Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

बारावीमध्ये विभागात मालेगावची युगंधरा सर्वप्रथम !
’ सर्वत्र मुलीच आघाडीवर ’ उत्तीर्णाचे प्रमाण ८५ टक्क्य़ांवर

प्रतिनिधी / नाशिक

यंदाच्या बारावी परीक्षेत नाशिक विभागात मालेगावच्या एम.एस.जी. महाविद्यालयाची युगंधरा घोडगांवकर हिने ९६ टक्के गुण प्राप्त करत विभागात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे, विभागात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावीत मुलींनी बाजी मारली आहे. नाशिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयाची श्रृती सोनवणे (९५.६७) व ओझर टाऊनशिपच्या एच. ए. एल. कनिष्ठ महाविद्यालयाची सायली ढोले (९५.३३) यांनी विभागात अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. नंदुरबारच्या श्री शिवाजी महाविद्यालयाची प्रियंका सोनवणे (८३.८३) अपंगात तर जळगावच्या के. आर. कोतकर महाविद्यालयाची रेश्मा लाड (९२.३३) हिने मागासवर्गीयांत अव्वल स्थान मिळविले.

संप मिटल्याने आजपासून जिल्हा बँकेचे व्यवहार होणार सुरळीत
प्रतिनिधी / नाशिक

औद्योगिक न्यायालयाच्या निकालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याचा निर्णय गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला असला तरी या विषयावरील न्यायालयीन लढाई सुरूच राहणार असल्याचे जिल्हा बँक कर्मचारी संघटनेने सूचित केले आहे. संप मागे घेण्याच्या निर्णयामुळे सलग चार दिवसांपासून ठप्प झालेले बँकेचे कामकाज शुक्रवारपासून सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.

वीज देयकांच्या तक्रारींबाबत ग्राहक पंचायत सरसावली
प्रतिनिधी / नाशिक

वीज देयक दिनांकापासून सात दिवसांच्या आत संबंधित रकमेचा भरणा केल्यास १० रुपये कमी भरण्याची सवलत वीज वितरण कंपनीकडून दिली जात असली तरी या यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेकांना या सवलतीपासून वंचित रहावे लागत असल्याची टीका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. मीटर रीडिंग व देयके वितरणाचे काम कंत्राटदारांना दिल्यानेच हा उशीर होत असल्याचा आरोप करतानाच संबंधितांवर कारवाई करण्यास कंपनी कचरत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.

पालिका स्थायी समिती सभापतीपदाची आज निवडणूक
सत्ताधारी-विरोधकांमध्ये रस्सीखेच

प्रतिनिधी / नाशिक

सत्ताधारी व विरोधी गटाचे समसमान बलाबल असणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे तीन तर शिवसेना, मनसे व अपक्ष गटाच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. सत्ताधारी सेना-भाजपने बसपाच्या उमेदवारास देवू केलेला पाठींबा या पक्षाने नाकारल्यामुळे आता बसपा मतदानाप्रसंगी नेमकी कोणती भूमिका घेईल, ते महत्वाचे ठरणार आहे.

चार वादग्रस्त पतसंस्थांच्या संचालक मंडळ बरखास्तीचे निर्देश देण्यात आल्याचा दावा
नाशिक / प्रतिनिधी

राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील चार नागरी सहकारी पतसंस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकार आयुक्तांना दिल्याचे नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँका-ठेवीदार बचाव समितीतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. शिवाय, उपमुख्यमंत्र्यांनी ठेवीदारांच्या समस्यांसदर्भात लवकरच एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्यांना प्रशासनाने जनतेसमोर आणावे, या मागणीचे निवेदन ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. समितीचे समन्वयक पां. भा. करंजकर, जिल्हाध्यक्ष हेमंत कवडे, शहराध्यक्ष हेमंत जगताप, तालुकाध्यक्ष परमानंद पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नाशिक शहर तेली समाज अध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे
नाशिक / प्रतिनिधी

शहर तेली समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २००९-१० वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली. हिरालाल वालखडे यांच्या अध्यक्षतेखाली संताजी मंगल कार्यालयात ही बैठक झाली. सभेमध्ये २००८-०९ च्या आर्थिक वर्षांमध्ये झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. २००९-१० च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदासाठी मावळते अध्यक्ष वालखडे यांनी सोनवणे यांचे नाव सूचविले. त्यास सर्वानी एकमताने मंजुरी दिली. कार्यकारिणीतील इतर सदस्यांमध्ये प्रविण पवार (उपाध्यक्ष), सुनील शिरसाठ (सचिव), गुरूदिप वाघचौरे (सहसचिव), प्रविण चांदवडकर (खजिनदार) यांचा समावेश आहे. सभेस भानुदास चौधरी, विजय खडके, सतीश आमले, यतिन वाघ, अंजली आमले, उषाताई शेलार, हेमंत कर्डिले, कैलास पवार आदी उपस्थित होते.