Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

समन्वयाअभावी आपात्कालिन आराखडा कोलमडला..
धवल कुलकर्णी, सागनिक चौधरी, वाय. पी. राजेश
मुंबई, ४ जून

 

२६ नोव्हेंबरच्या रात्री दहा अतिरेक्यांनी मुंबईवर चढवलेल्या अचानक हल्ल्याला सज्जपणे तोंड देण्याऐवजी मुंबई पोलीस दल बावरलेले आणि गोंधळलेले दिसत होते. दहशतवादी हल्ला तसा नवा नसलेल्या मुंबई पोलिसांचे पितळ उघडे पडले. १९९३ च्या बॉम्बस्फोटांनंतर तयार केलेला आपत्कालिन आराखडा या हल्ल्याच्या वेळी पार कोलमडला. पोलीस दलाचे नेतृत्त्व करण्याची आणि समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे डझनभर आयपीएस अधिकारी हल्ल्याच्या विविध ठिकाणी गेले. मात्र त्यांच्यात समन्वय नसल्यामुळे पोलीस दलात नुसता गोंधळ पसरला. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतानाही या हल्ल्याला तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी तब्बल १० तास वाट पहावी लागली.
१९९३ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट मालिका घडली तेव्हाच ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) तयार करण्यात आली. मात्र तीच या हल्ल्याच्या वेळी कोलमडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या प्रक्रियेनुसार पोलीस मुख्यालयातील ऑपरेशन विभागाच्या उपायुक्ताने अशा हल्ल्याच्या वेळी कार्यभार सांभाळावा आणि लगेच हल्ल्यासाठी सज्ज असलेल्या पथकांशी समन्वय साधून त्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठविणे अपेक्षित होते. ७/११ च्या रेल्वेतील बॉम्बस्फोटानंतर या प्रक्रियेत सुधारणा करताना, उपायुक्तांनी एकसंध निर्देश व नियंत्रण केंद्र (युनिफाईड कमांड-कंट्रोल सेंटर) उभारावे, याचाही समावेश करण्यात आला होता. २६/११ च्या हल्ल्यातील पहिल्या तासानंतरच ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’चा बळी गेला. या पद्धतीचा सर्वात दुर्दैवाचा आणि घातक भाग म्हणजे या हल्ल्यानंतर दोन तासातच दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे आणि चकमकफेम पोलीस निरीक्षक विजय साळसकर हे क्षुल्लक माहितीवरून वा कुठलीही योजना न आखता दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी गेले आणि स्वत:चा जीव गमावून बसले, असेही आता स्पष्ट होत आहे.
या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पहिल्याच प्रयत्नांपासून नुसता गोंधळ होता. अबू शोएब आणि अबू उमेर हे अतिरेकी साडेनऊनंतर कुलाबा येथील कॅफे लिओपोल्ड रेस्तराँमध्ये गेले. अंदाधुंद गोळीबार करून त्यांनी दोन हातबॉम्ब फेकले तेव्हा प्रचंड मोठा आवाज ऐकून लिओपोल्डच्या समोर तैनात असलेले कुलाबा पोलीस ठाण्याचे तीन शिपाई धावत आले. परंतु गोळीबार होत असल्याचे पाहून ते शस्त्रे आणण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. ३०३ रायफल आणि एसएलआर घेऊन ते परत आले तेव्हा अतिरेकी पसार झाले होते. शोएब आणि उमेर या अतिरेक्यांनी दोघा परदेशी नागरिकांसह ११ जणांना ठार तर २८ जणांना जखमी केले आणि तेथून ते काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ताज महल हॉटेलमध्ये शिरले.
या काळात मुंबई पोलिसांच्या बिनतारी संदेश यंत्रणेचा रेकॉर्ड तपासला असता हल्ल्याचा पहिला संदेश ९.४८ वाजता मध्यवर्ती नियंत्रण कक्षात पोहोचला होता आणि तो तात्काळ पोलिसांच्या फिरत्या वाहनांना पाठविण्यात आला होता. या ठिकाणीच ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ विस्कळीत झाली. या प्रक्रियेनुसार उपायुक्तांनी हल्ल्याच्या ठिकाणाचा ताबा घेणे अपेक्षित होते. हल्ल्याची ठिकाणे अधिक असली तरी प्रत्येक ठिकाणी अशीच पद्धत वापरणे आवश्यक होते. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत मुंबई पोलिस आयुक्तांनी तात्काळ आपात्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बैठक घ्यावी आणि कृती आराखडा तयार करावा, असेही त्यात नमूद होते. त्यामुळे कमीत कमी वेळेत ‘एकसंध निर्देश आणि नियंत्रण कक्ष’ स्थापन होऊन हल्ल्याच्या ठिकाणी तैनात असलेल्या उपायुक्तांकडून माहिती घेऊन समन्वय साधता आला असता. मात्र नेमके याच्या उलट घडल्याचे दिसून येत आहे.दहशतवादी हल्ल्याबाबत नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर विविध स्तरांमधील तसेच विविध परिसरातील कित्येक आयपीएस अधिकाऱ्यांनी आपली भूमिका काय असेल वा कुठलेही धोरण न आखता स्वत:हून हल्ल्याच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्यासमवेत आपत्कालिन बैठक झाली नाही. ते स्वत: मलबार हिल येथील निवासस्थानाहून ओबेराय-ट्रायडेन्टच्या दिशेने निघाले. तेथेही दोन अतिरेक्यांनी हल्ला चढविला होता.(क्रमश:)