Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

p

वायुदलात भरारीचे लक्ष्मणचे स्वप्न!
नगर, ४ जून/प्रतिनिधी

अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षणाच्या ओढीने खेडेगावातून नगर शहरात आलेल्या लक्ष्मण घनश्याम सोले याने वायूदलात जाण्याचे स्वप्न जपत बारावीच्या निकालातही भरारी घेतली! लवकरच तो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल होईल. जिल्ह्य़ाच्या एका टोकाला असलेले जामखेड तालुक्यातील अरणगाव हे लक्ष्मणचे गाव. तेथील अरण्येश्वर विद्यालयात दहावीपर्यंत तो शिकला. मुळातच हुशार असलेल्या लक्ष्मणला पुढे शिकवण्याची जिद्द ठेवून आई-वडिलांनी त्याला नगरला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

नेवाशात ऑईल पॅकिंग युनिटला भीषण आग
लाखोंचे नुकसान

नेवासे, ४ जून/वार्ताहर

येथील ज्ञानेश्वर कॉलनीतील गजानन पेट्रोलियमच्या युनिटला काल मध्यरात्री आग लागली. सात तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंचनाम्यात अवघ्या चार लाखांच्या नुकसानीचा उल्लेख आहे.
ज्ञानेश्वर कॉलनीतील भरवस्तीत ज्ञानेश्वर ललित यांचे तीनमजली घर आहे. घराच्या आवारातच ऑईल पॅकिंगची मशिनरी व कच्च्या मालाचा साठा होता. रात्री या युनिटला अचानक आग लागली. या वेळी घरात ज्ञानेश्वर ललित यांची पत्नी, मुलगा व वडील झोपले होते. आरडाओरड सुरू झाल्याने ते घराबाहेर आले.

नगरच्या किल्ल्यासाठी साडेचोवीस कोटी
नगर, ४ जून/प्रतिनिधी

‘चले जाव’ आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह १२ राष्ट्रीय नेते स्थानबद्ध असलेला नगरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला पर्यटनदृष्टय़ा विकसित करण्याच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्याच्या अंदाजपत्रकात २४ कोटी ४५ लाखांच्या खर्चाला आज मान्यता देण्यात आली. देशातीलच नव्हे, तर जगातील अभेद्य आणि उत्कृष्ट भुईकोट किल्ल्यांपैकी एक असलेल्या या १५व्या शतकातील किल्ल्याच्या विकासासाठी लष्कराच्या एसीसी अँड एसचे कमांडंट आणि जिल्हाधिकारी यांच्यात दोन वर्षांपूर्वी करार झाला असून, प्राथमिक तरतुदीतून ईलाही बुरुजासमोरील पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.

हिवरेबाजारला कुतूहल नव्या नेतृत्वाचे..
नगर, ४ जून/प्रतिनिधी

राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या ग्रामसभेत त्यांचा वारसदार, पर्यायी नेतृत्व निवडण्याचे आवाहन करणार आहेत. हिवरेबाजार ग्रामपंचायतीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त गावातील बदलाच्या इतिहासाचे पुस्तक व पुढील ५० वर्षांच्या नियोजनातील पहिल्या ५ वर्षांच्या कामाचा आराखडाही प्रसिद्ध केला जाणार आहे. ग्रामसभेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही काँग्रेसमध्ये कलहाची चिन्हे
नगर, ४ जून/प्रतिनिधी

नुकतीच झालेली लोकसभेची आणि येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र, प्रारंभिक टप्प्यातच दोन्ही काँग्रेसमध्ये संघर्षांची चिन्हे दिसू लागली आहेत. माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या आक्रमक पवित्र्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या मागील निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसमध्ये ‘सहमती एक्स्प्रेस’ची झुकझुक गाडी राजकीय रूळावर आली होती. विखे पिता-पुत्र स्वगृही इंदिरा काँग्रेसमध्ये परतल्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सहमतीचे वातावरण तयार झाले होते.

