Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बारावीमध्ये विभागात मालेगावची युगंधरा सर्वप्रथम !
’ सर्वत्र मुलीच आघाडीवर ’ उत्तीर्णाचे प्रमाण ८५ टक्क्य़ांवर
प्रतिनिधी / नाशिक

यंदाच्या बारावी परीक्षेत नाशिक विभागात मालेगावच्या एम.एस.जी. महाविद्यालयाची युगंधरा घोडगांवकर हिने ९६ टक्के गुण प्राप्त करत विभागात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे, विभागात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावीत मुलींनी बाजी मारली आहे. नाशिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयाची श्रृती सोनवणे (९५.६७) व ओझर टाऊनशिपच्या एच. ए. एल. कनिष्ठ महाविद्यालयाची सायली ढोले (९५.३३) यांनी विभागात

 

अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. नंदुरबारच्या श्री शिवाजी महाविद्यालयाची प्रियंका सोनवणे (८३.८३) अपंगात तर जळगावच्या के. आर. कोतकर महाविद्यालयाची रेश्मा लाड (९२.३३) हिने मागासवर्गीयांत अव्वल स्थान मिळविले. उत्तीर्णाच्या सरासरीतही मुलांपेक्षा आघाडीवर राहत गुणात्मकतेप्रमाणेच संख्यात्मक दृष्टय़ाही आपण उजवे असल्याचे मुलींनी दर्शवून दिले आहे. विभागाची उत्तीर्णाची सरासरी ८५.०३ एवढी असून त्यात नंदुरबार जिल्हा आघाडीवर आहे.
नाशिक विभागाच्या निकालावर नजर टाकली असता मुलींचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. यंदा विभागात एक लाख १९ हजार ८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १ लाख १ हजार २५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ८२.६६ टक्के मुले तर मुलींच्या उत्तीर्णाचे प्रमाण ८८.४५ आहे. विज्ञान शाखेत धुळे येथील झुलाल बाजीराव पाटील महाविद्यालयाची सनीरा वाघमारे (९२.८३) प्रथम तर भुसावळच्या के. नारखेडे महाविद्यालयाचा पुष्पक पाटील (९२.६७) याने द्वितीय क्रमांक मिळविला. कला शाखेत नाशिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयाची सखी अनिता नितीन (८७.१७) व दाभाडीच्या टी. आर. महाविद्यालयाची भाग्यश्री बागूल (८६), वाणिज्य शाखेत प्रथम दोन्ही क्रमांकावर नाशिकच्या बी. वाय. के. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले असून कपिल आफळे (९१.५०) व पृथा पाटील (९१.३३) यांनी यश संपादन केले तर व्यावसायिक गटात मालेगावच्या एम. एस. जी. महाविद्यालयाची युगंधरा घोडगांवकर (९६) व नाशिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयाची श्रृती सोनवणे (९५.६७) टक्के गुण मिळवून अव्वल राहिल्या. किमान कौशल्य गटात धुळ्याच्या राजीव गांधी मेमोरीयल इन्स्टिटय़ुटच्या निकीता तिवारी (८४.५०) व याच महाविद्यालयाची स्टेफी अरूजा (८४), मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये जळगावच्या के. आर. कोतकर महाविद्यालयाची रेश्मा लाड (९२.३३), जळगावच्या मानसिंग महाविद्यालयाची स्नेहल परदेशी (९२), अपंग विद्यार्थ्यांमध्ये नंदुरबारच्या शिवाजी महाविद्यालयाच्या प्रियंका सोनवणे (८३.८३) तर मुलींच्या गटात युगंधरा घोडगावकर व श्रृती सोनवणे यांनी यश संपादन केले.
