Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

विभागात नेहा पारिख प्रथम, तर तेजश्री पाथ्रीकर द्वितीय
औरंगाबाद, ४ जून/खास प्रतिनिधी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल औरंगाबाद विभागात ८१.५१ टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागातून सर्वसाधारण गुणवत्तायादीत प्रथम तीनही क्रमांकांवर मुलींनीच बाजी मारली आहे. देवगिरीची नेहा शिवभगवान पारिखने ५७२ गुण (९५.३३ टक्के) मिळवून विभागात पहिला क्रमांक पटकाविला आहे. दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे तेजश्री चंद्रशेखर पाथ्रीकर (५७१ गुण- ९५.१७ टक्के), आकांक्षा रामानंद मोदानी (५६४ गुण- ९४.५० टक्के) यांनी प्राप्त केला. या तीनही गुणवंत विद्यार्थिनी देवगिरी महाविद्यालयाच्याच आहेत. यंदा गुणवत्तायादीवर याच महाविद्यालयाचे वर्चस्व आहे.

रश्मी पाळवदे राज्यात तिसरी
लातूर, ४ जून/वार्ताहर

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रश्मी पाळवदे ही सर्वसाधारण गुणवत्ता यादीत विभागात पहिली व राज्यात तिसरी तसेच मागासवर्गीयांत राज्यात सर्वप्रथम आली असून यशाचा तिहेरी मुकुट तिने प्राप्त केला आहे.विभागात सर्वसाधारण अभ्यासक्रमात, व्यावसायिक अभ्यासक्रमात, मुलींमध्ये मागासवर्गीयांत ती सर्वप्रथम आली आहे. सचिन श्रीरंग जाधव हा मागासवर्गीयांत विभागात दुसरा आला आहे, तर कुमार मयुर बाबर मराठी विषयात विभागात पहिला आला आहे.

खजिन्या
खजिन्याची नेहमीच आठवण येते. गावाकडं गेल्यावर हमखास येते. त्याच्या आठवणीनं मन गहिवरतं. वाडय़ात पूर्वी गोठा होता तिथं आता खोल्या आहेत. पण वाडय़ात प्रवेश केल्याबरोबर अजूनही तिथं तो गोठा दिसायला लागतो आणि त्या एका ठरावीक जागी डोळ्यांत अपार माया घेऊन उभा असलेला, बसलेला असेल तर आम्हाला बघून उभा राहून स्वागत करणारा खजिन्या दिसायला लागतो. हा खजिन्या आमच्या कुटुंबासोबत जवळपास २०-२५ वर्षे राहिला. त्याने त्याच्या आयुष्याचा पहिला आणि शेवटचा श्वास आमच्या कुटुंबीयांच्या साक्षीने घेतला.

निकालाची बातमी व विवाह एकाचदिवशी!
अंबड, ४ जून/वार्ताहर

बारावीच्या परीक्षेत मागासवर्गीयांमधून औरंगाबाद विभागात ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय येणारी अर्चना जगन्नाथ गायकवाड ही आज अंबड येथे निकालाच्या दिवशीच बोहल्यावर चढली . जोग्लादेवी, (ता. घनसावंगी) येथील अर्चनाचे विभागात सर्वत्र गोड कौतुक होत असतानाच ती विवाहासारख्या रेशीमबंधनात बद्ध होत आहे. तिच्या आयुष्यातील विवाहासारखी हळवी व निकालाची गोड अशा दोन्हीही घटना एकाच दिवशी घडून येण्याचा हा दुर्लभ योगायोग सर्वाच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.

परीक्षेतील गैरप्रकारात लातूर राज्यात प्रथम
प्रदीप नणंदकर
लातूर, ४ जून

बारावीच्या परीक्षेत राज्यात ४०३५ परीक्षेतील गैरप्रकाराची प्रकरणे घडली असून त्यापैकी एकटय़ा लातूर विभागात ३३८९ प्रकरणांचा समावेश आहे. केवळ गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान मिळविणाऱ्या लातूर विभागाने या वेळी गैरप्रकारातही प्रथम येऊन आम्ही कशातही कमी नाही हे दाखवून दिल्याची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

ज्ञानसाधनाची भाग्यश्री देसाई कला शाखेत राज्यात पहिली
परभणी जिल्ह्य़ाचा निकाल ८२.५० टक्के
परभणी, ४ जून/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा जिल्ह्य़ाचा निकाल ८२.५० टक्के एवढा लागला असून धर्मापुरी येथील ज्ञानसाधना महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या भाग्यश्री प्रभाकर देसाई हिने कला शाखेत राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे, तर कै. रंगनाथराव काळदाते उच्च माध्यमिक विद्यालयाचा पांडुरंग हनुमंत फरांडे हा कला शाखेतून विभागात दुसरा आला असून याच महाविद्यालयाचा गजानन गोपीनाथ गरूड हा मागासवर्गीयांत कला शाखेत विभागातून पहिला आला आहे.

