Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
गम्ज़्‍ज़्‍ोबस्र

 

इस्लाम धर्मात फक्त स्त्रियांनाच लज्जा बाळगण्याचे आदेश देण्यात आले नसून पुरुषांना देखील आपली नजर खाली ठेवण्याची आज्ञा देण्यात आली आहे. दिव्य कुरआनच्या भाष्यकारांनी म्हटले आहे की, ‘‘वास्तविकपणे ‘गम्ज़्‍ज़्‍ोबस्र’ अशी आज्ञा दिली गेली आहे. सदरहू अरबी शब्दाचे भाषांतर सर्वसाधारणपणे दृष्टी खाली करणे किंवा ठेवणे असा केला जातो परंतु खरे पाहता या आज्ञेचा अर्थ सदैव खालीच पाहत राहणे असा नाही तर पूर्णपणे दृष्टी रोखून न पाहणे आणि पाहण्यासाठी नजरा अगदी मोकाट न सोडणे असा होतो. हा अर्थ ‘नजरांची जपणूक’ने पूर्णपणे व्यक्त होतो. म्हणजे ज्या वस्तूला पाहणे योग्य नसेल त्यापासून दृष्टी वळविली जावी हे विचारात न घेता की माणसाने दृष्टी खाली करावी अथवा इतर दुसऱ्या बाजूने तिला वळवून घ्यावे. उपलब्ध संदर्भाद्वारे देखील असे कळते की हे बंधन ज्या गोष्टीसाठी घातले गेले आहे ते म्हणजे पुरुषांचे स्त्रियांना पाहणे, अथवा इतर लोकांच्या गुप्त अंगावर दृष्टी टाकणे किंवा अश्लील दृष्यांवर दृष्टी रोखणे होय.’’
येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, वैद्यकीय तपासणीकरिता स्त्रिया आपल्या शरीराचा तेवढाच भाग ज्याची चिकित्सा करणे आवश्यक आहे पुरुष अथवा महिला डॉक्टरांसमोर उघडू शकतात. शक्यतो स्त्री डॉक्टरांकडून रोगांचे निदान आणि उपचार करून घेतलेले बरे, अगदी नाइलाजच असेल तर पुरुष डॉक्टरही चालेल कारण अशा वेळी डॉक्टर फक्त एक चिकित्सक नसून त्याचे स्थान एक आध्यात्मिक बाप किंवा स्वामी पेक्षाही जास्त उंचावते. युनानी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये याचा फार विचार करण्यात आला आहे.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
कृष्णविवर- ४

