Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बेशिस्त रिक्षा चालकांचे प्रबोधन करण्याची पोलिसांची मोहीम
नाशिक / प्रतिनिधी

शहर वाहतूक विभागातर्फे बेशिस्त वाहतुकीमध्ये सुधारणा घडविण्याच्या हेतूने वारंवार विविध मोहीम, तसेच अभियान राबविण्यात येत असतात. परंतु दंडाचा वापर करूनही बेशिस्त रिक्षाचालकांच्या वर्तनात कुठल्याच प्रकारची सुधारणा होत नसल्याचे पाहून अखेर शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीपान कांबळे यांनी रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्याची

 

मोहीम हाती घेतली आहे.
शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून शिस्तीच्या दृष्टीकोनातून दंडात्मक कारवाई किंवा तडजोड दंड वसूल करूनही सुधारणा होत नसल्याचे लक्षात आले आहे. यामागे अनेक कारणांपैकी वाहतुक नियमांची नेमकी माहिती नसणे हे कारण पुढे आल्यामुळे कांबळे यांनी निरीक्षक ए.बी.पाटील, जे.एन.कढरे यांच्यासोबत शहरातील शालिमार, सी.बी.एस., मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, दिंडोरीनाका परिसरात रिक्षा थांबणाऱ्या ठिकाणी जावून वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने रिक्षा थांब्याव्यतिरिक्त इतर कोठेही किंवा बस थांब्यावर रिक्षा थांबवू नये, रिक्षा चालकाने नेमून दिलेला म्हणजे मालकाने पांढरा व चालकाने खाकी पोशाख परिधान करावा, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये, फ्रंटसीटवर प्रवासी बसवू नये, चालकाने आपल्यासोबत नेहमी ड्रायव्हिंग लायसन्स, बॅच व वाहनाचे कागदपत्र बाळगावेत, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, प्रवास भाडय़ाची आकारणी ही मीटरप्रमाणे करावी, यासाठी सोबत टेरिफ कार्ड ठेवावे, कार्डची मागणी झाल्यास प्रवाशांना ते दाखवावे, मीटरवरचे सील तोडु नये, याप्रमाणे सूचना करण्यात येत आहेत.
संरक्षणाच्या दृष्टीने रिक्षाच्या डाव्या बाजूस संरक्षक जाळी बसवावी, रिक्षा चालकाने आपले वाहन चालवतांना मद्यसेवन करू नये, वाहन चालविण्याआधी आपले वाहन सुस्थितीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, लक्ष वेधून घेण्यासाठी कर्णकर्कर्श हॉर्न बसवु नये, तसेच टेपरेकॉर्डरचा वापर करू नये, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना नियमाप्रमाणे वाहतूक करावी, चालकाने विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना आपल्या माहितीसाठी मुलांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवावेत, पार्किंगसाठी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी रिक्षा थांबवू नये, शिवाय पार्किंग करतेवेळी आपले वाहन रांगेत उभे करावे, दुसऱ्याला रिक्षा चालविण्यासाठी देताना त्याच्याकडे लायसन असल्याची खात्री करून घ्यावी, महत्वाचे म्हणजे, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या रिक्षाविरूध्द परमिट रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात येत आहे. दंडात्मक कारवाई होऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रवाशांना चांगली वागणूक देवून शहर वाहतुक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.