जडेजासह पाच जणांवर संगमनेर पोलिसांत गुन्हा
संगमनेर, ४ जून/वार्ताहर

दैवी चमत्कारातून तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या डॉ. अशोक जर्मलसिंग जडेजा (अहमदाबाद गुजरात) याच्यासह पाचजणांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जडेजाने आपणास कंजारभाट समाजाचे कुलदैवत देवी वहाणवटी शिकोतर प्रसन्न झाल्याचा बहाणा करून दैवी चमत्कारातून तिप्पट पैसे देण्याचे आमीष दाखविले. त्यासाठी ठिकठिकाणी एजंट नेमून लाखोंची माया गोळा केली. घुलेवाडी येथील भाटनगरमध्ये राहात असलेल्या कंजारभाट समाजाच्या लोकांना जडेजा याचे एजंट मुन्नालाल उर्फ मुन्नाभाई बीडवाला, वंदनाबेन मिनेकर, हातमिसिंग जादुसिंग व किशोर जडेजा यांनी येथे येऊन बळीचा बकरा बनविले. अनेकांकडून १० लाख ६५ हजार रुपये गोळा करून पोबारा केला.
जडेजाचे बिंग फुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावि.यी ४०-५० लोकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. परंतु गुन्हा दाखल होत नसल्याने बुधवारी कंजारभाट समाजाचा जमाव पोलीस ठाण्यावर आला. त्यामुळे अखेर गुरुवारी पोलिसांनी रावण गदीयासिंग इंद्रकर याची फिर्याद घेतली. त्यानुसार मुख्य सूत्रधार आरोपी डॉ. जडेजासह वरील पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मालमोटारीखाली सापडून प्राध्यापक जागीच ठार
नगर, ४ जून/प्रतिनिधी

मालमोटारीखाली सापडून प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात येथील चांदणी चौकात रात्री आठच्या सुमारास झाला. प्रा. संतोष शिवाजी मुळे (३३ वर्षे, मुळेवाडी, ता. कर्जत) असे मृताचे नाव आहे. ते मोटारसायकलवरून कडा (ता. आष्टी) येथे निघाले होते. चांदणी चौकातून जात असताना पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या मालमोटारीखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुळे हे कडा (ता. आष्टी) येथील पी. एम. मुनोत ज्युनिअर महाविद्यालयात प्राध्यापक होते. नगर ही त्यांची सासरवाडी आहे. नगरमधील काम आटोपून ते गावाकडे निघाले होते. अपघातानंतर मालमोटारचालक पळून गेला. मालमोटार (एमएच १२ डीजी १३४१) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मुळा, गांधी विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा
नेवासे, ४ जून/वार्ताहर

तालुक्यात बारावीमध्ये त्रिमूर्ती विद्यालयाची रोहिणी भांगे ही ९० टक्के गुण मिळवून पहिली आली, तर तालुक्यातील मुळा पब्लिक स्कूल आणि नेवाशातील सुंदरबाई गांधी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. तालुक्यात १३ विद्यालयांमध्ये बारावीचे वर्ग आहेत. प्रथम आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे - ज्ञानेश्वर महाविद्यालय - कला - महावीर दवंगे (८०), शास्त्र शाखा - अंजूम पठाण (६४). वाणिज्य - कानिफनाथ कुटे (६७). जिजामाता विद्यालय भेंडे - कला शाखा - हिना पठाण (७७), शास्त्र शाखा - प्रियंका गादे (८३). शनैश्वर विद्यालय (८४), कला शाखा - पल्लवी कर्डिले (७८), शास्त्र शाखा - महेश बानकर (८४), वाणिज्य - अनिल कोल्हे (७५), किमान कौशल्य - गोरक्ष शिंदे (६९). न्यू इंग्लिश स्कूल, कुकाणे - कला - अर्चना गायकवाड (८०). वडाळा मिशन हायस्कूल, कला - वैशाली पवार (७२), घोडेश्वरी विद्यालय, घोडेगाव कला - पूनम राठोड (८१). न्यू इंग्लिश स्कूल माका - कला - पूजा एडके (७९). सुंदरबाई गांधी विद्यालय - कला शाखा - अमृता डौले (८१). त्रिमूर्ती विद्यालय नेवासे फाटा - कला शाखा - रोहिणी भांगे (९०), शास्त्र शाखा - मंगल देवीकर (७३). अहिल्याबाई होळकर विद्यालय (देडगाव) - ज्ञानेश्वर सुसे (७८). मुळा पब्लिक स्कूल - शास्त्र शाखा - नीलम पवार (८२). हरिभाऊ घाडगे विद्यालय, तेलकुडगाव - अनंत गुगळे (७५), जवाहर विद्यालय, चांदा - हराळे योगीता (७८). सुंदरबाई विद्यालय आणि मुळा पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