कृष्णविवर दिसू शकत नाही, मग त्याचा वेध कसा घेतला जातो?
कृष्णविवरांचे अस्तित्व अनेक अप्रत्यक्ष पद्धतींनी सिद्ध करता येते. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी हंस तारका समूहामध्ये एका क्ष-किरणांच्या प्रखर स्रोताचा शोध लागला, ज्याला ‘हंस क्ष-१’ असे नाव दिले गेले. अशा प्रखर क्ष-किरणांच्या स्रोताचे मूळ कृष्णविवराभोवती असलेली अतितप्त वायूची चकती हे असू शकते. कृष्णविवरासारखी वस्तू आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे निकटच्या एखाद्या ताऱ्याकडून वायू खेचून घेते. कृष्णविवरांत शिरणाऱ्या या वायूची कृष्णविवराभोवती चकती तयार होते. कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणामुळे या चकतीत जमा होत असलेल्या वायूच्या अणुंना प्रचंड प्रमाणात गतिजन्म ऊर्जा प्राप्त होऊन त्यांचे तापमान कित्येक लक्ष सेल्सिअसर्पयच पोहोचलेले असते. हे अतितप्त वायू त्यांच्या तापमानाशी निगडित असे क्ष-किरण उत्सर्जित करीत असतात. क्ष-किरणांचे असे तीव्र उत्सर्जन हा कृष्णविवराचा पुरावा असू शकतो.
एखाद्या तेजस्वी वस्तूकडील प्रकाशकिरण जेव्हा कृष्णविवरासारख्या अतिजड आणि अतिघन वस्तूच्या जवळून जातात तेव्हा त्या प्रकाशकिरणांचा मार्ग या अतिजड वस्तूच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन वक्री होतो. प्रकाशावरील या परिणामामुळे त्या तेजस्वी वस्तूच्या प्रतिमेत लक्षात येतील असे बदल घडून येऊ शकतात. या बदलांच्या स्वरूपावरून ही अतिजड वस्तू कृष्णविवर आहे किंवा काय ते कळू शकते. काही वेळा एखादा तारा जर ‘अदृश्य’ अशा वस्तूभोवती प्रदक्षिणा घालताना आढळला तर त्या ताऱ्याच्या गतिवरून तो ज्या वस्तूभोवती फिरत आहे त्या अदृश्य वस्तूचे वस्तूमान कळू शकते. ही अदृश्य वस्तू जर अतिजड स्वरूपाची असली तर ती वस्तू कृष्णविवर असल्याची शक्यता असते. गेल्या काही वर्षांत आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराभोवती फिरणाऱ्या अशा अनेक ताऱ्यांची निरीक्षणे केली गेली आहेत.
अनिकेत सुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
जॉन केन्स

‘मिश्र अर्थव्यवस्था’ या संकल्पनेचा पाया रोवणाऱ्या जॉन केन्स यांचा जन्म लंडन येथे ५ जून १८८३ रोजी झाला. केंब्रिज विद्यापीठातून गणिताची पदवी त्यांनी संपादन केली. भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे ‘इंडियन करन्सी अँड फायनान्स’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. पहिले महायुद्ध संपल्यावर इंग्लंडचे पंतप्रधान लॉइड जॉर्जचे आर्थिक सल्लागार म्हणून व्हर्सायच्या तहाच्या वाटाघाटीसाठी पॅरिसला गेले. तथापि, तेथे जर्मनीवर लादणाऱ्या मानहानिकारक अटींमुळे त्यांची निराशा झाली. ‘द इकॉनॉमिक क्वान्सिकेन्सेस ऑफ द पीस’ या आपल्या पुस्तकातून व्हर्सायच्या तहावर त्यांनी टीका केली. १९२९ साली अमेरिकेवर आलेल्या आर्थिक मंदीची लाट जगभर पसरली. तथापि इंग्लंड या मंदीतून सहिसलामत बाहेर पडले. याला कारण केन्स यांनी सुचविलेल्या उपाययोजना. ‘द जनरल थेअरी ऑफ एम्लॉयमेंट’ ‘इंटरेस्ट अँड मनी’ हे ग्रंथ १९३६ साली लिहिले. त्यांनी लिहिलेले हे ग्रंथ खूपच गाजले. यातून बेकारी, महामंदीची कारणे, परिणाम, उपाययोजना यांची चर्चा केली आहे. केंब्रिजमध्ये अध्ययनाचे काम करीत असताना ‘द टाइम्स’ ‘मॅचेस्टर गार्डियन’ या वर्तमान पत्रात ते लिहित असत. ‘हाऊ टू पे फॉर वॉर’ या लेखनमालेतून त्यांनी युद्धकालीन अर्थकारणाचे विश्र्लेषण करून युद्धासाठी करारांबरोबर सक्तीची बचत आवश्यक असते. हे त्यांचे म्हणणे होते. १९४५ साली अमेरिकेने इंग्लंडला अब्जावधी डॉलरचे भले मोठे कर्ज दिले होते. यात केन्स यांचे योगदान मोठे होते. इंग्लंडनेही १९४१ साली ‘सर’ या किताबाने त्यांचा गौरव केला. ‘इकॉनॉमिक जर्नल’ चे सहसंपादक असणाऱ्या केन्स यांनी ‘ए’ रिव्हिजन ऑफ द ट्रिटी , ‘द एन्ड ऑफ लायसेझ फेअर’, ‘ए ट्रिटाइझ ऑफ मनी’ या सारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थकारणाची गणिते बदलली तेव्हा केन्स यांचे अर्थशास्त्रीय सिद्धांत कालबाह्य़ झाले. असा एक सूर निघू लागला. तथापि ‘नवकेन्स वाद’ या नावाखाली केन्सचे काळाला अनुसरुन सुधारित अर्थ शास्त्रीय साहित्य बाजारात आले. आज २१ व्या शतकातही त्यांचा प्रभाव टिकून आहे. २१ एप्रिल १९४६ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
इच्छेचे अग्निपंख

