Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

बारावीच्या परीक्षेत चमकल्या ‘सावित्री’च्या लेकी
पुणे, ४ जून / खास प्रतिनिधी
नागपूरच्या श्री शिवाजी सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या अलमास नझीम सय्यद हिने बारावीच्या परीक्षेत फक्त नऊ गुणच गमाविले! गुणांचे ‘एव्हरेस्ट’ गाठत तिने ६०० पैकी तब्बल ५९१ गुण मिळवून (९८.५० टक्के) राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. विविध विद्या शाखा-घटकांमधून राज्यात अव्वल आलेल्या ४८ यशवंतांमध्ये ३५ मुलींनी बाजी मारत ‘सावित्रीच्या लेकीं’चा करिष्मा दाखविला! बारावीचा सर्वसाधारण ‘गुण फुगवटा’ मात्र यंदा ओसरला असून नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८७.३९ वरून ८१.९२ वर घसरली आहे. नियमित व फेरपरीक्षार्थीचा मिळून एकूण निकाल यंदा ७८.३८ टक्के लागला. गेल्या वर्षीपेक्षा त्यामध्ये एका टक्क्य़ाची वाढ आहे. फेरपरीक्षार्थीच्या निकालामध्ये तब्बल २२ टक्क्य़ांनी झालेली विक्रमी वाढ, हे यंदाच्या निकालाचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात घट आणि फेरपरीक्षार्थीची भरारी, असे विरोधाभासी चित्रही यंदा प्रथमच पाहण्यास मिळाले.

निवडणूक बजेट
सामान्यांवर सवलतींची खैरात; तर श्रीमंतांच्या खिशाला चाट!
मुंबई, ४ जून / खास प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लोकसभा निवडणुकीत फायदा झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि विविध समाज घटकांचे कर्ज माफ करून या वर्गातील सुमारे १५ लाख कर्जदारांना सरकारने कर्जमुक्त केले आहे. विविध समाज घटकांना खूश करतानाच मोबाईल, देशी व विदेशी बनावटीची दारू, सिगारेट , महागडय़ा चार चाकी गाडय़ांवरील करात वाढ करून चैनीच्या वस्तू वापरणाऱ्यांच्या खिशात हात घातला आहे. तर घरगुती वापराच्या गॅसच्या शेगडय़ा, अगरबत्त्या, नकली दागिने, वैद्यकीय उपकरणांच्या करात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे. पाच हजार किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन असणाऱ्यांचा व्यवसाय कर माफ करण्यात आला आहे.

..त्यात मद्य प्यायला!
मेलबर्न, ४ जून / पीटीआय

हरभजन सिंगने मर्कट संबोधलेला ऑस्ट्रेलियाचा वादग्रस्त अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू सायमंडस् आता मद्यपानामुळे पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे ‘सायमंडस् परत जा’ असे फर्मान काढण्याखेरीज क्रिकेट ऑस्ट्रेलियापुढे पर्यायच उरला नाही. आता आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू होण्याआधीच सायमंडस् मायभूमीकडे निघाला आहे. मद्यपानामुळे ओव्हलवरील संघाचा सराव टाळल्याप्रकरणी सायमंडस्वर आज ही कारवाई करण्यात आली आहे. मैदानाबाहेरील वादग्रस्त वागणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता सायमंडस्ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

हर्षद चव्हाण मुंबईतून प्रथम
मुंबई, ४ जून / प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबई विभागातून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या हर्षद प्रकाश चव्हाण हा ९६.६७ टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. एसआयईएस महाविद्यालयाचा अक्षय रोहित गांधी (९६.३३ टक्के) हा दुसरा तर रूपारेलची लेखा मुरलीधरन (९६.१७) तिसरी आली आहे. लेखाने मुंबईतून मुलींमध्ये पहिली येण्याचा मान पटकावला आहे. जयहिंद महाविद्यालयाची रिद्धी शहा (९५.८३ टक्के) दुसरी आली आहे तर तिसरा क्रमांक रामनारायण रूईया महाविद्यालयाच्या मयुरी रेगे आणि शरण्या सुब्रमण्यम यांनी मिळविला आहे. दोघींना ९५.८३ टक्के गुण मिळाले आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या दादासाहेब पाटील (९४.६७ टक्के) याने मागासवर्गीयांतून पहिला क्रमांक मिळविला आहे.