नियमित परिक्षार्थीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नाशिक जिल्हा मागे फेकला गेला असून या जिल्ह्य़ाची टक्केवारी ८१.५४ टक्के एवढी आहे. उत्तीर्णाच्या संख्येत आदिवासीबहुल नंदुरबार (९२.६७) आघाडीवर आहे. पाठोपाठ धुळे (८९.६८), जळगाव (८४.४३) या जिल्ह्य़ांचा क्रमांक लागतो. नाशिक जिल्ह्य़ात ३९ हजार ५४१, धुळे जिल्ह्य़ात १८५४१, जळगावमध्ये ३१ हजार ६०७, नंदूरबार ११ हजार ५६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पूनर्परिक्षार्थीची टक्केवारी ५१.९३ आहे. गुणवत्ता यादीत अव्वल राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षण मंडळाने केला नसला तरी त्यांच्या महाविद्यालयांमध्ये मात्र उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत एकूण १९२ उमेदवारांना गैरमार्ग प्रकरणी शिक्षा करण्यात आली. त्यामध्ये नाशिकचे ६२, धुळे २०, जळगाव ९२ तर नंदुरबारच्या १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांच्या पडताळीसाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज मंडळांकडे १५ जून २००९ पर्यंत शुल्क भरून आपापल्या कनिष्ठ महाविद्यालयात सादर करावा असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
इंजिनीयर, डॉक्टर व्हायचंय मला !
नाशिक विभागात वेगवेगळ्या गटांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या बहुतांशी गुणवंतांचा कल अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण घेण्याकडेच असून आपल्या यशाचे श्रेय नियोजनबध्द अभ्यासाला दिले आहे. काहींनी खासगी क्लासेसला तर काहींनी केवळ स्वत: काढलेल्या नोटस्ला महत्व दिले. गुणवंतांच्या या काही प्रतिक्रिया.
युगंधरा घोडगांवकर (विभागात प्रथम)
एम. एस. जी. कॉलेज, मालेगाव
मी कॉलेजमध्ये प्रथम येईल, अशी आई-वडिलांना अपेक्षा होती, परंतु चक्क नाशिक विभागा प्रथम आल्याचे वृत्त ऐकल्यावर त्यांना अनपेक्षित सुखद धक्का बसला. दहावीला असतांना व्ही. बी. एच. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी दुसरी आली होती. दररोज पाच ते सहा तास अभ्यास करण्यावर भर दिल्याने हे यश मिळाले. परीक्षा जवळ आल्यावर अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याचा केला. भविष्यात अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन शास्त्रात करिअर करायचे आहे.
श्रृती सोनवणे
(विभागात व्दितीय)
आर. वाय. के. कॉलेज, नाशिक
खासगी शिकवणी, महाविद्यालय आणि आई-वडील यांच्या सहकार्याशिवाय यश शक्यच नव्हते, त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे आभार. अधिक वेळ अभ्यास करून वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा अभ्यासाची नियोजनबध्द आखणी केली. मोठय़ा दोघी बहिणी एम.बी.बी.एस. असल्याने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला. भविष्यात अभियंता व्हायचे असून आता सीईटी परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहे.
सायली ढोले
(विभागात तृतीय)
एच.ए.एल. हायस्कुल, ओझर टाऊनशिप
दहावीमध्ये गुणवत्ता यादीत आल्यामुळे यशाची खात्री होतीच. विज्ञान शाखा असल्यामुळे ९० टक्केच्या आसपास गुण मिळतील ही अपेक्षा होती, पण ९५.३३ टक्के गुण मिळाल्याचे ऐकल्यावर अनपेक्षित धक्का बसला. पहिल्यापासून उत्कृष्ट गुण मिळवायचे हेच ध्येय होते. यासाठी नियमित सराव केला. उगाचच पुस्तकाची पारायणे करीत रट्टा मारणे मला आवडत नाही. ठराविक तासच अभ्यास करून मिळालेल्या वेळेचा पुरेपुर उपयोग करून घेतला. इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र मुलींनी बाजी मारल्याचे कौतुक वाटते. आज मुली मुलांपेक्षा पुढे जात असल्याचे पाहून आपण मुलगी असल्याचा अभिमान वाटतो. वडील एच.ए.एल. मध्ये असून आई संगमनेर येथे शिक्षिका आहे. आई बहुतांश वेळ बाहेरगावीच राहात असल्यामुळे घरातील सर्वकाही सांभाळून नियमितपणे अभ्यास केला.
