Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

तिची ‘मनीषा’ पूर्ण झाली..
प्रतिनिधी

शिक्षणामध्ये चार-पाच वर्षांचा खंड पडला होता. मात्र शिकण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे नाईट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन जिद्दीने अभ्यास केला आणि ८१ टक्के गुण मिळवून रात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ती प्रथम आली. गोरेगाव पूर्वेच्या कुलदीप सिंग दिवाण कनिष्ठ महाविद्यालय व रात्र महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या मनीषा गोपीनाथ चव्हाणची ही कहाणी.. ‘मी पहिली आले त्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे’, अशी प्रतिक्रिया मनीषाने व्यक्त केली. घरगुती समस्यांमुळे तिच्या शिक्षणात खंड पडला. शिवाय अकरावीत विज्ञान शाखेत अपयशही मिळाले.

पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी
प्रतिनिधी

बारावीच्या निकालात परंपरेनुसार यंदाही मुलींनी बाजी मारली. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींचे प्रमाण ८३.०१ टक्के तर मुलांचे प्रमाण ७३.९७ टक्के एवढे आहे. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांपेक्षा १० टक्के मुली अधिक आहेत. २००६ सालापासून मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सुमारे ८ ते १० टक्क्यांनी अधिक राहिले आहे. मुंबई विभागाच्या गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. डी. जी. रूपारेल महाविद्यालयाच्या लेखा मुरलीधन् हिने ९६.१७ टक्के गुण मिळवित राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुंबईमध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानावर आहे.

औषधी वनस्पतींच्या संवर्धनाची नितांत गरज
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘गाथा ज्ञानाची’ आणि ‘जागर पर्यावरणाचा’ या दोन पुस्तकांचे आज रवींद्र नाटय़ मंदिरात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येत आहे. ‘जागर पर्यावरणाचा’ या पुस्तकातील वनौषधीबाबत विस्तृत माहिती देणारी वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. नागेश टेकाले यांच्या रविराज गंधे यांनी घेतलेल्या मुलाखतीमधील काही अंश.. प्रश्न : आयुर्वेदात औषधी वनस्पतींचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. भारतात अशा प्रकारच्या कोणकोणत्या औषधी वनस्पती आढळतात?

मुंबई, बदलते वातावरण आणि विजा कोसळण्याचा धोका!
अभिजित घोरपडे

परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, चंद्रपूर असो, नाहीतर सोलापूर, नगर, नाशिक.. राज्याच्या बहुतांश भागात दरवर्षी विजा कोसळतात आणि त्यात कित्येकांचा मृत्यूही होतो. मुंबई मात्र या दृष्टीने सुदैवी, कारण इथे विजा कोसळण्याच्या घटना दुर्मिळ! पण आता मुंबईकरांना बेसावध राहून चालणार नाही, कारण वातावरणात होऊ घातलेल्या बदलांमुळे मुंबईतही विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील इतर ठिकाणांप्रमाणे मुंबईत मान्सूनच्या काळात धो-धो पाऊस पडतो, पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातही ढगांच्या गडगडाटात वादळी पाऊस कोसळतो.

बबनच्या घराला गिरिप्रेमींचा हातभार
स्वराज्याची राजधानी असणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड तर सर्वानाच ज्ञात आहे. पण याच रायगडावरील टकमक टोक आणि शिवसमाधी जवळून पूर्वेला आकाशात झेपावणारा एक सुळका दृष्टीस पडतो. इतिहासकाळात तसा हा खूपच प्रसिद्ध होता. संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्याची चौकी असे याचे वर्णन आढळते. कालौघात सर्वच किल्ल्यांचे महत्त्व संपले, पण दुर्गप्रेमीमुळे आजही काही गड-किल्ल्यांवर जाग असते, पण लिंगाण्यावर मात्र प्रस्तरारोहक तसेच काही धाडसी ट्रेकर्सचाच वावर आढळतो.

अमिताभ बच्चनकडून ‘युवक बिरादरी’ला ३३ लाखांची मदत
प्रतिनिधी

युवक बिरादरीची ३३ वी छावणी नुकतीच आरे कॉलनी येथील न्यूझीलंड हॉस्टेलमध्ये पार पडली. या छावणीत देशभरातील युवक सहभागी झाले होते. या छावणीची सुरुवात गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते शक्तीसिंह गोहील, डॉ. होमी भाभा विज्ञान प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, ‘बिरादारी’चे संस्थापक क्रांती शाह, जेष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थित झाली. तसेच यावेळी व्यक्तीमत्त्व विकास आणि स्वयंरोजगाराला हातभार लावणाऱ्या ‘उडान’ आणि ‘आरोहण’ या नव्या वाटचालीला प्रारंभ करण्यात आला.

