Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

धुळे जिल्ह्य़ात पुन्हा राशी-२ कापूस बियाण्यांचे वाटप सुरू
धुळे / वार्ताहर

आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांकरीता राशी-२ या

 

कापूसबियाण्यांचे बुधवारपासून पुन्हा वाटप सुरू करण्यात आले.
जिल्ह्य़ात गेल्या महिन्याभरापासून राशी-२ या कापूस बियाणांचा तुटवडा भासत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले. या कापूस वाणाची टंचाई दूर व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी आ. रोहिदास पाटील यांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पाटील यांनी २५ मे रोजी जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी ए. यु. पटेल, डी. एन. पाटील, एस. डी. मालपुरे, तालुका कृषी अधिकारी महेंद्र वारूडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्ह्य़ात राशी-२ हे वाण विकणारे एकूण पाच वितरक आहेत. या बैठकीत राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याशी चर्चा करून पाटील यांनी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना आवश्यक राशी-२ या वाणाचे बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच इतर जिल्ह्य़ात अतिरिक्त असलेला बियाण्यांचा साठा धुळे जिल्ह्य़ात वर्ग करण्यासंदर्भातही सांगितले होते. राशी-२ च्या एका पाकिटाबरोबर वितरक इतर वाण खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची इच्छा नसतानाही ते घ्यावे लागत होते. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. पाटील यांनी शेतकऱ्यांना फक्त राशी २ या वाणाचेच वाटप करावे, इतर कोणताही वाण त्यास खरेदी करण्यास भाग पाडू नये, अशा सूचना बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारपासून धुळे जिल्ह्य़ात राशी-२ या वाणाचे वाटप सुरू झाले असून ते सुरळीतपणे सुरू ठेवण्याची सूचना पाटील यांनी कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांना केली आहे. जिल्ह्य़ाकरिता राशी-२, बी. टी. बी. जी. १ बियाणांचे एकूण ९ हजार २७० पाकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.