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले ‘विंग्ज ऑफ फायर’ हे पुस्तक जरूर वाचायला हवे. वाचकालाही भव्यदिव्य करण्याच्या इच्छेचे अग्निपंख फुटतील. दक्षिण भारतात राहणारे कलाम नोकरीसाठी मुलाखत द्यायला उत्तरेत दिल्ली शहरी आले. पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मुलाखतीसाठी संपूर्ण तयारी केली होती. हवाई दलाच्या निवड समितीसमोर त्यांची मुलाखत पार पडली. मुलाखत त्यांच्या मते छान झाली होती. निकालाची अधीरतेने ते वाट पाहत होते.
निकालाची यादी लागली. पहिल्या आठजणांची निवड झाली होती. डॉ कलामांचे नाव यादीत नववे होते. कायम उराशी जपलेले स्वप्न पार चक्काचूर झाले होते. आकाशात झेप घेऊन लीलया उड्डाण करण्याची त्यांची आकांक्षा अपुरी राहणार होती. निळ्या नभात पक्ष्याच्या सहजतेने उंच भरारी घेण्याची आस पूर्ण होणार नव्हती.
डॉ. कलाम खचले नाहीत, निराश झाले नाहीत किंवा इतरांना दोष देत राहिले नाहीत त्यांची वृत्ती तत्त्वज्ञानाची होती. त्यांच्या मनात शब्द उमटले, नियतीचा तू स्वीकार कर. हवाई दलात तू वैमानिक व्हावेस हे नियतीला मंजूर नाही. पण तू कोण होणार आहेस हे नक्की ठरलेले आहे; पण ते नियतीने अजून उघड केलेले नाही. अपयश विसरून जा. जे होईल ते चांगले आणि तुझ्या भल्याचेच असेल.
हवाई दलात पायलट म्हणून प्रवेश मिळवायचा होता पण तो मिळाला नाही, म्हणून निराश, कडवट न होता डॉ. कलाम वरिष्ठ वैमानिक अधिकारी म्हणून रुजू झाले. जमत नाही म्हणून त्यांनी कधी कुठले कार्य सोडून दिले नाही. अविश्रांत मेहेनत, ध्यास, जे काम करू त्याच्याशी प्रामाणिकपणा आणि मी यशस्वी होईन हा आत्मविश्वास त्यांच्यात होता. यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख वाढत वाढत गगनाला भिडला.
मद्रासमधल्या रामेश्वरम या छोटय़ा गावातल्या लहान कुटुंबात जन्मलेला एक मुलगा विश्वविख्यात शास्त्रज्ञ झाला. भारताचा राष्ट्रपती म्हणून सन्मान पावला.
प्रयत्नांना यश येत नाही म्हणून निराश कशासाठी व्हायचे? केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला यश येत नाही हे मनी असू द्या. वारंवार पडलात तरी जिद्दीने उठतो तो जीवनात कधीच मागे राहणार नाही हा विश्वास ठेवा. जीवनाच्या शर्यतीत वेगाने धावत राहणे महत्त्वाचे.
आजचा संकल्प- मी अपयशाने खचणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com