Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका स्थायी समिती सभापतीपदाची आज निवडणूक
सत्ताधारी-विरोधकांमध्ये रस्सीखेच
प्रतिनिधी / नाशिक

सत्ताधारी व विरोधी गटाचे समसमान बलाबल असणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत

 

प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे तीन तर शिवसेना, मनसे व अपक्ष गटाच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. सत्ताधारी सेना-भाजपने बसपाच्या उमेदवारास देवू केलेला पाठींबा या पक्षाने नाकारल्यामुळे आता बसपा मतदानाप्रसंगी नेमकी कोणती भूमिका घेईल, ते महत्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरूवारी संपुष्टात आली. तो पर्यंत मनसेचे यतीन वाघ, शिवसेनेचे संजय बागूल, अपक्ष गटातर्फे संजय साबळे तर काँग्रेसतर्फे उद्धव निमसे, शाहू खैरे व माया दिवे यांनी अर्ज सादर केले. स्थायीमध्ये शिवसेना-भाजप व अपक्ष गट तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे समसमान बलाबल आहे. युतीकडून संजय बागूल यांचे नांव जाहीर होण्याची शक्यता असली तरी अपक्ष गटाचे नगरसेवक संजय साबळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी दोघांपैकी कोणत्या नावावर एकमत होईल हे सांगणे अवघड आहे. काँग्रेसच्या गोटात प्रारंभी यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. परंतु, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पक्ष निरीक्षकांनी उद्धव निमसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती विरोधी पक्ष नेते उत्तम कांबळे यांनी दिली. उमेदवारी मिळविण्यासाठी शाहू खैरे व उद्धव निमसे यांच्यात स्पर्धा होती. पक्ष निरीक्षकांनी सर्वाची मते जाणून घेत निमसे यांचे नाव निश्चित केल्याचे कांबळे यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी या पक्षाच्या खैरे व दिवे यांनी आपापले अर्ज कायम ठेवले आहेत. स्थायीच्या नवीन सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौरांनी युती व अपक्ष आघाडीच्यावतीने बसपाच्या उमेदवाराचे नाव प्रारंभी पुढे केले होते. परंतु, युती व अपक्ष आघाडीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चर्चेप्रसंगी सभापतीपदासाठी संजय बागूल यांचे नाव निश्चित झाले होते. असे असताना बसपाच्या उमेदवाराचे नाव पुढे करण्याचे कारण काय, असा सवाल सेनेच्या वर्तुळात उपस्थित करण्यात आला. दरम्यानच्या काळात बसपाच्या कविता कर्डक यांनीही उमेदवारी अर्ज नेला. परंतु, नंतर त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार अर्ज दाखल केला नाही असे सांगितले जाते. गटनेत्यांच्या नियुक्तीवरून बसपाने यापूर्वीच सत्ताधारी आघाडीचा पाठींबा काढला आहे. त्यातच स्थायीच्या निवडणुकीत पुन्हा पाठींबा नाकारून युती व अपक्ष आघाडीतील अस्वस्थता वाढवून दिली आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, स्थायी समिती सभापतीपदावर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे लक्ष लागले आहे.