Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

गारांसह शहरात जोरदार पाऊस
नागपूर, ५ जून/ प्रतिनिधी

जूनला सुरुवात होऊनही उन्हाच्या तडाख्यातून सुटका न मिळालेल्या नागपूर शहराला आज जोरदार पावसाने तडाखा दिला. या पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या. उष्म्याने जिवाची काहिली होत असलेल्या नागपूरच्या वातावरणात यामुळे गारवा आला. विदर्भात इतरत्र मात्र पाऊस पडल्याचे वृत्त नाही. आज सकाळपासून शहरात चांगले उन्हं होते. दुपारी बारा वाजेपर्यंत ४३.१, म्हणजे सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. साडेतीनच्या सुमारास वारे वाहू लागले. अंदाजे चार वाजेपासून पावसाला सुरुवात झाली.

अर्थसंकल्पात विदर्भाच्या पदरी निराशा
नागपूर, ४ जून/ प्रतिनिधी

अर्थसंकल्पात विदर्भ
गोसेखुर्दला दिलासा अमरावतीत कर्करोग रुग्णालय
आत्महत्या अधिक असलेल्या ६ जिल्ह्य़ांना अतिरिक्त निधी
गजानन महाराज शताब्दी महोत्सवासाठी निधी
शौकीनांच्या खिश्याला खार महिला सरपंचांना मोफत प्रवास
राज्यातील आघाडी सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाटय़ाला, विशेषत या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र सहा जिल्ह्य़ांना फक्त ५० कोटी रुपये दिल्याने त्यांची निराशा झाली आहे.

वैद्यकीय अधिकारी आंदोलन तीव्र करणार
नागपूर, ४ जून / प्रतिनिधी

आरोग्य सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य शासनाने केंद्र शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन न दिल्यास आरोग्य सेवा अधिकारी महासंघातर्फे सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. विजय गेडाम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. राज्य शासनाने आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला असला तरी केंद्र शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर भत्ते देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

गांजाखेतमध्ये ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना मारहाण
नागपूर, ४ जून / प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याच्या दोन घटना गांजाखेत उपकेंद्रात गुरुवारी घडल्या. महावितरणच्या गांजाखेत उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता श्रीराम नारायण साठे व त्यांचे सहकारी त्यांच्या विभागात येणाऱ्या भागात विजेचे मीटर तपासण्यास गेले होते. ते उपकेंद्रात परत आले तेव्हा तेथे अनूप देवेंद्र गोयनका (रा. कॉटन मार्केट), प्रभात किसनलाल अग्रवाल, चंद्रेश हंसराज जैन (रा. संत्रा मार्केट) व प्रवीण सुभाष गुप्ता (रा. लकडगंज) यांनी श्रीराम साठे यांना दूरध्वनी केला.

चार अपघातात चौघे ठार आठ गंभीर जखमी
नागपूर, ४ जून / प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसात नागपूर शहर व ग्रामीण भागात चार अपघात होऊन चौघे ठार तर आठ गंभीर जखमी झाले. वेगात असलेल्या हिरो होंडाच्या धडकेने सायकलवर बसलेली महिला ठार, तर दोघेही चालक गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कोराडी मार्गावर हा अपघात घडला. वेगात आलेल्या ट्रकच्या धडकेने मोटारसायकल चालक ठार झाला. मौद्यापासून २५ किलोमीटर अंतरावरील बहादुरा येथे बुधवारी दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. वेगात आलेल्या वाहनाच्या धडकेने पादचारी ठार झाला. सावनेरपासून तीन किलोमीटरवरील नीलगाव येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारस हा अपघात घडला. देवानंद बापूराव इवनाते हे त्याचे नाव आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहन चालकाविरुद्ध सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वेगात आलेल्या मेटॅडोरच्या धडकेने मारुती व्हॅन चालक ठार तर पाच जखमी झाले. काटोलपासून चौदा किलोमीटर अंतरावरील नारायणपूर येथे हा अपघात घडला. काटोल पोलिसांनी ट्रक चालक आरोपी उमेश बबनराव काटकर (रा. काटोल) याला अटक केली.

पर्यावरण दिनानिमित्त आज मिरवणूक
नागपूर, ४ जून / प्रतिनिधी

नागपूर सी.एन.आय, सीएचएफ व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समाजामध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने उद्या, शुक्रवारी ‘उम्मीद प्रकल्पा’ंतर्गत रिझर्व बँक चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी विविध कलापथक व पथनाटय़ाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शहरातील विविध भागात कचरा उचलणारे कर्मचारी सहभागी होणार आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित दुपारी १२ वाजता मिरवणुकीस हिरवा झेंडा दाखवतील. रिझर्व बँक चौकातून मिरवणूक निघून सीएनआयजवळ समारोप होईल.

