शाखेत चैत्राली जोशी, कला शाखेत रोहिणी कांतीलाल जाधव (फलटण)ने प्रथम क्रमांकाचा झेंडा फटकावला आहे.

सोलापूर जिल्ह्य़ात श्रीअंश वागदरीकर प्रथम;
९१ टक्के मुली उत्तीर्ण, जिल्ह्य़ाचा निकाल ८५.७० टक्के
सोलापूर, ४ जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्य़ाचा निकाल ८५.७० टक्के लागला असून जिल्ह्य़ात उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९०.११ टक्के असून मुलांचे प्रमाण ८२.८६ टक्के इतके आहे.सोलापूर जिल्ह्य़ात संगमेश्वर महाविद्यालयाचा श्रीअंश शंकर वागदरीकर हा ५६१ गुण (९३.५० टक्के ) मिळवून प्रथम आला. तर याच महाविद्यालयाची अश्विनी अरविंद मुतालिक देसाई ही विद्यार्थिनी ५५४ गुण (९२.३३ टक्के ) मिळवून जिल्ह्य़ात मुलींमध्ये प्रथम आली.

गरिबी व अपंगपणाच्या सावलीसह जितेंद्रने जिंकले आकाश!
कोल्हापूर, ४ जून / विशेष प्रतिनिधी

घरी अठराविश्वे दारिद्रय़, नशिबी आलेले अपंगपण अशा प्रतिकूल परिस्थितीचा जमेचा आलेख सावलीसारखा सोबत करीत असताना कोल्हापूरच्या जितेंद्र भाऊसो पाटील या अपंग विद्यार्थ्यांने १२ वी परीक्षेत यशाला आपल्या पायाशी लोळण घेणे भाग पाडले. जितेंद्र हा १२ वी परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अपंग विद्यार्थ्यांत सर्वप्रथम आला आहे. त्याच्या या यशाने डॉ.डी.वाय.पाटील शिक्षण समूह आणि पट्टणकोडोली ग्रामस्थांच्या आंनदाला उधाण आले आहे.

इचलकरंजी पालिका काँग्रेसमध्ये फूट अटळ
इचलकरंजी, ४ जून / वार्ताहर

नगराध्यक्ष निवडीच्या वातावरणाने गती घेण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पाच फुटीर नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी गुरुवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष पक्षप्रतोद अशोक भारगे यांनी केल्याने काँग्रेसची फूट अटळ असल्याचे स्पष्ट झाले, तर काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे. त्यातून पक्षांतरबंदीचा डाव खेळला जात असून, काँग्रेसच्या कायदेशीर लढय़ास चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा विरोधी पक्षनेते जयवंत लायकर व नगरसेवक संभाजी नाईक यांनी दिला आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या विषय समिती सभा व विशेष सभेला काँग्रेसच्या पाच नगरसेविका पक्षादेश डावलून अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे नगराध्यक्षा किशोरी आवाडे या अल्पमतात आल्याचे दिसून आले. यावर सत्तारूढ गटाने वर्षां ढेरे, ध्रुवती दलवाई, साबिया बागवान, पद्मावती भंडारे व सारिका भोकरे या नगरसेविकांना अपात्र ठरविण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षप्रतोद अशोक आरगे व नगरसेवक सुरेश गोंदकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाच नगरसेविकांनी पक्षादेश डावलल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली.

खणीत बुडून मायलेकींचा मृत्यू
कागल, ४ जून / वार्ताहर
धुणे धुण्यास गेलेल्या मायलेकींचा खणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बानगे (ता.कागल) येथे घडली. सविता नाना बिरंजे (वय ३०) असे मयत महिलेचे नाव असून कोमल (वय ६) हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सविताचा विवाह घोसरवाड (ता.शिरोळ) येथील नाना बिरंजे यांच्याशी झाला होता. दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने पतीचे निधन झाल्याने सविता एक मुलगा व मुलगी यांच्यासह बानगे येथे माहेरी रहात होती. मोलमजुरी करून चरितार्थ चालवित होती. बुधवारी दुपारी जवळच असलेल्या विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेली असता कोमल पाण्यात पडली. तिला बाहेर काढत असताना तिही बुडून मयत झाली. आता मागे केवळ तिचा मुलगा नीलेश राहिला असून आई-वडील व बहिणीच्या मृत्यूने तो सर्वस्वी पोरका झाला आहे. कागल पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

सातारचे राज, नेहा, चैत्राली होणार इंजिनिअर
सातारा, ४ जून/ प्रतिनिधी
कोल्हापूर विभागात टॉपर आलेल्या सातारच्या राज किरण जोशी, नेहा पानसरे व चैत्राली जोशी या तिनही विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्सच्या टेली कम्युनिकेशन/ सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचे स्वप्न बाळगले आहे. येथील रयत शिक्षण संस्थेचा यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची उज्ज्वल परंपरा जोपासत कोल्हापूर विभागात गुणवत्तायादीत नाव रोशन केल्याबद्दल संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे माजी सचिव डॉ. अशोक भोईटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राज जोशी याने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर होणार असल्याचे सांगितले. त्याचे वडिलांचा सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये टेस्ट फूड्सची कंपनी आहे, तर आई आशा जोशी डॉक्टर आहेत. शास्त्र शाखेत विभागात प्रथम आलेल्या चैत्रा जोशीने सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार असल्याचे सांगितले. तिचे वडील पवनकुमार जोशी फर्टिलायझर्स कंपनीत नाशिक येथे काम करतात. आई विद्या गृहिणी आहे. मुलींमध्ये प्रथम आलेली नेहा पानसरेला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. तिचे वडील रिक्षा चालवायचे, आता ते जिल्हा रुग्णालयात नोकरी करतात. नेहा त्यांची एकुलती एक मुलगी आहे.