जुगार, मटकाअड्डय़ांवर छापे, चौघांना अटक
नगर, ४ जून/प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात विविध ठिकाणच्या जुगार व मटकाअड्डय़ांवर
छापे टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच हजार रुपये जप्त करण्यात
आले. चौपाटी कारंजा येथे कल्याण मटका चालविणाऱ्या गोरख बापूराव लांडे (५२ वर्षे, रा. सांगळे गल्ली) याला अटक करून त्याच्याकडून १३५ रुपये व मटक्याची साधने जप्त करण्यात आली. दुसऱ्या छाप्यात पोलिसांनी प्रताप नारायण बोराना (रा. जंगूभाई तालीम) यास कल्याण मटक्याच्या चिठ्ठय़ा लोकांना देत असताना पकडले. त्याच्याजवळचे ८२५ रुपये जप्त करण्यात आले. सर्जेपुरा चौकातील तुकाराम महादेव निस्ताणे यास जुगार, मटका चालवित असताना पकडून त्याच्याजवळील ७३२ रुपये व साधने जप्त करण्यात आली. अन्य एक आरोपी मुशाहिद शेख पळून गेला. तीन आरोपींविरुद्ध तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या महापालिका इमारतीजवळ कल्याण मटका चालविणाऱ्या रामदास आनंदा थोरात याच्याकडून ७६५ रुपये जप्त करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली.

क्रांतिसेनेतर्फे दि. ७पासून मराठा आरक्षण जनजागृती अभियान
नगर, ४ जून/प्रतिनिधी

क्रांतिसेनेच्या संस्थापिका आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष डॉ. कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली ७ जूनपासून जिल्ह्य़ात मराठा आरक्षण जनजागृती अभियान राबवणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले. पक्षाच्या एका बैठकीत हा निर्णय झाला. आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, यासाठी क्रांतिसेना सातत्याने लढा देत आहे. जो खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्टय़ा मागासलेला आहे, ज्याला सवलतींची गरज आहे त्या वर्गास आरक्षण मिळावे, अशी क्रांतिसेनेची मागणी आहे. बैठकीस शिवाजी कडू, प्रवीण हरिश्चंद्रे, कुसूम पवार, संदीप शिंदे, प्रमोद आसने, मनोज चोभे, प्रशांत कल्हापुरे, सुरेश कवडे, लहू कासार, गव्हाणे आदी उपस्थित होते.

अडीच लाख रोपे वन खात्यातर्फे तयार
नगर, ४ जून/प्रतिनिधी

वन खात्याच्या येथील कार्यालयाच्या आवारातील रोपवाटिकेत सुमारे अडीच लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. वन विभागातर्फे दर वर्षी जिल्ह्य़ाच्या विविध भागात रोपे लावून वृक्षसंपदा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावर्षी अडीच लाख रोपे तयार आहेत. निम, शिसू, बाभूळ, शिवण, काशीद, करंज, आवळा, आंबा, लक्ष्मीतरू, चिंच आदींचा त्यात समावेश आहे.
या रोपवाटिकेत हरितगृह (अॅग्रोनेट शेड) उभारण्यात आले असून, त्यात रोपे तयार करण्यात आली आहेत. व्हर्मिवॉश, गांडुळखत, नॅमेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यात येऊन त्याचा वापर रोपांसाठी करण्यात आला. या रोपवाटिकेस शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी भेट देतात. वनाविषयी जिव्हाळा निर्माण करून पर्यावरणाचे महत्त्व त्यांना पटवून दिले जाते. दि. १५ जून ते १५ सप्टेंबरदरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येतो. या काळात लोकांना सवलतीच्या दरात रोपे पुरविली जातात. जिल्ह्य़ातील वनक्षेत्रात लावण्यात येणारी लागवड उपवन संरक्षक दिलीप गुजेला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. देवखिळे यांनी सांगितले.