उघडय़ा डी.पी.मुळे जिविताला धोका
नागपूर, ४ जून/ प्रतिनिधी

उत्तर नागपुरातील टेका नाका भागात विजेची डी.पी. उघड राहत असल्याने नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची तक्रार अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या उत्तर नागपूर शाखेने केली आहे. टेका नाका, नारी रोडवरील अमन प्लाझासमोर महावितरण कंपनीच्या डीपीला दार असूनही ते नेहमी उघडेच असते. त्यामुळे लहान मुले व जनावरांचा त्याला स्पर्श होऊन जीव जाण्याचा धोका आहे. स्पार्किंग झाल्यास आणखी मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर हा धोका आणखीच वाढेल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
याशिवाय कपिलनगर चौक, एन.टी.पी.सी. चौक, प्रभात कॉलनी चौक येथे हायमास्ट लाईटचे कनेक्शन ज्या लहान डीपीवरून घेण्यात आले आहे, त्या डीपीचे झाकणही खुले आहे. फक्त दोन फूट उंचीवरील ही डीपी अपघाताला आमंत्रण देणारी आहे. या डीपीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या उत्तर नागपूर शाखेचे अध्यक्ष सुरेश गजभिये, हिरालाल रंगारी, विजय बागडे, अंकुश गजभिये, नितीन मोटघरे, रवींद्र मानकर वगैरेंनी केली आहे.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये रक्तदान शिबीर
नागपूर ३ जून/प्रतिनिधी

भारतीय महसूल सेवेच्या ६२ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इन्स्टिटय़ूट ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आणि डागा इस्पितळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे अतिरिक्त महासंचालक तिरुमल कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात त्यांनी रक्तदानाबाबत जागृकता निर्माण करण्याची गरज असून या प्रकारचा उपक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य अशोक धाबेकर, रिजनल ब्लड ट्रान्सफ्युजन अधिकारी डॉ. काशिनाथ कुहीकर उपस्थित होते. या शिबिरात ७७ प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी अनेकांनी प्रथमच रक्तदान केले. या शिबिरात गोळा करण्यात आलेले रक्त डागा इस्पितळातील गरजू रुग्णांना करण्यात येणार आहे.

नागपूर विभागात २० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के
नागपूर, ४ जून/ प्रतिनिधी

नागपूर विभागात २० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून एका महाविद्यालयाने शून्य टक्के निकालाचा ‘विक्रम’ नोंदवला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांपैकी सर्वाधिक ७ महाविद्यालये गोंदिया जिल्ह्य़ातील असून नागपूर जिल्ह्य़ातील ५, चंद्रपूरमधील ३, भंडारा आणि वर्धा जिल्ह्य़ातील प्रत्येकी २ व गडचिरोली जिल्ह्य़ातील एका महाविद्यालयाचा यात समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ातील एक महाविद्यालय ‘शून्य नंबरी’ ठरले आहे. विभागात एकूण ८५४ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी शून्य ते ३० टक्के निकाल असलेली १२ महाविद्यालये आहेत. ३० ते ४० टक्के निकाल असलेली २९, ४० ते ५० टक्क्यांदरम्यानची ५१ आणि ५० ते ६० टक्क्यांदरम्यानची ८४ महाविद्यालये आहेत. ६० ते ७० टक्के निकाल असलेली ११९, ७० ते ८० टक्क्यांदरम्यानची १६६, ८० ते ९० टक्के निकाल देणारी १९७ आणि ९० ते १०० टक्क्यांदरम्यान निकाल असलेली १७६ महाविद्यालये विभागात आहेत.

तर क्रीडानैपुण्याचा उपयोग तरी काय?
पालकांचा सवाल पुन्हा ऐरणीवर
नागपूर, ५ जून/ प्रतिनिधी

राज्य शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना खेळांसाठी दिलेल्या गुणांचा उपयोग काय, असा प्रश्न बारावीच्या निकालाच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. उदाहरण द्यायचे तर, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी मृण्मयी श्रीकृष्ण देशपांडे हिला या परीक्षेत ६०० पैकी ५६५, म्हणजे ९४.१६ टक्के गुण मिळाले आहेत. मात्र जलतरणात राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य दाखवल्याबद्दल तिला २५ गुण अधिक मिळाले आहेत. गुणपत्रिकेत तिला ५६५+२५ म्हणजे ९८.३३ गुण दाखवण्यात आले आहेत. हे गुण ग्राह्य़ मानले, तर ती राज्यात दुसऱ्या क्रमांकावर येते. परंतु प्रत्यक्षात हे जास्तीचे २५ गुण प्रवेशासाठी कुठेच जमेला धरले जात नाहीत, असे तिचे वडील डॉ. देशपांडे यांनी सांगितले. दहावीच्या वेळेस या संदर्भात आलेला अनुभव त्यांच्या जमेला आहे. यापूर्वीचे शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडू विद्यार्थ्यांना जादा गुण देण्याची योजना जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्षात खेळाडूंना गुणपत्रिकेवर जास्त गुण दिसण्याव्यतिरिक्त त्याचा काही उपयोग होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.