Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अण्णा हजारेंना पाठबळ द्यावे!
गां धीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ठार मारण्याची सुपारी देण्याची घटना गंभीर, धक्कादायक असून निषेधार्ह आहे. या कटाच्या प्रकरणातून आजचे राजकारण गुंडांचे, भ्रष्टाचाराचे,

 

सुडाचे झाल्याचे उघड झाले आहे. अण्णांनी चालविलेल्या भ्रष्टाचारा विरोधातील लढाईमुळे आपणास धोका पोहचत आहे, असे समजून कोणीतरी तब्बल २५ लाख रुपये देऊन बिहार आणि उत्तर प्रदेशच्या गुंडांना सुपारी देण्याचे कारस्थान केल्याचे उघड होत आहे. या गुंडगिरीचा आणि कटकारस्थानाचा विविध क्षेत्रातील नागरिकांनी निषेध केला पाहिजे. सदर प्रकरणातील खरे गुन्हेगार पसार होऊ नये आणि ते सुटू नयेत यासाठी जागृत नागरिकांनी शासनावर दबाव ठेवला पाहिजे.
राजकीय संरक्षण असल्याशिवाय अण्णांच्या हत्येचा कट शिजूच शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आजचे राजकारण भ्रष्टाचार व गुंडगिरीने ग्रासले, नासले आहे. याचे प्रत्यंतर या कटातून निदर्शनास येत आहे. पाशवी शक्तींचा नंगानाच सुरू आहे. त्यामुळे समाजात हिंसाचार, अनाचार, भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. नैतिकतेचे अध:पतन होऊन दुष्टांची शक्ती, प्रतिष्ठा जोपासली जात आहे, असे या कटातून स्पष्ट होत आहे. या दुनियेत अण्णांसारख्या निर्मळ, निर्भिड समाजसेवकाला वारंवार त्रास दिला जात आहे. भ्रष्टाचाराच्या असुरी संपतीतून खुनाचा हा कट रचला गेला आहे.
अण्णांनी अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराविरुद्धचा संघर्ष सातत्याने सुरू ठेवला आहे. त्यात अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. अनेक सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली. या संघर्षांत अनेक प्रकारचा त्रासही सहन करावा लागला, तरीही त्यांनी आपला संघर्ष सोडलेला नाही. अण्णांचा काटा काढण्यासाठी दुखावलेल्या अनेक शिरजोरांनी षडयंत्र रचले असले पाहिजे. या कटातून अण्णांचे बरे-वाईट झालेच तर तो धागा आपल्यापर्यंत येणार नाही याची दक्षता घेतली गेलेली दिसते. त्याकरिता मोठी साखळी तयार केली गेली. यामध्ये महत्वाची घटना म्हणजे अण्णांना ठार करण्यामागे कुणा लुंग्यासुंग्या व्यक्तींचा हात नसून ते बडय़ा धेंडांचेच मोठे कारस्थान असावे हे आपणास लक्षात घेतले पाहिजे. खरे कारस्थानी यामधून सुटणार नाहीत यासाठी नि:पक्षपातीपणे चौकशी होऊन पडद्याआडच्या बडय़ा कारस्थान्यांना शिक्षा झाली तरच भविष्यात सज्जन प्रवृत्ती दृष्ट प्रवृत्तींविरूध्द लढण्यास तयार होतील.
आत्मपरीक्षणाची गरज
अण्णांवरील हा कट केवळ एका व्यक्तीविरूध्दचा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. सज्जन शक्ती विरुद्ध दुर्जन प्रवृत्ती अशी ही महत्वाची घटना आहे. सत्याकडे डोळे झाक करणे उचित ठरणार नाही. महात्मा गांधीजींचे एक चटका लावणारे वाक्य आहे. ‘कुठेही एखादा गुन्हा घडला की, मला स्वत:लाच आपण गुन्हेगार असल्याप्रमाणे अपराधी वाटू लागते.’ आज आपल्या राज्यकर्त्यांना, पुढाऱ्यांना नेत्यांना याची जाण नाही हे केवढे दुर्दैव. अशा कटांची संख्या वाढली तर सुख आणि शांती नांदेल कशी ? तेव्हा थोडे विचारी व्हा, विवेकी व्हा ! आयुष्यामध्ये अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण व्हावी लागते.
पां. भा. करंजकर, नाशिक.