Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

प्रादेशिक

राज्याच्या विकासाची गती वाढविणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री
मुंबई, ४ जून/ खास प्रतिनिधी

जनसामान्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारा, तसेच राज्याच्या विकासाची गती वाढविणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. अर्थमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील सर्व घटकांचा समतोल या अर्थसंकल्पात साधला आहे. आगामी मंत्रिमंडळाची बैठक कोकणातील सिंधुदुर्ग येथे होणार असून यात कोकणातील विकास योजनांची माहिती जाहीर केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समन्वयाअभावी आपात्कालिन आराखडा कोलमडला..
धवल कुलकर्णी, सागनिक चौधरी, वाय. पी. राजेश
मुंबई, ४ जून
२६ नोव्हेंबरच्या रात्री दहा अतिरेक्यांनी मुंबईवर चढवलेल्या अचानक हल्ल्याला सज्जपणे तोंड देण्याऐवजी मुंबई पोलीस दल बावरलेले आणि गोंधळलेले दिसत होते. दहशतवादी हल्ला तसा नवा नसलेल्या मुंबई पोलिसांचे पितळ उघडे पडले. १९९३ च्या बॉम्बस्फोटांनंतर तयार केलेला आपत्कालिन आराखडा या हल्ल्याच्या वेळी पार कोलमडला. पोलीस दलाचे नेतृत्त्व करण्याची आणि समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे डझनभर आयपीएस अधिकारी हल्ल्याच्या विविध ठिकाणी गेले.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईला ठेंगा!
मुंबई, ४ जून/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या डोक्यात विजयश्रीचा मुकुट घालणाऱ्या मुंबईला राज्याच्या २००९-१० या वर्षीच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी लोकशाही आघाडीने ठेंगा दिला. मुंबई व आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसलाच लाभ होणार आहे मग मुंबईकरांच्या पदरात भरभरून माप का घाला, असा सोयीस्कर विचार सरकारने केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारवर नाराज असलेल्या ग्रामीण मतदारांनाच काँग्रेसने लॉलीपॉप दिले आहे.

‘क्लास थेरपी..नो वे’
नवी मुंबई, ४ जून /प्रतिनिधी

बारावीत पहिला आलेल्या हर्षद चव्हाणचा क्लास थेरपीवर विश्वासच नाही. हर्षदची आई स्नेहा चव्हाण या वाशीतील नवी मुंबई हायस्कूल या सर्वात जुन्या शाळेतील शिक्षिका. त्यामुळे हर्षदने अगदी पहिलीपासून कधी शिकवणी, क्लास याचे तोंडही पाहिलेले नाही. दहावीतही हर्षद नवी मुंबईतून पहिला, तर बोर्डात तिसरा आला होता. तेव्हाही हर्षदने कोणताही क्लास लावला नव्हता. तो स्वत:ही आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाबद्दल बोलताना म्हणाला, की दिवसाला फार फार तर चारच तासांचा अभ्यास करायचो. उगाच १२-१२ तास पुस्तक समोर घेऊन अभ्यास होतो,

टॉपरला हवाय आता टॉवर
जयेश सामंत
नवी मुंबई, ४ जून

बारावीत मुंबईतून पहिला आलेल्या हर्षद चव्हाणला आता कॉम्प्युटर इंजिनीअर व्हायचे वेध लागले आहेत. अभिनंदनाचा वर्षांव, सत्कार, पुष्पगुच्छ स्वीकारताना त्याला उद्यापासून सुरू होणाऱ्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या परफॉर्मन्सची चिंता लागून राहिली आहे. परंतु या सगळ्या धामधुमीतही हर्षदला सर्वात जास्त सतावतेय , ते तो रहात असलेल्या घरातील निकृष्ट बांधकाम. वाशीच नव्हे, तर नवी मुंबईतील जुन्या वसाहतींमध्ये गणल्या जाणाऱ्या सी-१, सी-२ टाइप वसाहतीत राहणारे हर्षदचे कुटुंबही नवी मुंबईतील सिडकोने बांधलेल्या निकृष्ट बांधकामाचे बळी ठरले आहे.

मुलाच्या शिक्षणासाठी आईने केली रोजंदारी..
मुंबई, ४ जून / प्रतिनिधी

घरात अठराविश्वे दारिद्रय़, बेरोजगार पती, आठ बाय आठची झोपडी अशा बिकट परिस्थितीनंतरही न डगमगता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी रोजंदारी करणाऱ्या इंदूबाई पाटील यांच्या कष्टाचे आज चीज झाले. त्यांचा मुलगा दादासाहेब पाटील हा ९४.६७ टक्के गुण मिळवून मागासवर्गीयातून पहिला आला आहे. बारावीच्या निकालामध्ये मुलाने घवघवीत यश मिळविल्याची बातमी दूरचित्रवाणीवरून समजली तेव्हा या मातेला रडू कोसळले. या यशानंतर, आई हीच माझी आदर्श असल्याची प्रतिक्रिया दादासाहेबाने दिली.

