Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांचा ८ जून रोजी आत्मदहनाचा इशारा
उरण/वार्ताहर

अनेकदा आश्वासने देऊनही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या ओएनजीसी प्रकल्पाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ८ जून रोजी द्रोणागिरी प्रशासन भवनासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. ओएनजीसीने म्हातवली- नागाव- चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी सिडकोमार्फत संपादन केल्या आहेत. २५ वर्षांंपूर्वी प्रकल्प उभारणीसाठी जमिनी संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना शासनाने ओएनजीसीच्या वतीने नोकरी देण्यासंदर्भात वारंवार आश्वासने दिली. मात्र प्रकल्प उभारणी, गॅसलाइन टाकणे, रस्ते, ८० मीटर संरक्षित पट्टय़ासाठी आजतागायत चार वेळा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या आहेत, मात्र जमिनी संपादन करताना प्रत्येक वेळी दिलेली आश्वासने ओएनजीसीने अद्याप पाळलीच नसल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे.

विजय चौगुले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
बेलापूर/वार्ताहर

मनसेचे रामनगर (दिघा) येथील अध्यक्ष प्रशांत कांबरे यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपाती मृत्यू झाल्याचा संशय त्यांची पत्नी विद्या कांबरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी केली. १४ मे रोजी पोलादपूर येथे गेलेले प्रशांत कांबरे तेव्हापासून गायब झाल्यानंतर शोधूनही न सापडल्याने अखेर १८ मे रोजी विद्या कांबरे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २९ मे रोजी महाबळेश्वरच्या घाटात प्रशांतचा मृतेदह मिळाला.
प्रशांतचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र प्रशांत गाडीतून ज्या दिशेने प्रवास करीत होता, ती चढाची दिशा होती. जेथून गाडी दरीत कोसळली, तेथील कठडा कोसळला नाही. जर २०० फूट खोल दरीत मृतदेह होता, तर तो काढण्यासाठी पोलिसांनी गिर्यारोहकांची मदत का घेतली नाही, आदी प्रश्न विद्या कांबरे यांनी उपस्थित केले. शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले हे विलास जाधव खून खटल्यात आरोपी असून या खटल्यात प्रशांत हा महत्त्वाचा साक्षीदार होता. त्यामुळे राजकीय वादातून चौगुले यांनी ही हत्या केल्याचा आरोप विद्या कांबरे यांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या.

उरण तालुक्याचा बारावीचा निकाल ७० टक्के
उरण/वार्ताहर

उरण तालुक्याचा बारावीचा निकाल ७०.७० टक्के लागला आहे. उरण तालुक्यात १० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधून ९६७ मुले व ८४२ मुली असे १८०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ६३९ मुले व ६५० मुली असे १२७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परदेशातील नोकरीच्या आमिषाने फसवणूक
बेलापूर/वार्ताहर

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ऐंशी हजारांची फसवणूक केल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी बाळगोविंद यादव यांनी आरोपी महंमद खान, महमंद अन्सारी यांच्याकडे परदेशात नोकरी मिळावी, यासाठी ८० हजार रुपये दिले होते. मात्र दोन महिने होऊनही यादव यांना व्हिसा वा नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.