सनीरा वाघमारे (विभागात विज्ञान शाखेत प्रथम)
पाटील महाविद्यालय, देवपूर, धुळे
वडील नेत्ररोगतज्ज्ञ व आई दंतशल्य चिकित्सक असल्याचा फायदा विभागात विज्ञान शाखेत प्रथम येण्यात झाला. मला यश मिळेल याबद्दल घरातील सर्वाना खात्री होती. वैद्यकीय शिक्षण घेण्याचा आधीच निश्चय केल्यामुळे सीईटीच्या निकालानंतर एमबीबीएस किंवा बीडीएस करण्याची इच्छा आहे. महाविद्यालयातील शिक्षक, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. दिवसभरात अभ्यासाचे तास ठरविलेले नव्हते. सेल्फ स्टडीवर भर देतांना शिकवणी तसेच महाविद्यालयात झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी केली. बारावीत असतानाही शास्त्रीय संगीताचा छंदाकडे दुर्लक्ष झाले नाही.
कपिल आफळे (विभागात वाणिज्य शाखेत प्रथम)
बी. वाय. के. महाविद्यालय, नाशिक
मी विभागात वाणिज्य शाखेत प्रथम आलो, हा मलाच अनपेक्षित धक्का आहे. अभ्यासाचे दडपण न घेता दररोज नियमितपणे केवळ दीड तास अभ्यास केला. त्यासाठी अभ्यासाचे विषयवार स्वतचे असे वेळापत्रक तयार केले. अभ्यासाशिवाय इतर उपक्रमांमध्ये भाग घेणे सुरूच ठेवले.
विषयाचा सखोल अभ्यास करता यावा यासाठी तीन ठिकाणी खासगी शिकवणी लावल्याचा फायदा झाला. ऑप्शनल लॅग्वेंज म्हणून मराठी किंवा हिंदीची निवड न करता फ्रेंच विषय निवडला. क्रमिक पुस्तकातून टिपणे घेण्यावर भर दिला. अडचण असल्यास क्लासेसमध्ये शंका निरसन होत असल्यामुळे मुद्दे स्पष्ट होत गेले. भविष्यात सी.ए. होणार.
निकिता तिवारी (विभागात किमानकौशल्यमध्ये प्रथम)
राजीव गांधी सायन्स कॉलेज, देवपूर, धुळे
वर्षभर नियमितपणे चार ते पाच तास अभ्यास केला. अगदी शिस्तबध्द नियोजन नसले तरी वेळ मिळेल त्याप्रमाणे अभ्यास करीत गेले. कुठलीही खासगी शिकवणी लावण्यापेक्षा वर्गात शिकवलेले जास्त आवडते. याशिवाय सेल्फ स्टडीही महत्वाची. रिव्हीजननंतर शेवटच्या दिवसांमध्ये प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केला. करिअर म्हणून वैद्यकीय क्षेत्राची आवड आहे.
प्रियंका सोनवणे (विभागात अपंगांमध्ये प्रथम)
शिवाजी हायस्कूल, नवापूर
विज्ञान शाखेत यश मिळविले असले तरी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्राकडे न जाता शिक्षिका होण्याचे स्वप्न आहे. नियमित अभ्यासासोबत खासागी क्लासेसच्या नोट्स चांगल्याच उपयोगी पडल्या.
कॉलेज आणि क्लासमध्ये संपूर्ण दिवस गेल्यामुळे संध्याकाळी अभ्यास करीत असे, कधीकधी रात्री उशिरापर्यंतही अभ्यास केला.
