Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बारावीच्या परीक्षेत चमकल्या ‘सावित्री’च्या लेकी
पुणे, ४ जून / खास प्रतिनिधी

 

नागपूरच्या श्री शिवाजी सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या अलमास नझीम सय्यद हिने बारावीच्या परीक्षेत फक्त नऊ गुणच गमाविले! गुणांचे ‘एव्हरेस्ट’ गाठत तिने ६०० पैकी तब्बल ५९१ गुण मिळवून (९८.५० टक्के) राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. विविध विद्या शाखा-घटकांमधून राज्यात अव्वल आलेल्या ४८ यशवंतांमध्ये ३५ मुलींनी बाजी मारत ‘सावित्रीच्या लेकीं’चा करिष्मा दाखविला!
बारावीचा सर्वसाधारण ‘गुण फुगवटा’ मात्र यंदा ओसरला असून नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८७.३९ वरून ८१.९२ वर घसरली आहे. नियमित व फेरपरीक्षार्थीचा मिळून एकूण निकाल यंदा ७८.३८ टक्के लागला. गेल्या वर्षीपेक्षा त्यामध्ये एका टक्क्य़ाची वाढ आहे. फेरपरीक्षार्थीच्या निकालामध्ये तब्बल २२ टक्क्य़ांनी झालेली विक्रमी वाढ, हे यंदाच्या निकालाचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात घट आणि फेरपरीक्षार्थीची भरारी, असे विरोधाभासी चित्रही यंदा प्रथमच पाहण्यास मिळाले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज बारावीचा राज्याचा निकाल जाहीर करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजयशीला सरदेसाई, सचिव तुकाराम सुपे या वेळी उपस्थित होते. राज्यात एकूण १० लाख ५९ हजार २६१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यामध्ये पाच लाख ९८ हजार ७६ मुले व चार लाख ६१ हजार १८५ मुलींचा समावेश होता. त्यापैकी आठ लाख ६७ हजार ७३५ मुले व चार लाख ७४ हजार ८४९ मुली उत्तीर्ण झाल्या. निकालाची एकूण टक्केवारी ८१.९२ असून ७९.४० टक्के मुले व ८५.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. फेरपरीक्षार्थीनी या वेळी कमालच केली! एक लाख सात हजार ८७९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ४७ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एरवी फेरपरीक्षार्थीच्या यशाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपर्यंत असते. यंदा ते विक्रमी ४३.६३ टक्क्य़ांवर गेले. ‘यंदा ऑक्टोबरच्या विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिली. त्यामुळे तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांचा लाभ त्यांना मिळाला,’ असे स्पष्टीकरण डॉ. सरदेसाई यांनी दिले.
राज्यातील आठ विभागांपैकी मुंबई व कोल्हापूरचा अपवाद वगळता इतर सहाही मंडळांमध्ये मुलींनी अव्वल स्थानी हक्क प्रस्थापित केला. त्याचप्रमाणे विभागनिहाय यशवंत विद्यार्थ्यांमध्येही मुलींनी चमक दाखविली. प्रमुख शहरांपेक्षा छोटय़ा गावांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश, अभ्यासाचे टेन्शन न घेता सर्व छंद जोपासून नियमित अभ्यास करण्यावर दिलेला भर, हे यंदाच्या निकालामध्ये उल्लेखनीय ठरले.

राज्यातील आठही विभागांमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे -
पुणे - गौरी अरविंद देशमुख, महिलाश्रम कनिष्ठ महाविद्यालय, पुणे. ६०० पैकी ५७३ गुण. (९५.५० टक्के).
नागपूर - अलमास नझीम सय्यद, श्री शिवाजी सायन्स ज्युनिअर कॉलेज, नागपूर. ५९१ गुण (९८.५० टक्के).
औरंगाबाद - नेहा शिवभगवान पारीक, देवगिरी कॉलेज, औरंगाबाद, ५७२ गुण (९५.३३ टक्के).
मुंबई - हर्षद प्रकाश चव्हाण, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, चेंबूर, ५८० गुण (९६.६७ टक्के).
कोल्हापूर - राज किरण जोशी, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, सातारा आणि चिन्मय अनंतप्रसाद पावसकर,
यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड. दोघांनाही ५७६ गुण (९६ टक्के).
अमरावती - अनुश्री प्रकाश बूब, ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज, अमरावती. ५८७ गुण (९७.८३ टक्के).
नाशिक - युगंधरा सुधाकर घोडगावकर, एमएसजी कॉलेज, मालेगाव कॅम्प. ५७६ गुण (९६ टक्के).
लातूर - रश्मी दत्तात्रय पाळवदे, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, अहमदपूर. ५८१ गुण (९६.८३ टक्के).