गुणवंतांची ‘अशी ही पळवापळवी’
चॅनलवाल्यांची ‘लाईव्ह कव्हरेज’साठी धावपळ
औरंगाबाद, ४ जून /प्रतिनिधी
प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येकजण आपापल्या नजरेने पाहतो. ४ जूनला बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे समजताच संबंधित कामाला लागले होते. काहींनी पूर्वीच तयारी केली होती. मात्र चॅनेलवाल्यांनी आधीच तयारी केली असली तरी ऐनवेळी बाजी मारण्यावर त्यांचा भर होता. निकाल जाहीर होताच आपल्या चॅनलवर गुणवंतांना ‘लाईव्ह’ करण्यासाठी धावपळ सुरू झाली आणि यातूनच गुणवंतांची अक्षरश: पळवापळवी करण्यात आली.

अहमदपूरची रश्मी पाळवदे मागासवर्गीयांत राज्यात प्रथम
शाहूचा वीरेंद्र भड अपंगांत राज्यात दुसरा
लातूर, ४ जून/वार्ताहर
लातूर विभागातील शिक्षण मंडळाने मार्च २००९ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ८५.५६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याच्या उत्तीर्णतेच्या सरासरीपेक्षा ३.६४ टक्के गुण जास्त घेऊन राज्यात विभाग प्रथम आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष एम. आर. कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंधरा जणांना जेवणातून विषबाधा
गेवराई, ४ जून/वार्ताहर

कुंदुरीतील मटण खाल्ल्यामुळे पंधरा जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील राजपिंप्री तांडय़ावर ३ जूनला घडली. तालुक्यातील राजपिंप्री तांडय़ावरील एकनाथ राठोड आणि त्यांचे कुटुंबीय तुळजापूरला जाऊन आल्यानंतर त्यांनी आपल्या घरी ३ जूनला कुंदुरीचा कार्यक्रम ठेवला. त्याच्या घरी रात्री जेवण झाल्यानंतर पंधरा लोकांना मळमळ आणि उलटय़ा होऊ लागल्या. यातील काहींना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. फकाळ यांनी सांगितले.

परीक्षेच्या काळातील गैरप्रकाराबद्दल कोणालाही माफी नाही -कदम
लातूर, ४ जून/वार्ताहर

बारावीच्या परीक्षेच्या काळात जे गैरप्रकार घडले त्यात दोषी असणाऱ्या सर्वावर कारवाई केली जाईल. कोणालाही माफी नाही, अशी माहिती लातूर परीक्षा मंडळाचे अध्यक्ष एम. आर. कदम यांनी दिली.परीक्षेच्या गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक, लिपिक, शिपाई, बैठे पथक यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांवर शिक्षा सुचीनुसार जशी शिक्षा केली जाईल तोच न्याय शिक्षक, प्राध्यापक व अधिकाऱ्यांनाही लावला जाईल, असे ते म्हणाले.परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांना ज्यांनी गैरप्रकारातील चौकशी सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जाईल, अशी माहिती पुरवली असेल तर त्याचीही चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची आत्महत्या
लातूर, ४ जून/वार्ताहर

बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या अमोल चंद्रसेन झांबरे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.३० वा. घडली.अमोल झांबरेचे वडील चंद्रसेन हे जिल्ह्य़ातील येरोळ गावचे रहिवासी असून लातूर शहरात ते टेलरिंगचा व्यवसाय करतात. अमोल हा बसवेश्वर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता व त्याने बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने सुरुवातीला त्याने ब्लेडने स्वत:च्या हाताच्या शिरा कापल्या व त्यानंतर घरातील आडूला गळफास घेतला. त्याचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करण्यात येऊन पार्थिव नातेवाईकांच्या ताबत देण्यात आले.