सुराज्य फाउंडेशनतर्फे नोकरीसाठी जाणाऱ्यांना शुभेच्छा
पेठवडगाव, ४ जून / वार्ताहर

सुराज्य फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेने राबविलेल्या उपक्रमातून बेरोजगारांच्या जीवनात विकासाचे नवे पर्व सुरू होत असल्याचे वारणानगर येथील सुराज्य फौंडेशनचे संस्थापक व राज्याचे फलोत्पादनमंत्री विनय कोरे यांनी येथे बोलताना सांगितले. प्रशिक्षणासह नोकरी या उपक्रमांतर्गत पुण्यातील नामांकित उद्योग घटकात जाणाऱ्या युवकांना शुभेच्छा प्रदान कार्यक्रमात कोरे बोलत होते. लहान वयापासून शाळातून स्पर्धा परीक्षेची गोडी लावण्यासाठी स्पर्धा परीक्षा फौंडेशन कोर्स, ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय सवलतींची ओळखपत्रे, योगाचे महत्त्व पटवून देणारे शिबिरे यासह युवकांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणातून नोकरीची संधी असे विविध उपक्रम राबविणाऱ्या जनसुराज्य शक्तीच्या राजकारणविरहित व्यासपीठ असलेल्या सुराज्य फौंडेशनकडून अनेक युवकांना प्रशिक्षणातून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दलित साहित्य अकादमीचा गणेश शितोळे यांना पुरस्कार
सोलापूर, ४ जून/प्रतिनिधी

भुसावळच्या महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील अण्णा भाऊ साठे सन्मान पुरस्कार सोलापूर जिल्हा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष संदीप ऊर्फ गणेश पांडुरंग शितोळे यांना जाहीर झाला आहे. भुसावळ येथे झालेल्या फुले-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलनात शितोळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. शितोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, वंचित आणि निराधारांसाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजनांवर कार्यशाळा
सांगली, ४ जून/ प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिच्या निवारणासाठी सर्वानीच आपत्ती निवारणार्थ सतर्क राहून आपत्ती निवारणासाठी सक्रिय पुढाकार घेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी शुक्रवारी केले. सांगली जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात आयोजित नैसर्गिक आपत्ती व उपाययोजना प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी वर्धने यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किशोर तावडे, यशदाचे कर्नल सुपनेकर व अश्विनी सुतार आदी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांना तीन महिने मानधन नाही
जत, ४ जून / वार्ताहर

जत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे तीन महिन्याचे मानधन अद्यापही देण्यात आलेले नाही. तसेच अंगणवाडय़ांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांनाही दोन महिन्याचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे या सर्वासमोर बिकट प्रसंग निर्माण झाला आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन केंद्र व राज्य शासन निम्मे- निम्मे देते. पण त्यांच्यातही सांगड घातली गेली नाही. कधी राज्य शासनाचे, तर कधी केंद्र शासनाचे मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यावर जमा होते. त्यामुळे कधीच पूर्ण मानधन मिळत नाही. आता तर मार्च, एप्रिल व मे महिन्याचे पूर्ण मानधनच थकले आहे. अंगणवाडय़ांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांनाही दोन महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही.

खंडोबा मंदिरातील मूर्ती हलविण्यात आल्याने तणाव
आटपाडी, ४ जून/वार्ताहर

ग्रामपंचायतीमार्फत बाजार पटांगणात बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या कामासाठी पुरातन खंडोबा मंदिरातील मूर्ती विनापरवाना व अचानक हलविण्यात आल्याने गेल्या महिन्यात आटपाडी शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. आरोप-प्रत्यारोपानंतर ५ जून रोजी ग्रामसभेत याबाबतचा निर्णय घ्यावा, असे तहसीलदार एम. वाय. जावळे यांनी बैठकीत जाहीर केले होते. त्यानुसार उद्या विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. या ग्रामसभेत काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.खंडोबा मंदिरातील मूर्ती हलविल्यानंतर बांधकामाबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी मूर्ती पुन्हा आहे त्या ठिकाणी ठेवाव्यात, तर ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी मूर्ती ठेवणार नसल्याची भूमिका घेतल्याने हा वाद नेत्यांनी प्रतिष्ठेचा बनविला आहे.

सांगलीत गॅस्ट्रोची लागण
सांगली, ४ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिका क्षेत्रात गॅस्ट्रोचे १४ रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात केली असून उपचार केंद्र उभारले आहे. महापालिका क्षेत्रातील वान्लेसवाडी परिसरात आरोग्य विभागाकडून सव्‍‌र्हेक्षण सुरू असताना या भागातील १४ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे आढळून आले.