Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वीज देयकांच्या तक्रारींबाबत ग्राहक पंचायत सरसावली
प्रतिनिधी / नाशिक

वीज देयक दिनांकापासून सात दिवसांच्या आत संबंधित रकमेचा भरणा केल्यास १० रुपये कमी भरण्याची सवलत वीज वितरण कंपनीकडून दिली जात असली तरी या यंत्रणेतील त्रुटींमुळे

 

अनेकांना या सवलतीपासून वंचित रहावे लागत असल्याची टीका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. मीटर रीडिंग व देयके वितरणाचे काम कंत्राटदारांना दिल्यानेच हा उशीर होत असल्याचा आरोप करतानाच संबंधितांवर कारवाई करण्यास कंपनी कचरत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
दिनांकाच्या दिवशीच देयक हाती पडल्यास ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. तथापि, दिनांकाच्या दिवशी तर सोडाच पण अनेकांना ती सात दिवसांच्या आतही मिळत नाहीत. परिणामी, इच्छा असूनही अनेकांना या सवलतीचा लाभ घेता येत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्याचप्रमाणे कृषी आणि घरगुती वीज ग्राहकांसाठी सप्लाय कोड १५.५ नुसार वीज देयक अदा करण्याची तारीख देयक दिनांकापासून कमीतकमी २१ दिवसानंतरची ठेवणे वीज कंपनीवर बंधनकारक आहे. इतर ग्राहकांसाठी ही मुदत १५ दिवसांची आहे.
ग्राहकांचे देयक चक्र (बिलींग सायकल) कितीही महिन्यांचे असले तरी वीज कंपनीस ग्राहकांना किमान २१ दिवसांची मुदत देणे बंधनकारक आहे. असे असताना त्याबाबतीतही अनेकदा ग्राहकांवर अन्याय होत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात वीज वितरण कंपनीबरोबर अनेकदा पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग होत नसल्याचे सांगताना ग्राहक पंचायतीने कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेऐवजी वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचात रितसर तक्रार दाखल केली आहे.
ग्राहकांनीही आपापली देयके तपासून पाहून काही त्रुटी आढळल्यास विभागाचे नांव आणि देयकाच्या झेरॉक्स प्रतिसह ग्राहक पंचायतीच्या जुना गंगापूर नाका येथील कार्यालयात अथवा २३११४१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. टी. बी. साळुंके, प्रा. दिनेश म्हात्रे, मेजर पी. एम. भगत यांनी केले आहे.