नियमितपणे अभ्यास हेच यशाचे गमक
प्रतिनिधी

नियमितपणे अभ्यास हेच आपल्या यशाचे गमक आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईतून प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केली. चेंबूरच्या विवेकानंद महाविद्यालयात शिकणारी अंकिता शहा ९५ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेतून मुंबईत पहिली आली आहे. आपल्या या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली की, महाविद्यालयात १०० टक्के उपस्थिती सक्तीची होती. त्याचा निश्चितच मला फायदा झाला. मी नियमितपणे सहा-सात तास अभ्यास करीत होते. त्यामुळेच मला हे यश मिळू शकले. मुंबईतून मी प्रथम आले असले तरी या यशाचे सेलिब्रेशन मात्र मी सीईटीच्या निकालानंतरच करणार आहे, असेही ती म्हणाली. अंकिताला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे.

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ला शासनाचा सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कार
प्रतिनिधी

दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटमय आयुष्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाला शासनातर्फे सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या ‘कै. दादासाहेब फाळके पारितोषिका’ने गौरविण्यात आले. याच चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांना सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट चित्रपटाचे द्वितीय पारितोषिक ‘जोगवा’ला तर तृतीय पारितोषिक ‘धुडगुस’ चित्रपटाला मिळाले.

मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण!
‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ पुस्तकाचे अभिवाचन सुरू

शेखर जोशी

खासगी दूरदर्शन वाहिन्या आणि संगणक-इंटरनेटच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड करण्यात येत असते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी निवडक मराठी साहित्य याच दूरचित्रवाहिन्यांवरून मालिकांच्या स्वरुपात सादर झाल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली आहे. असेच काम आकाशवाणीनेही गेल्या काही वर्षांत केले आहे. मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण मिळाल्यामुळे अनेक चांगली मराठी पुस्तके आकाशवाणीच्या खेडोपाडी पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहेत.

धमाल खेळांची फेरी
प्रतिनिधी

‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘जोडी जमली रे’ कार्यक्रमात शुक्रवारच्या भागात नव्यानेच सहभागी झालेल्या स्पर्धकांची धमाल खेळांची फेरी पाहायला मिळणार आहे. आपल्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करण्याचे ‘टास्क’ या खेळात देण्यात येईल. नवीन स्पर्धक जोडय़ांची आताच एकमेकांशी ओळख झाली आहे. असे असताना जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करताना त्याच्या आवडीनिवडी नीट ठाऊक नसल्यामुळेच खेळाची ही फेरी अतिशय वेगळी ठरणार आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता ‘स्टार प्रवाह’वर दाखविण्यात येणाऱ्या या ‘रिअॅलिटी शो’मध्ये आता अशा आणखी नवीन पद्धतीचे खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शुक्रवारच्या भागात इंटरॅक्टिव्ह व रंजक खेळांबरोबरच ज्योतिषी संदीप अवचट जन्मपत्रिकेतील मूळ नक्षत्र याबद्दल स्पर्धकांना सविस्तर माहिती देतील. तसेच लग्नात जो मानपान केला जातो त्याचे महत्त्व काय आहे तेही सांगणार आहेत.

शिवराज्याभिषेकदिनानिमित्त उद्या शिवव्याख्यान
प्रतिनिधी

५ जून रोजी होत असलेल्या ३३६ व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून अश्वमेध फाऊंडेशन या संस्थेतर्फे उद्या, ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता चंदनवाडी म्युनिसिपल शाळा, चिराबाजार येथे शिवव्याख्यान आणि कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सुभाष मयेकर भूषविणार आहेत. यावेळी माधव बर्वे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यान होणार आहे. या समारंभातील कौतुक सोहळ्यात यूपीएससी परीक्षेत राज्यात चौथी आलेली पूजा टिल्लू, शून्यातून उद्योग उभारणारे उद्योजक मनोजशेठ घागरूम आणि सारस्वत समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर नेरूरकर यांचा प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी प्रकाश मुळे पोवाडा सादर करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून शिवप्रेमींनी कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अश्वमेध फाऊंडेशनचे अमोल जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९८६९४४७७७७ वर संपर्क साधावा.

झुणका भाकर केंद्र चालकांची आज तातडीची बैठक
प्रतिनिधी

‘अन्नदाता आहार केंद्रा’संदर्भात झुणका भाकर केंद्रचालकांची तातडीची सभा शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता परळ येथील शिरोडकर हायस्कूल शिशुमंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सर्व सभासदांनी हजर राहावे, असे आवाहन झुणकाभाकर केंद्रचालक संघटनेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी २६१५५९९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.