Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मुंबईतून हर्षद चव्हाण प्रथम
निकाल ११ टक्क्यांनी घसरला
मुंबई, ४ जून / प्रतिनिधी

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबई विभागातून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या हर्षद प्रकाश चव्हाण हा ९६.६७ टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. एसआयईएस महाविद्यालयाचा अक्षय रोहित गांधी (९६.३३ टक्के) हा दुसरा तर रूपारेलची लेखा मुरलीधरन (९६.१७) तिसरी आली आहे.
लेखाने मुंबईतून मुलींमध्ये पहिली येण्याचा मान पटकावला आहे. जयहिंद महाविद्यालयाची रिद्धी शहा (९५.८३ टक्के) दुसरी आली आहे तर तिसरा क्रमांक रामनारायण रूईया महाविद्यालयाच्या मयुरी रेगे आणि शरण्या सुब्रमण्यम यांनी मिळविला आहे. दोघींना ९५.८३ टक्के गुण मिळाले आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या दादासाहेब पाटील (९४.६७ टक्के) याने मागासवर्गीयांतून पहिला क्रमांक मिळविला आहे.
यंदा मुंबई विभागाचा निकाल जवळपास ११ टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी ७४.६१ टक्के एवढा मुंबईचा निकाल लागला आहे. गेल्या वर्षी तब्बल ८५.३३ टक्के निकाल लागला होता. यंदा २ लाख ६१ हजार ४२६ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील १ लाख ९५ हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नियमित अभ्यासक्रमांचे १ लाख ८६ हजार ३५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी २ लाख ६ हजार ६२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ७६ हजार ३२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदाचा निकाल घसरला असला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढली आहे. मराठी विषयाचा सर्वाधिक (९७.६३ टक्के) निकाल लागला आहे, तर सर्वात कमी निकाल सचिवांची कार्यपद्धती या विषयाचा (७१.३१ टक्के) लागला आहे. एका महाविद्यालयाचा शून्य टक्के निकाल लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या १० आहे. गेल्या वर्षी ३३ महाविद्यालयांमध्ये १०० टक्के निकाल लागला होता.
या परीक्षेत कॉपीची ९१ प्रकरणे आढळून आली आहेत. त्याप्रकरणी २८ पर्यवेक्षक आणि सहा केंद्रसंचालकांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष श्रीधर साळुंके यांनी सांगितले. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलेल्या २२ पर्यवेक्षकांची दखल घेऊन त्यांना अभिनंदनाची पत्रे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परराज्यातून आलेल्या सुमारे ३४ विद्यार्थ्यांनी योग्यता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

परराज्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
यंदा सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने मुंबई विभागात बारावीच्या निकालात मोठी घसरण झाली आहे. परराज्यातून मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानेच निकालात घट झाली असल्याचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीधर साळुंके यांनी सांगितले. मुंबई विभागाच्या तुलनेत इतर विभागांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत फारशी वाढ झाली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गुणवत्ताधारक विद्यार्थी
- सर्वसाधारण
१. हर्षद चव्हाण (स्वामी विवेकानंद, चेंबूर) - ९६.६७
२. अक्षय गांधी (एसआयईएस, सायन) - ९६.३३
३. लेखा मुरलीधरन (रूपारेल, माटुंगा) - ९६.१७

मुली
१. लेखा मुरलीधरन (रूपारेल, माटुंगा) - ९६.१७
२. रिद्धी शहा (जयहिंद, चर्चगेट) - ९५.८३
३. मयुरी रेगे (रूईया, माटुंगा) - ९५.८३
३. शरण्या सुब्रमण्यम (रूईया, माटुंगा) - ९५.८३

मागासवर्गीय
१. दादासाहेब पाटील (स्वामी विवेकानंद, चेंबूर) - ९४.६७
२. कविता थोरात (झुणझुणवाला, घाटकोपर)- ९२.३३
३. सिद्धी सोनवणे (केळकर-वझे) - ९२.३३

विज्ञान शाखा
१. अंकिता शाह (स्वामी विवेकानंद, चेंबूर) - ९५.००
२. श्रृती शेट्टी (केळकर-वझे) - ९४.१७

कला शाखा
१. देविका घरगे (रूईया, माटुंगा) - ९०.३३
२. अनुजा जोशी (रूईया, माटुंगा) - ८७.३३

वाणिज्य शाखा
१. मनाली लखोटीया (एसआयईएस, नेरूळ) - ९१.३३
२. चार्मी पारेख (एच. आर., चर्चगेट) - ९१.१७
२. पंडीत प्रशीदा (मुलुंड कॉलेज)- ९१.१७

किमान कौशल्यावर आधारित विषय
१. जॉयस परेरा ( टी. एस. बाफना, मालाड) - ८७.८३
२. सोनाली मेहता (स्वामी विवेकानंद, चेंबूर) - ८६.१७

रात्र महाविद्यालय
१. मनिषा चव्हाण (कुलदिपसिंग दिवाण, गोरेगाव) - ८१.३३
२. सविता खरमाळे (नाईट ज्युनियर कॉलेज, ठाणे) - ८०.८३
३. संदेश पवार (भारती विद्यामंदीर, घाटकोपर) - ७९.१७

अपंग
१. विरल रायथथा (बोरीवली एज्युकेशन सोसायटी) - ८६.८३