अभ्यास करतांना क्लासेसच्या नोट्स हाच एकमेव पर्याय स्वीकारल्याने अवांतर वाचनाकडे लक्ष दिले नाही. वडील धुळे येथील पाटबंधारे विभागात शिपाई आहेत, तर आई गृहिणी. या दोघांची इच्छा मी शिक्षिका व्हावे, हीच आहे. आजच्या यशामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्यामुळे मी खूप आनंदी आहे.
आनंदाचे डोही आनंद तरंगे !
प्रल्हाद बोरसे / मालेगाव
तल्लख बुद्धी, जिद्द आणि सतत अभ्यासात कार्यमग्न असणारी युगंधरा ही बारावीत महाविद्यालयात प्रथम येईल, अशी मनोकामना असणाऱ्या येथील घोडगावकर कुटुंबाला ती थेट नाशिक विभागात सर्वप्रथम आल्याने सुखद धक्काच बसला. अत्यंत सामान्य कुटुंबातील या मुलीने अशा प्रकारे यशाला गवसणी घातल्याने तिच्या घरी आप्तजन आणि मित्र परिवाराची दिवसभर रीघ लागली होती. एकीकडे पाठीवर कौतुकाची थाप पडत असताना दुसरीकडे अभिनंदनाचे दूरध्वनीही सतत खणखणत राहिल्याने तिच्या घरचा माहोल ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा बनून गेला होता.
युगंधराचे वडील सुधाकर घोडगावकर हे येथे सराफी व्यवसाय करतात तर आई जयश्री गृहिणी आहे. हे कुटुंब येथील स्टेट बँकेशेजारी अत्यंत साध्या व छोटेखानी घरात वास्तव्यास आहे. आज निकालाच्या पाश्र्वभूमीवर काहीशा औत्सुक्याच्या वातावरणात युगंधरा आणि तिचे आई वडील असतानाच त्यांचे घर शोधत शोधत मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. जगदाळे व समरसिंग ठाकूर पोहचले. त्यांनी सर्वप्रथम या कुटुंबाला ही गोड बातमी ऐकवून युगंधराचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर कुणाच्याच आनंदाला पारावर राहिला नाही. प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींपासून नातेवाईक व मित्र परिवाराची मग तिच्या अभिनंदनासाठी एकच गर्दी उसळली. दूरध्वनी देखील दिवसभर खणखणत राहिला.
खरे तर युगंधरा लहानपणापासूनच अत्यंत हुशार म्हणून परिचित. दहावीच्या परीक्षेतही तिने शाळेत दुसरा क्रमांक पटकावला होता. अभ्यासाशिवाय सामान्य अध्ययनाची पुस्तके वाचणे आणि दूरचित्रवाणीवरील मोजके कार्यक्रम बघणे हाही तिच्या दिनचर्येचा भाग होता. याशिवाय आईला स्वयंपाकाच्या कामात मदत करण्याकडेही तिचा कल असायचा. हे सारे करतानाच मिळालेले यश तिच्यासाठी महत्त्वाचे असून भविष्यात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्रातील पदवी मिळवून या क्षेत्रात करिअर करण्याचा मानस तिने बोलून दाखवला.
असाही विरोधाभास
यंदाच्या बारावी परीक्षेत विभागात गुणात्मकदृष्टय़ा नाशिक तर संख्यात्मकदृष्टय़ा नंदुरबार जिल्हा अव्वल आहे. सर्वसाधारण गटात प्रथम तिनही क्रमांक नाशिक जिल्ह्य़ातील मुलींनी पटकावले आहेत. याशिवाय, इतरही अनेक विषयांत नाशिककर प्रथम क्रमांकावर आहेत. तथापि, संख्यात्मकतेचा विचार केला तर मात्र नंदुरबारने नाशिकवर मात केल्याचे जाणवते. कारण नियमित परीक्षार्थीमध्ये नाशिक जिल्ह्य़ाची उत्तीर्णाची सरासरी ८१.५४ टक्के एवढी असली तरी नंदुरबारची हीच सरासरी तब्बल ९२.६७ एवढी आहे.