विदर्भाचा निधी कृष्णा खोऱ्यात वळविल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केली नापसंती
संतोष प्रधान
मुंबई, ४ जून

सिंचनाचा अनुशेष हा मुद्दा गेले काही वर्षे वादग्रस्त ठरला असतानाच विधिमंडळात नेमक्या याच मुद्दय़ावर राज्यपाल आणि वित्तमंत्र्यांनी आज परस्परविरोधी भूमिका मांडल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सिंचन क्षेत्राचा अनुशेष संपुष्टात आल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादीच्या हमामात..
‘तेरी भी चूप मेरी भी चूप!’
मुंबई, ४ जून/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भुईसपाट का झाली, याचे विश्लेषण करण्याकरिता उद्या मुंबईतील एका गुप्त ठिकाणी (सूत्रांच्या म्हणण्यानुसार वरळी येथील मेफेअर सभागृहामध्ये) शरद पवार यांनी त्यांच्या पन्नासेक विश्वासू शिलेदारांची जी बैठक बोलावली आहे, त्यामध्ये कुठल्याही मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार नाही, असे पक्षातील ज्येष्ठांचे म्हणणे आहे. कारण मंत्र्यांचे राजीनामेच मागायचे झाल्यास पवार यांना स्वतच्या घरापासूनच सुरुवात करावी लागेल त्यामुळे या प्रकरणात ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असेच वातावरण आहे.

माझ्यासमोरच कसाबने दिली पहिल्यांदा गुन्ह्याची कबुली..
पोलीस अधिकाऱ्याची साक्ष
मुंबई, ४ जून / प्रतिनिधी
पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब याने त्याची व्यक्तिगत माहिती तसेच मुंबईत तो त्याच्या नऊ साथीदारांसोबत कसा व का दाखल झाला याची माहिती सर्वप्रथम आपल्यालाच दिली होती आणि आपण ती नोंदवून घेतली होती, असा दावा पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर केला.

स्वाती खंडकर यांचे निधन
मुंबई, ४ जून / प्रतिनिधी

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ या संस्थेच्या कार्यवाह आणि मुक्त पत्रकार स्वाती खंडकर यांचे आज सकाळी विलेपार्ले येथील निवासस्थानी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या या विकाराने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू असा परिवार आहे.परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात त्यांना आठ दिवसांपूर्वीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खंडकर यांनी ‘लोकसत्ता’साठीही काही काळ विलेपार्ले येथे साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलक म्हणून काम केले होते. लोकमान्य सेवा संघाच्या साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. लोकमान्य सेवा संघाच्या कामाशी त्या गेल्या वीस वर्षांपासून निगडित होत्या. लोकमान्य सेवा संघ, टिळक स्मारक मंदिराच्या अनेक साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच अन्य संस्थांसाठीहीबऱ्याच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. महाराष्ट्रात आणि भारतात विविध ठिकाणी मनुष्यबळ विकास आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रशिक्षण आणि व्याख्याने देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात येत होते.

वाणिज्य शाखेच्या प्रवेशाची समस्या वाढणार ?
मुंबई, ४ जून/प्रतिनिधी

यंदा मुंबईमध्ये वाणिज्य शाखेतून ९६ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याउलट मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आणि इतर स्वयंअर्थहाय्यित (सेल्फ फायनान्स) अभ्यासक्रमांच्या सुमारे ७० हजार जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे चार हजार विद्यार्थी वाढले आहेत. गेल्या वर्षी उपलब्ध असलेल्या ७० हजार जागा अपुऱ्या पडल्याने विद्यार्थ्यांना दूरशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा लागला होता. त्यामुळे यंदासाठी विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविले आहेत. या प्रस्तावांना राज्य सरकार मान्यता देणार का, असा सवाल शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे.

नापास झालेल्या बारावीच्या मुलीची आत्महत्या
ठाणे, ४ मे/प्रतिनिधी

बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याचा धक्का सहन न झाल्याने ठाण्यातील सुषमा भोलानाथ पाठक हिने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळी रामचंद्रनगरमध्ये घडली. वागळे इस्टेट पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या रामचंद्रनगर ३ मधील साईधाम चाळीत राहणाऱ्या सुषमा पाठक दोन विषयात ती नापास झाली. तिच्या मैत्रिणी मात्र उत्तीर्ण झाल्या. दिवसभर घरातून बाहेर न पडलेल्या सुषमा हा धक्का सहन झाला नाही. अखेर सायंकाळी घरात कुणी नसल्याचे पाहून गळफास लावला. मात्र ती जिवंत होती. उपचारासाठी रुग्णालयात नेताना रिक्षावाल्याने भाडे नाकारले आणि दुसरी रिक्षा मिळेपर्यंत उशीर झाला आणि तिला सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लक्ष आता सीईटीच्या निकालाकडे
मुंबई, ४ जून/प्रतिनिधी

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता ‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या निकालाकडे लागले आहे. हा निकाल येत्या १४ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. विज्ञान शाखेतील बहुतांशी विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास इच्छूक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सीईटीचा निकाल महत्त्वाचा आहे.