आसाराम चांडक यांचे निधन
मानवत, ४ जून/वार्ताहर

येथील ज्येष्ठ नागरिक आसाराम बन्सीलाल चांडक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान २ जूनला सायं. ७ वा. त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत धार्मिक वृत्तीचे व समयसूचकता असणारे चांडक यांच्यामागे चार विवाहित मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून येथील बालाजी किराणाचे मालक सत्यनारायण चांडक यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्यविधीस मोठय़ा प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.

हिंगोलीच्या ‘आदर्श’ची प्रिया विभागात द्वितीय
हिंगोली, ४ जून/वार्ताहर

येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची एमसीव्हीसी अभ्यासक्रमातून प्रिया विजयकुमार बगडिया ८७.३३ टक्के गुण घेऊन औरंगाबाद विभागातून सर्वद्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष एकनाथ निलावार यांच्या हस्ते तिचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य डी. एन. केळे, उपप्राचार्य विक्रम जावळे, प्रा. डॉ. विलास अघाव यांची प्रमुख उपस्थिती होती. या महाविद्यालयाचा एमसीव्हीसीचा निकाल ९४.३४ टक्के लागला आहे. कला विभागाचा ८०.२८ टक्के, वाणिज्य विभाग ७८.९४ टक्के तर विज्ञान विभागाचा निकाल ६७.५५ टक्के लागला आहे.

सोनवणे महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के
लातूर, ४ जून/वार्ताहर

डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला असून कु. शीतल अविनाश मोरे हिने ८९.८७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सचिव अविनाश मोरे यांची ती कन्या आहे. एआयईईई परीक्षेत महाविद्यालयाचे ९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत यादव आकाश हा १५७ गुण घेऊन पहिला आला आहे.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यश
लातूर, ४ जून/वार्ताहर
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाने बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.या महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे १२ विद्यार्थी गुणवत्तेत आले आहेत. यात निखिल घाडगे (५४१), बळीराम गोरे (५३९), ए. एस. अग्रवाल (५२५), एम. आर. बरकुल (५२१), के. एस. कंदले (५१४), एम. एम. कबाडे (५११), यु. ए. टोंपे (५०५), एस. एस. बावगे (५०३), पी. डी. चौधरी (४९२), पी. आर. वाघमारे (४९१), व्ही. एम. सोनटक्के (४८३), पी. एस. उजेडे (४८२) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कला शाखेतील १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यात जयश्री क्षीरसागर (५४४), कांतिलाल जाधव, शिल्पा घोडके, गजानन कंगणे, सुनील केंद्रे, रूपाली खडके, बालाजी चिंचोले, उमाकांत क्षीरसागर, शिवगीता सोनवणे, चंदाराणी साखरे, स्वाती खडके, सुनंदा कुंभार, अंजू येदले, कमाकराणी जगताप यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेत चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यात शुभांगी पांचाळ, श्याम कांबळे, भाग्यश्री सोमवंशी, गोकुळ बंडगर यांचा समावेश आहे.

मोबाईल कार्ड हेराफेरी प्रकरणी आणखी एकास अटक
औरंगाबाद, ४ जून /प्रतिनिधी
मोबाईल कंपनीच्या पी्रमियम सिमकार्डमध्ये हेराफेरी करून दुसऱ्याचे कार्ड तिसऱ्यालाच विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी आणखी एकास रात्री अटक केली. आरोपींची संख्या आता चार झाली असून या सर्वाना ९ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.प्रदीप गजानन राठोड, अभय राजेश बंग, नरेंद्र बदनापूरकर आणि प्रवीण कुलकर्णी अशी आरोपींची नावे आहेत. ९८२३७७७७७७ या क्रमांकाचे प्रमोद राठोड यांचे असलेले व्होडाफोन कंपनीचे सिमकार्ड विकण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना निराला बाजार भागातून अटक करण्यात आली होती. अशा क्रमांकाच्या कार्डची किमत सध्या दोन लाख रुपये असताना एक लाख रुपयांत ते विकण्याचा प्रयत्न होता. त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात मोबाईल शॉपीचा मालक, तसेच कंपनीच्या शोरुमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. यात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव बोडखे पाटील याचा पुढील तपास करत आहेत.

बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकर चव्हाण
औरंगाबाद, ४ जून/खास प्रतिनिधी
बहुजन समाज पक्षाच्या औरंगाबादची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी मधुकर चव्हाण, तर महासचिवपदी अनिलकुमार सोनकांबळे यांची निवड झाली आहे. मुंबईत केंद्रीय महासचिव आमदार के. के. सच्चान, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड व उपाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी अशी- मधुकर चव्हाण- जिल्हाध्यक्ष, संजय उघडे-उपाध्यक्ष, अनिलकुमार सोनकांबळे- महासचिव, अरुण वासनकर- कोषाध्यक्ष, राहुल सोनवणे-कार्यालयीन सचिव.

खाणावळीतील स्वयंपाक्यांचे भांडण
औरंगाबाद, ४ जून /प्रतिनिधी
खाणावळीत काम करणाऱ्या स्वयंपाक्यांचे काल दुपारी समर्थनगर येथे भांडण झाले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.
नाजिया सुलतान शेख (वय १८, रा. समतानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाजिया आणि तिची आई समर्थनगरातील बालाजी खाणावळीत पोळ्या लाटण्याचे काम करतात. आरोपी बाळू प्रधान (रा. उस्मानपुरा) हा त्याच खाणावळीत स्वयंपाकी आहे. दुपारी नाजिया आणि तिची आई पोळ्या करत असताना बाळू याने तिला लाथ मारली. यावरून दोघांत वाद झाला. बाळू याने नाजिया आणि तिच्या आईला जिवंत मारण्याची धमकी दिली.

राष्ट्रीय बहुजन पक्षाचा सोमवारी मंत्रालयावर मोर्चा
औरंगाबाद, ४ जून/खास प्रतिनिधी

मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण, राज्यसभा आणि विधानसभेवर प्रतिनिधित्व, गोपले समितीच्या ५२ शिफारशी लहुजी साळवे आयोगाला लागू कराव्यात, मातंग समाजासाठी स्वतंत्र खाते या मागण्यांसाठी राष्ट्रीय बहुजन पक्षातर्फे येत्या सोमवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मिलिंद कॉलेजचा निकाल ८५ टक्के
लातूर, ४ जून/वार्ताहर
बारावीच्या परीक्षेत मिलिंद कॉलेजचा ८५ टक्के निकाल लागला असून महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली आहे.रोहन शेटकार व संदीप तगडपल्लेवार या दोन विद्यार्थ्यांनी ९१.१७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे, तर मनोज शिंदे याने ९१ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात दुसरा येण्याचा मान मिळविला. महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल ८५ टक्के, कला शाखेचा ७५ तर वाणिज्य शाखेचा ४७ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव बब्रुवान माने, प्रभारी प्राचार्य व्ही. आर. गायकवाड, प्रा. सुरेश नरहरे यांनी केले आहे.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांचा १४ जूनला मेळावा
बीड, ४ जून/वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कारभार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे वृत्त या पाश्र्वभूमीवर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा १४ जून रोजी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. अजित देशमुख यांनी दिली. बीड येथे १४ जूनला भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख दोन विषयांवर चर्चा करून आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी मेळावा घेण्यात येणार आहे. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा खून करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. समाजासाठी सरकारशी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून हजारे यांनी मोठे काम केले. सर्वसामान्य माणसाला त्याचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. अशा व्यक्तीचा खून करण्याची सुपारी दिली जावी, ही निंदनीय घटना आहे.

श्रीसरस्वती महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल
सिल्लोड, ४ जून/वार्ताहर
येथील श्रीसरस्वती भूपन कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९५ टक्के लागला असून या वर्षी निकालाची परंपरा कायम राखण्यात झाली आहे. ऋतुजा सोनटक्के व अर्चना जाधव ८२.५० टक्के गुण घेऊन यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे, तर द्वितीय अनिल बैनाडे ८१.५० टक्के गुण स्नेहा सोनटक्के ८१.१७ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. या संस्थेच्या १७४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा दिली होती. त्यापैकी १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचे १० विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ९३ विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ५३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्हाध्यक्षपदी चांदणे
बीड, ४ जून/वार्ताहर

भारतीय जनता युवा मोर्चा दलित आघाडी जिल्हाध्यक्षपदी युवक कार्यकर्ते अनिल चांदणे यांची तर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश बडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी केली. दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून त्यांच्या निवडीबद्दल युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख, उपाध्यक्ष नारायण शिंदे, प्रशांत चौरे आदींनी अभिनंदन केले आहे.