यंदा मुंबईचा निकाल ११ टक्क्यांनी घसरला
मुंबई, ४ जून/प्रतिनिधी

यंदा मुंबई विभागाचा निकाल जवळपास ११ टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी ७४.६१ टक्के एवढा मुंबईचा निकाल लागला आहे. गेल्या वर्षी तब्बल ८५.३३ टक्के निकाल लागला होता. यंदा २ लाख ६१ हजार ४२६ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील १ लाख ९५ हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नियमित अभ्यासक्रमांचे १ लाख ८६ हजार ३५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी २ लाख ६ हजार ६२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ७६ हजार ३२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदाचा निकाल घसरला असला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढली आहे. मराठी विषयाचा सर्वाधिक (९७.६३ टक्के) निकाल लागला आहे, तर सर्वात कमी निकाल सचिवांची कार्यपद्धती या विषयाचा (७१.३१ टक्के) लागला आहे. एका महाविद्यालयाचा शून्य टक्के निकाल लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या १० आहे. गेल्या वर्षी ३३ महाविद्यालयांमध्ये १०० टक्के निकाल लागला होता.या परीक्षेत कॉपीची ९१ प्रकरणे आढळून आली आहेत. त्याप्रकरणी २८ पर्यवेक्षक आणि सहा केंद्रसंचालकांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष श्रीधर साळुंके यांनी सांगितले. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलेल्या २२ पर्यवेक्षकांची दखल घेऊन त्यांना अभिनंदनाची पत्रे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परराज्यातून आलेल्या सुमारे ३४ विद्यार्थ्यांनी योग्यता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

दहावीचा निकाल २० तारखेनंतर!
बारावीच्या निकालापाठोपाठ उत्सुकता असते ती दहावीचा निकालाची. त्यातच सीबीएसई-आयसीएसई यांच्यासारख्या केंद्रीय मंडळांचे निकाल जाहीर झाल्याने राज्य मंडळाचा निकाल कधी लागणार, असा लाखमोलाचा प्रश्न विचारण्यात येतो. अकरावी प्रवेशासाठीच्या स्पर्धेमुळे निकालाबाबतची उत्कंठा अधिकच वाढते. यंदाचा दहावीचा निकाल नेहमीप्रमाणेच २० जूननंतरच जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ‘निकाल लवकर जाहीर करण्यासाठी मंडळावर कोणताही दबाव नसून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निकालाची तारीख जाहीर करण्यात येईल. इतर मंडळांप्रमाणे राज्य मंडळ गुणपत्रिका आठ-दहा दिवसांनी न देता निकालाच्या वेळीच उपलब्ध करून देते. निकाल लवकर लावण्याबाबत यापूर्वी कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती,’ असेही स्पष्ट करण्यात आले.

महाड-बिरवाडी औद्योगिक क्षेत्रातील कोप्रान फार्मा कंपनीत स्फोट;
सुपरवायझरसह तिघे अत्यवस्थ
महाड, ४ जून / वार्ताहार

महाड-बिरवाडी औद्योगीक क्षेत्रातील कोप्रान फार्मा कंपनीत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भिषण स्फोटात कंपनीचे सुपरवायझर महादेव पन्हाळकर, संदिप बेलोसे व राजकुमार कांबळे हे तिघे गंभिररित्या भाजल्याने जखमी झाले आहेत. तिघेही अत्यवस्थ असल्याने महाड येथे प्राथमीक उपचार करून, त्यांना मुंबईतील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.कंपनीतील रिएक्टर क्रमांक ७०३ मध्ये रासायनिक भुकटी भरण्याचे काम सुरू असताना हा अत्यंत शक्तीशाली स्फोट झाला. स्फोटामुळे सारा परिसर हादरुन गेला. कंपनीतील इमारतीच्या काचा फुटुन त्यांचे तुकडे या तिघांच्या शरीरात गेले. त्याच वेळी ते भाजलेही गेल्याने त्यांचा प्रकृती गंभिर झाली. कंपनीत कार्यरत अन्य कामगारांकडुन उपलब्ध माहिती नुसार, रिएक्टरमध्ये ही रासायनीक भुकटी भरताना कामगारांना जी सुरक्षा साधने देणे आवश्यक होते, ती देण्यात आली नसल्याने हे तिघे इतक्या गंभिररित्या भाजले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस चौकशी करीत असून, व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणा संदर्भात गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी